सोन्यामारुति
पांडुरंग सदाशिव साने Updated: 15 April 2021 07:30 IST

सोन्यामारुति : सोन्यामारुति 27

साने गुरुजी लिखित

सोन्यामारुति 26   सोन्यामारुति 28

वसंता : तो मनुष्य काय म्हणत आहे तिला ? थांबा, आपण ऐकूं.

एक मनुष्य :  अग, एवढी कशाला धांवपळ करतेस ? मास्तराकडे बघून हंस कीं दंड होईल माफ !

स्त्री : झडत नाहीं मेल्या तुझी जीभ !

तो : असत्य बोलेन तर झडेल. गिरणींतले प्रकार जगाला माहीत नसतात, परंतु आम्हांला माहीत असतात. तुला एकदम उगीच बरें नोकरी भेटली ? वशिल्याशिवाय नोकरी भेटत नाहीं. नीटनेटक्या तरण्याताठ्या मुलींना दुसरा तिसरा वशिला पहायची जरूर नसते.

ती : पायांतील वहाण मारीन बघ. पाजी माणूस.

तो : ती त्या मास्तरला मार. तुझा हात धरील तेव्हां त्याला मार. तेव्हां गुपचूप नको बसूं. तेव्हां हंसत नको बघूं. तेव्हां मुळुमुळु नको रडूं. त्या मिलमधील मास्तरांना वाहणाच मारल्या पाहिजेत. तुम्हीच मारूं शकाल. तुमच्या वहाणा ते सहन करतील. परंतु आम्ही मारूं तर आम्हीच मरूं. मला जाऊं दे पळत. तूं ये सावकाश! तुला भीति नाहीं.

वसंता : किती गलिच्छ हीं बोलणीं !

वेदपुरुष : अशीं बोलणीं सार्‍यांच्या हृदयांत असतात. कोणांचे हृदय या शब्दांना पारखें आहे ?

वसंता : मिलमध्यें का असे प्रकार असतात ?

वेदपुरुष : मिलमध्यें काय नसतें ?

वसंता : मजूर हें सहन कसें करितात ?

वेदपुरुष : सारें पोटासाठीं! सारें नोकरीसाठीं! दारिद्रय हे दुर्गुणांचें माहेरघर आहे. ऐदी, आळशी संपत्ति तीहि पापांची जननी आहे.

वसंता : काय हें जीवन ? पहांटे उठून भराभरा भराभरा धांवत यावयाचें. घरघर करणार्‍या यंत्रासमोर तासनतास उभें राहून घामाघूम व्हावयाचे. घाईनें भाकरी मध्येंच थोडी फार खायची. पुन्हा यंत्राशी मरेमरेतों ते काम. सायंकाळीं मेल्यासारखें घरीं जाऊन पडायचे! अरेरे! ना जीवनांत आनंद, ना विविधता, ना सुख, ना संगीत! वर्षानुवर्षं हे लोक हें सारें कसें सहन करीत असतील ?

वेदपुरुष : जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे.

वसंता : पुरे हे दृश्य. हृदय फाडणारें हें दृश्य आहे.

वेदपुरुष : तुझें हृदय फाटत आहे, परंतु कारखानदारांची आनंदाने फुगत आहेत, सुखाने ओसंडत आहेत.

. . .