भगवान बुद्ध (उत्तरार्ध)
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

भगवान बुद्ध (उत्तरार्ध) : आत्मवाद 10

गौतम बुद्धांचे चरित्र

आत्मवाद 9   आत्मवाद 11

'हे मालुंक्यपुत्ता, जग हे शाश्वत आहे किंवा अशाश्वत आहे अशी दृष्टि आणि विश्वास असला, तरी त्यापासून धार्मिक आचरणाला मदत होईल असें नाही. जग शाश्वत आहे असा विश्वास ठेवला, तरी जरा, मरण, शोक, परिदेव, यांजपासून मुक्तता होत नाही. त्याचप्रमाणें जग शाश्वत नाही, शरीर आणि आत्मा एक आहे, शरीर आणि आत्मा भिन्ना आहे, मरणोत्तर तथागताला पुनर्जन्म होतो, किंवा होत नाही, इत्यादिक गोष्टिंवर विश्वास ठेवला, न ठेवला, तरी जन्म, जरा, मरण परिदेव आहेतच आहेत. म्हणून, मालुक्यपुत्ता, या गोष्टींचा खल करण्याच्या भरीला मी पडलों नाही. कां की, त्या वादविवादाने ब्रह्मचर्याला कोणत्याही प्रकारें स्थैर्य येण्याचा संभव नाही. त्या वादाने वैराग्य उत्पन्न होणार नाही, पापाचा निरोध होणार नाही, आणि शांति, प्रज्ञा, संबोध व निर्वाण यांचा लाभ व्हावयाचा नाही.

'परंतु मालुंक्यपुत्ता, हें दु:ख आहे, हा दु:खाचा समुदय आहे, हा दु:खाचा निरोध आहे, आणि हा दु:खनिरोधाचा मार्ग आहे, हें मी स्पष्ट करून दाखविलें आहे. कारण हीं चार आर्यसत्यें ब्रह्मचर्याला स्थैर्य आणणारीं आहेत, यांजमुळे वैराग्य येतें, पापाचा निरोध होतो, शांति, प्रज्ञा, संबोध व निर्वाण यांचा लाभ होतो. म्हणून हे मालुंक्यपुत्ता, ज्या गोष्टींची मी चर्चा केली नाही, त्या गोष्टींची चर्चा करूं नका; ज्या गोष्टीचे मी स्पष्टीकरण केलें आहे, त्या स्पष्टीकरणाला योग्य होत असें समजा.'

याचा अर्थ असा की, आत्मा पंचस्कन्धांचा बनलेला आहे, तरी त्याचा आकार वगैरे कसा असतो, तो जसाच्या तसा परलोकी जातो की काय, इत्यादि गोष्टींचा खल केल्याने ब्रह्मघोटाळा माजून राहणार. जगांत दु:ख विपुल आहे, आणि तें मनुष्यजातीच्या तृष्णेने उत्पन्न झालें असल्यामुळे अष्टांगिक मार्गाच्या द्वारे त्या तृष्णेचा निरोध करून जगांत सुखशांति स्थापन करणें प्रत्येक व्यक्तीचें कर्तव्य आहे. हा सरळ रस्ता, व हेंच बुध्दाचें तत्त्वज्ञान.

ईश्वरवाद

बुध्द ईश्वराला मानीत नव्हता, म्हणून तो नास्तिक होता, अशी कांही लोकांची समजूत आहे. बौध्द वाङमय किंवा प्राचीन उपनिषदें वाचलीं असतां या समजुतींत तथ्य नाही, असें दिसून येतें. तथापि हा लोकभ्रम दूर करण्यासाठी बुध्दसमकालीं प्रचलित असलेल्या ईश्वरवादाचें दिग्दर्शन करणें योग्य वाटतें.

खास ईश्वर शब्दाचा अड:गुत्तरनिकायाच्या तिकनिपातांत (सुत्त नं. ६१) आणि मज्झिमनिकायांतील देवदहसुत्तांत ( नं १०१) उल्लेख आला आहे. यांपैकी ईश्वरासंबंधींचा पहिल्या सुत्तांतील मजकूर असा:-

भगवान् म्हणतो, '' भिक्षुहो, जें कांही सुख, दु:ख किंवा उपेक्षा मनुष्य प्राणी भोगतो तें सर्व ईश्वरनिर्मित आहे (इस्सरनिम्मानहेतु) असें प्रतिपादणार्‍याना आणि मानणार्‍याना मी विचारतों की, त्यांचें हें मत आहे काय? आणि त्यांनी 'होय' असें उत्तर दिल्यावर मी म्हणतों, तुम्ही प्राणघातकी, चोर, अब्रह्मचारी, असत्यवादी, चहाडखोर, शिवीगाळ करणारे, बडबडणारे, दुसर्‍याचें धन इच्छिणारे, द्वेष्टे आणि मिथ्यादृष्टिक ईश्वराने निर्मिल्यामुळेच झालां की काय ? भिक्षुहो, हें सर्व ईश्वराने निर्माण केलें असे सत्य मानलें, तर (सत्कर्माविषयी) छंद आणि उत्साह राहणार नाही; अमुक करावें, किंवा अमुक करूं नये, हें देखील समजणार नाही. ''

या ईश्वरनिर्माणाचा उल्लेख देवदहसुत्तांत देखील आला आहे. परंतु हा मजकुर प्रक्षिप्त असावा, अशी बळकट शंका येते. कारण, दुसर्‍या कोणत्याही सुत्तांत ही कल्पना आढळत नाही. बुध्दसमकालीन मोठा देव म्हटला म्हणजे ब्रह्मा होय. पण तो निराळया तर्‍हेचा कर्ता आहे; बायबलातील देवासारखा नाही. जग होण्यापूर्वी तो नव्हता.विश्व उत्पन्न झाल्यावर प्रथमत: तो अवतरला, आणि त्यानंतर इतर प्राणी झाले, त्यामुळे त्याला भूतभव्यांचा कर्ता म्हणूं लागले. ब्रह्मजालसुत्तांत आलेल्या त्याच्या वर्णनाचा सारांश असा :-
. . .