भगवान बुद्ध (उत्तरार्ध)
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

भगवान बुद्ध (उत्तरार्ध) : आत्मवाद 12

गौतम बुद्धांचे चरित्र

आत्मवाद 11   कर्मयोग 1

प्रजातीची उत्पत्ति

प्रजापति म्हणजे जगत्कर्ता ब्रह्मा, त्याची उत्पत्ति बृहदारण्यकांत सांगीतली आहे, ती येणेंप्रमाणे :-

आप एवेदमग्र आसुस्ता आप: सत्यमसृजन्त, सत्यं ब्रह्म, ब्रह्म प्रजापतिं, प्रजापतिर्देवांस्ते देवा: सत्यमेवोपासते॥ (५।५।१).

'सर्वांपूर्वी पाणी तेवढें होतें. त्या पाण्याने सत्य, सत्याने ब्रह्म, ब्रह्माने प्रजापति व प्रजापतीने देव उत्पन्न केले; ते देव सत्याचीच उपासना करतात.'

बायबलात देखील जलप्रलयांनतर सृष्टीची उत्पत्ति पुनरपि झाल्याची कथा आहे, पण देवाने आगाऊच नोहाचें कुटुंब व पशुपक्षादिकांच्या नर व माद्या जहाजांत भरून ठेवावयास लावल्या, आणि मग जलप्रलय केला.*  उपनिषदात जलप्रलयापूर्वी काय होतें तें मुळीच सांगितलें नाही. एवढेंच नाही, तर सत्य ब्रह्मदेवाच्या आणि ब्रह्मतत्त्वाच्या देखील वरच्या पायरीवर ठेवलें आहे. ब्रह्मजालसुत्तांत दिलेली ब्रह्मोत्पत्तीची कथा या कथेशीं निकटतर आहे.

ईश्वर जगापासून भिन्न असून त्याने जग निर्माण केलें, ही कल्पना हिंदुस्थानांत शकांनी आंणली असावी. कां की, त्यापूर्वीच्या वाङमयांत ती तशा रूपाने आढळत नाही. तेव्हा, बुध्द ईश्वर मानीत नसल्यामुळे नास्तिक होता, असा त्याच्यावर आळ आणणें संभवनीयच नव्हतें. तो वेदनिंदक असल्यामुळे नास्तिक आहे, असा ब्राह्मण आरोप करीत, पण बुध्दाने वेदाची निंदा केलेली कोठे आढळत नाही. आणि ब्राह्मणांना मान्य झालेल्या सांख्यकारिकेसारख्या ग्रन्थांत वेदनिंदा काय कमी आहे?

दृष्टवदानुश्रविक:
स ह्यविशुद्विक्षयातिशययुक्त:।

'दृष्ट उपायाप्रमाणेच वैदिक उपाय देखील (निरूपयोगी ) आहे. कारण तो अविशुध्दि, नाश आणि अतिशय यांनी युक्त आहे.'

आणि त्रैगुण्यविषया वेदा:' इत्यादिक वेदनिंदा भगवद्वीतेंत सापडत नाही काय ? पण सांख्याने ब्राह्मणांच्या जातीभेदावर हल्ला केला नाही, आणि भगवद्वितेत तर त्या जातिभेदाला उघड उघड उचलून धरलें आहें.
तेव्हा त्यांना वेदनिंदा पचणें शक्य होतें. याच्या उलट बुध्दाने वेदनिंदा केली नसली, तरी जातिभेदावर जोराचा हल्ला केला. मग तो वेदनिंदक कसा ठरणार नाही? वेद म्हणजे जातिभेद, आणि जातिभेद म्हणजे वेद, असें ह्या दोंहोंचें ऐक्य आहे! जातिभेद नसला, तर वेद राहील कसा? आणि जातिभेद अस्तिवांत राहून वेदाचें एक अक्षरसुध्दा कोणाला माहीत नसलें, तरी वेदप्रामाण्यबुध्दि कायम असल्यामुळे वेद राहीलाच म्हणावयाचा !

बुध्दसमकालीन श्रवणब्राह्मणांत ईश्वरवादाला मुळीच महत्त्व नव्हतें, हें वरील विवेचनावरून दिसून येईलच. त्यांपैकी कांही ईश्वराच्या जागीं कर्माला मानीत, आणि कधी कधी बुध्द कर्मवादी नाही, अतएव नास्तिक आहे, असा बुध्दावर आरोप करीत. त्याचें निरसन पुढील प्रकरणांत करण्यांत येईल.
. . .