भगवान बुद्ध (उत्तरार्ध)
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

भगवान बुद्ध (उत्तरार्ध) : कर्मयोग 4

गौतम बुद्धांचे चरित्र

कर्मयोग 3   कर्मयोग 5

''आणिं, गृहस्थहो, चार प्रकारचें वाचेने घडणारे धर्माचरण कोणतें? एखादा मनुष्य खोटें बोलणें साफ सोडून देतो, सभेंत, परिषदेंत, किंवा राजद्वारी त्याची साक्ष विचारली असतां, तो जें जाणत नाही, तें जाणत नाही, आणि जें पाहिले नाहीत, तें पाहिले नाही, असें म्हणतो. येणेंप्रमाणें आपणांसाठी, परक्यासाठी किंवा थोडयाबहुत फायद्यासाठी खोटें बोलत नाही. तो चहाडी करण्याचें सोडून देतो, ह्या लोकांचे ऐकून त्या लोकांचा भेद पाडण्यासाठी ती गोष्ट त्यांना सांगत नाही, किंवा त्या लोकांचें ऐकून ह्यांना सांगत नाही; याप्रमाणें ज्यांच्यांत भांडणें झालीं  असतील त्यांची एकी करतो, आणि ज्यांच्यांत एकोपा आहे त्यांना उत्तेजन देतो. एकोप्यात त्याला आनंद वाटतो आणि एकोपा होईल असें भाषण करतो. तो शीवीगाळ करण्याचें सोडून देतो. तो सरळ, कानांला गोड लागणारें, ह्वदयंगम, नागरिकाला शोभणारें आणि बहुजनाला आवडणारें भाषण करतो. तो बडबड करीत नाही, प्रसंगानुसार, तथ्य, अर्थयुक्त, धार्मिक, शिष्टाचाराला अनुसरणारें, लक्षांत ठेवण्याजोगें, योग्य वेळीं, सकारणं, मुद्देसूद आणि सार्थक भाषण करतो. याप्रमाणें वाचेने चतुर्विध धार्मिक आचरण घडतें.

''आणि, गृहस्थहो, तीन प्रकारचें मानसिक धर्माचरण कोणते? एखादा मनुष्य परद्रव्याचा लोभ धरीत नाही, परसंपत्तीचीं साधने आपली व्हावीं असा विचार मनांत आणीत नाही, त्याचें चित्त द्वेषापासून मुक्त असतें, हे प्राणी अवैर, निर्बाध, दु:खरहित आणि सुखी होवोत, असा त्याचा शुध्द संकल्प असतो. तो सम्यकदृष्टि होतो. दानधर्म आहे, सुकृतदुष्कृत कर्मांचें फळ आहे, इहलोक परलोक आहे, इत्यादि गोष्टींवर त्याचा विश्वास असतो. याप्रमाणे मनाने  त्रिविध धर्माचरण घडतें.''

संक्षेपाने सांगावयाचें म्हटलें म्हणजे प्राणघात, अदत्तादान (चोरी) आणि काममिथ्याचार (व्यभिचार) हीं तीन कायिक पापकर्मे, असत्य, चहाडी, शिवीगाळ आणि वृथा बडबड हीं चार वाचसिक पापकर्मे, आणि परद्रव्याचा लोभ, इतरांच्या नाशाची इच्छा व नास्तिक द्दष्टि हीं तीन मानसिक पापकर्मे होत. ह्या दहांनाही अकुशल कर्मपथ म्हणतात. त्यांपासून निवृत होणें म्हणजे कुशल कर्मपथ. ते देखील दहा आहेत, आणि त्यांचें वर्णन वर आलेंच आहे. दहा अकुशल आणि दहा कुशल कर्मपंथाची वर्णंने त्रिपिटक वाङमयांतं पुष्कळ ठिकाणीं सापडतात. वरच्या उतार्‍यांत अकुशल कर्मपथांना अर्धाचरण व कुशल कर्मपंथांना अधर्माचरण म्हटलें आहे.

कुशल कर्मे व अष्टांगिक मार्ग

यांपैकी कुशल कर्मपंथाचा आर्य अष्टांगिक मार्गांत समावेश होतोच. तीन प्रकारचें कुशल कार्यकर्म म्हणजे सम्यक् कर्म, चार प्रकारचें कुशल वाचसिक कर्म म्हणजे सम्यक् वाचा, आणि तीन प्रकारचें मानसिक कुशल कर्म म्हणजे सम्यक द्दष्टि व सम्यक संकल्प बाकी राहिलेलीं आर्यं अष्टांगिक मार्गाचीं चार अंगें या कुशल कर्मपथांना पोषकच आहेत. सम्यक् आजीव, सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृति आणि सम्यक् समाधि या चार अंगाच्या यथातथ्य भावनेशिवाय कुशल कर्मपथाची अभिवृध्दि आणि पूर्णता व्हावयाची नाही.

अनासक्तियोग


केवळ कुशल करीत गेलों आणि जर त्यांत आसक्त झालों, तर त्यायोगें अकुशल उत्पन्न होण्याचा संभव आहे.

कुसलो धम्मो अकुसलस्स धम्मस्स आरम्मणपच्चयेन पच्चयो।

दानं दत्वा सीलं समादियित्वा उपोसथकम्मं कत्वा तं अस्सादेति अभिनन्दति। तं आरब्भ रागो उप्पज्जति दिट्ठि उप्पज्जति विचिकिच्छा उप्पज्जति उध्दच्चं उप्पज्जति दोमनस्सं उप्पज्जति। (तिकपट्ठान)

'कुशल मनोविचार अकुशलाला आलंबन प्रत्ययाने प्रत्यक्ष होतो. (एखादा मनुष्य) दान देतो, शील राखतो, उपोसथकर्म करतो, आणि त्याचा आस्वाद घेतो, त्याचें अभिनंदन करतो. त्यामुळे लोभ उत्पन्न होतो, दृष्टि उत्पन्न होते, शंका उत्पन्न होते, भ्रान्तता उत्पन्न होते, दौर्मनस्य उत्पन्न होतें.''

येणेंप्रामाणें कुशल मनोवृत्ति अकुशलाला कारणीभूत होत असल्यामुळे कुशल विचारामध्ये आसक्ति ठेवतां कामा नये, निरपेक्षपणें कुशल कर्म करीत राहिलें पाहिजे. हाच अर्थ धम्मपदांतील खालील गाथेंत संक्षेपाने दर्शविला आहे.

सब्बपापस्स अकरणं कुसलस्स उपसम्पदा।
सचित्तपरियोदपनं एतं बुध्दान सासनं॥

'सर्व पापांचें अकरण, सर्व कुशलाचें सम्पादन आणि स्वचित्ताचें संशोधन हें बुध्दाचें शासन होय.'

म्हणजे वर सांगितलेले सर्व अकुशल कर्मपथ पूर्णपणें वर्ज्य करावयाचे, आणि कुशल कर्मपंथांचें सदोदित आचरण करून त्यांत आपलें मन आसक्त होऊं द्यावयाचें नाही. हें सर्व अष्टांगिक मार्गाच्या अभ्यासाने घडून येतें.
. . .