भगवान बुद्ध
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

भगवान बुद्ध : **प्रस्तावना 3

गौतम बुद्धांचे चरित्र

**प्रस्तावना 2   **प्रस्तावना 4

धम्मपद, थेरगाथा आणि थेरीगाथा हे तीन ग्रंथ गाथा सदराखाली येतात, असे बुद्धघोषाचार्याचे म्हणणे आहे. परंतु थेर आणि थेरी गाथा बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर तीन-चार शतके अस्तित्त्वात असतील असे वाटत नाही; आणि धम्मपद तर अगदीच लहानसा ग्रंथ. तेव्हा गाथा म्हणजे तो एकच ग्रंथ होता किंवा दुसर्‍या काही गाथांचा या विभागात समावेश होत असे हे सांगणे कठीण आहे.

वर दिलेल्या खुद्दकनिकायाच्या यादीत उदानाचा उल्लेख आलाच आहे. त्यातील उदाने व तशाच प्रकारची सुत्तपिटकात इतर ठिकाणी आलेली वचने यांना उदान म्हणत असत, असे बुद्धघोषाचार्याचे म्हणणे आहे. परंतु त्यापैकी अशोकसमकाली किती उदाने अस्तित्वात होती हे सांगता येणे शक्य नाही. मागाहून त्यांच्यात भर पडत गेली यात शंका नाही.

इतिवुत्तक प्रकरणात ११२ इतिवुत्तकांचा संग्रह आहे. त्यांपैकी काही इतिवुत्तके अशोककाली किंवा त्यानंतर एखाद्या शतकात अस्तित्वात होती; मागाहून त्यांची संख्या वाढत गेली असावी.

जातक नावाच्या कथा सुप्रसिद्ध आहेत; आणि त्यांपैकी काही कथातील देखावे सांची आणि बर्हुत येथील स्तूपांच्या आजूबाजूला कोरलेले आढळतात. यावरून अशोकसमकाली जातकाच्या बर्‍याच कथांचा बौद्ध वाङ्मयात प्रवेश झाला होता. असे अनुमान करता येते.

अब्भुतधम्म म्हणजे अद्भूत चमत्कार. बुद्ध भगवंताने आणि त्याच्या प्रमुख श्रावकांनी केलेल्या अद्भुत चमत्कारांचे ज्यात वर्णन होते असा एखादा ग्रंथ त्या काळी अस्तित्वात होता असे दिसते. परंतु आता या अद्भुत धर्माचा मागमूस राहिला नाही. त्यातले सर्व भाग सध्याच्या सुत्तपिटकात मिसळून गेले असावेत. बुद्धघोषाचार्याला देखील अद्भूतधर्म काय होता, हे सांगणे कठीण पडले. तो म्हणतो, ‘चत्तारोमे भिक्खवे अच्छरिया अब्भुता धम्मा आनन्दे ति आदिनयपत्ता सब्बे पि अच्छरियब्भुतधम्मपटिसंयुक्ता सुत्तन्ता अब्भुतधम्मं ति वेदितब्बा।’ (भिक्षूहो, हे चार आश्चर्य अद्भूतधर्म आनन्दामध्ये वास करतात, इत्यादि प्रकारे अद्भूतधर्माने सुरू झालेली आश्चर्य- अद्भूतधर्मानी युक्त असलेली सर्व सूत्रे अब्भुतधम्म समजावी.’) पण या अद्भूतधर्माचा आणि मूळच्या अब्भुतधम्म ग्रंथाचा काही संबंध दिसत नाही.

महावेदल्ल व चूळवेदल्ल अशी दोन सूत्रे मज्झिमनिकायात आहेत. त्यावरून  वेदल्ल हे प्रकरण कसे होते याचे अनुमान करता येते. त्यांपैकी पहिल्या सुत्तात महाकोट्ठित सारिपुत्ताला प्रश्न विचारतो आणि सारिपुत्त त्या प्रश्नांची यथायोग्य उत्तरे देतो. दुसर्‍यात धम्मदिन्ना भिक्षुणी आणि तिचा पूर्वाश्रमातील पति विशाख या दोघांचा तशाच प्रकारे प्रश्नोत्तररुपाने संवाद आहे. ही दोन्ही सुत्ते बुद्धभाषित नव्हता. परंतु तशाच रीतीच्या संवादांना वेदल्ल म्हणत असत. श्रमण, ब्राह्मण आणि इतर लोकांबरोबर बुद्ध भगवंतांचे जे संवाद झाले असतील, त्यांचा एक निराळा संग्रह करण्यात आला होता व त्याला वेदल्ल हे नाव देण्यात आले होते, असे दिसते.

ही नऊ अंगे अस्तित्वात येण्यापूर्वी सुत्त आणि गेय्य ह्या दोनच अंगांत बाकीच्या अंगांचा समावेश करण्यात येत होता, असे महासुञ्ञतासुत्तातील खालील मजकुरावरून दिसून येते :- बुद्ध भगवान आनंदाला म्हणतो, "न खो आनन्द अरहति सावको सत्यांर अनुबद्धितुं यदिदं सुत्तं गैय्यं वेय्याकरणस्स हेतु। तं किस्स हेतु। दीघरत्तं हि वो आनन्द धम्मा सुत्ता धाता वचसा परिचिता.." (‘हे आनन्द, सुत्त आणि गेय्य यांच्या वेय्यकरणासाठी (स्पष्टीकरणासाठी) श्रावकाने शास्त्या (गुरूच्या) बरोबर फिरणे योग्य नाही. का की, तुम्ही या गोष्टी ऐकल्याच आहेत; आणि तुम्हाला त्या परिचित आहेत.’) म्हणजे सुत्त आणि गेय्य एवढय़ांतच बुद्धोपदेश होता आणि वेय्याकरण किंवा स्पष्टीकरण श्रावकावर सोपविण्यात आले होते. होता होता त्यात आणखी सहा अंगांची भर पडली, आणि पुढे त्यातील काही अंगांची भेसळ करून सध्याची बरीच सुत्ते बनविण्यात आली. त्यात बुद्धाचा खरा उपदेश कोणता व बनावट कोणता हे सांगणे जरी कठीण जाते, तरी अशोकाच्या भाब्रा किंवा भाब्रू शिलालेखाच्या आधारे पिटकांतील प्राचीन भाग कोणते असावेत याचे अनुमान करता येणे शक्य आहे.
. . .