भगवान बुद्ध
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

भगवान बुद्ध : प्रकरण एक ते बारा 54

गौतम बुद्धांचे चरित्र

प्रकरण एक ते बारा 53   प्रकरण एक ते बारा 55

विमुत्तिसुखाचा आस्वाद

तत्त्वबोध झाल्यावर बुद्ध भगवान त्याच बोधिवृक्षाखाली सात दिवस बसून विमुत्तिसुखाचा आस्वाद घेत होता आणि त्या प्रसंगी रात्रीच्या तीन यामात त्याने खाली दिलेला प्रतीत्यसमुत्पाद सुलटउलट मनात आणला, असे महावग्गात म्हटले आहे. परंतु संयुत्तनिकायातील दोन सुत्तात बुद्धाने बोधिसत्त्वावस्थेत असतानाच हा प्रतीत्यसमुत्पाद जाणला असे सांगितले आहे.  या सुत्तांचा व महावग्गातील मजकुराचा मेळ बसत नाही. महावग्ग लिहिला त्या वेळी या प्रतीत्यसमुत्पादाला भलतेच महत्त्व आले होते असे वाटते. नागार्जुनासारख्या महायानपंथाच्या आचार्यांनी तर या प्रतीत्यसमुत्पादाला आपल्या तत्त्वज्ञानाचा पाया बनविले.

प्रतीत्यसमुत्पाद

तो प्रतीत्यसमुत्पाद संक्षेपत: येणेप्रमाणे –

अविद्येपासून संस्कार, संस्कारापासून ज्ञान, विज्ञानापासून नामरूप, नामरूपापासून षडायतन, षडायतनापासून स्पर्श, स्पर्शापासून वेदना, वेदनेपासून तृष्णा, तृष्णेपासून उपादान, उपादानापासून भव, भवापासून जाति (जन्म), आणि जातीपासून जरा, मरण, शोक, परिदेवन, दु:ख, दौर्मनस्य, उपायास हे उत्पन्न होतात.

पूर्ण बैराग्याने अविद्येचा निरोध केला असता संस्काराचा निरोध होतो. संस्काराच्या निरोधाने विज्ञानाचा निरोध होतो. विज्ञानाच्या निरोधाने नामरूपाचा निरोध होतो. नामरूपाच्या निरोधाने षडायतनाचा निरोध, षडायतनाच्या निरोधाने स्पर्शाचा निरोध, स्पर्शाच्या निरोधाने वेदनेचा निरोध, वेदनेच्या निरोधाने तृष्णेचा निरोध, तृष्णेच्या निरोधाने उपादनाचा निरोध, उपादानाच्या निरोधाने भवाचा निरोध, भवाच्या निरोधाने जन्माचा निरोध, जन्माच्या निरोधाने जरा, मरण, शोक, परिवेदन, दु:ख दीर्मनस्य, उपायास यांचा निरोध होतो.

दु:खाच्या मागे एवढी कारणपरंपरा जोडल्याने ते सामान्य जनतेला समजणे बरेच कठीण झाले. होता होता या प्रतीत्यसमुत्पादाला गहन तत्त्वज्ञानाचे स्वरूप आले आणि त्याच्यावरच वादविवाद होऊ लागले. नागार्जुनाचार्याने आपली माध्यमककारिता या प्रतीत्यसमुत्पादाच्या पायावरच लिहिली आहे, आणि बुद्धघोषाचार्याने विशुद्धिमार्गाचा एकषष्ठांश भाग (जवळ जवळ असे सव्वाशे पृष्ठे) याच्या विवेचनात खर्च केला आहे. ही सगळी चर्चा वाचल्यावर विद्वान मनुष्य देखील घोटाळ्यात पडत, मग सामान्य जनतेला हे तत्त्वज्ञान समजावे कसे? बुद्ध भगवन्ताचा धर्म ब्राह्मण, क्षत्रिय वगैरे उच्च वर्णाच्या लोकांपेक्षा खालच्या वर्गाच्या लोकांत विशेष फैलावला तो अशा गहन तत्त्वज्ञानामुळे नव्हे. चार आर्यसत्यांचे तत्त्वज्ञान अगदी साधे आहे. ते सर्व प्रकारच्या लोकांना पटले, यात मुळीच नवल नाही. याचा विचार लौकरच करण्यात येईल.
. . .