भगवान बुद्ध (उत्तरार्ध)
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

भगवान बुद्ध (उत्तरार्ध) : कर्मयोग 6

गौतम बुद्धांचे चरित्र

कर्मयोग 5   कर्मयोग 7

ब्राह्मणांचा कर्मयोग

एथवर बुध्दाच्या कर्मयोगाचा विचार झाला. आता त्या काळच्या ब्राह्मणांत कोणत्या प्रकारचा कर्मयोग चालू होता, याचा थोडक्यांत विचार करणे इष्ट आहे. ब्राह्मणांचें उपजीविकेचें साधन म्हटलें म्हणजे यज्ञयाग असत आणि ते विधिपूर्वक करणें यालाच ब्राह्मण आपला कर्मयोग मानीत. त्यांनतर क्षत्रियांनी युध्द, वैश्यांनी व्यापार आणि शुद्रांनी सेवा करावी, हे त्यांचे कर्मयोग होत, असें ते प्रतिपादीत. त्यांत एखाद्याला कंटाळा आला, तर त्याने सर्वसंगपरित्याग करून रानावनांत जावें व तपश्चर्या करावी, याला संन्यास योग म्हणत. त्यांत त्याच्या कर्मयोगाचा अन्त होत असे. काही ब्राह्मण संन्यास घेऊन देखील अग्निहोत्रादिक कर्मयोग आचरीत असत, आणि त्यालाच श्रेष्ठ समजत. यांसंबधाने भगवदीतेंत म्हटलें आहे-

यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबंधन:।
तदर्थं कर्म कौंतेय मुक्तसंग: समाचर॥

'यज्ञाकरितां केलेल्या कर्माहून इतर कर्म लोकांना बंधनकारक होतें. म्हणून हे कौतेय, संग सोडून यज्ञासाठी तूं कर्म कर.'

सहयज्ञा : प्रजा: सृष्ट्वा पुरोवाच प्रजापति:।
अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक्॥

'पूर्वी( सृष्टीच्या आरंभी) यज्ञासह प्रजा उत्पन्न करून ब्रह्मदेव म्हणाला, '' तुम्ही या यज्ञाच्या योगाने वृध्दि पावाल; ही तुमची इष्ट कामधेनु होवो.'' आणि म्हणून,

एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह य:।
अघायुरिंद्रयारामो मोघं पार्थ स जीवति॥

'याप्रमाणे हें सुरू केलेलें (यज्ञयागाचें) चक्र या जगांत जो चालवीत नाही, त्याचें आयुष्य पापरूप असून तो इंद्रियलंपट व्यर्थ जगतो.'

ब्राह्मणांचा लोकसंग्रह

ब्राह्मणांचा लोकसंग्रह

परंतु जर एखाद्याच्या मनांत विचार आला की, प्रजापतीने प्रवर्तिलेले हें चक्र ठीक नाही, कारण त्याच्या बुडाशीं हिंसा आहे, तर तो मनांत येऊं देऊं नये; त्यामुळे अज्ञ जनांचा बुध्दीभेद होईल.

न बुध्दिभेदं जनयेदज्ञानां कर्मसंगिनाम।
जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्त: समाचरन्॥

'कर्मांत आसक्त असलेल्या अज्ञ जनांचा बुध्दिभेद करूं नये, विद्वान मनुष्याने युक्त होऊंन, म्हणजे सर्व कर्मे नीटपणें आचरून इतरांना तीं करण्यास लावावींत' (भ.गी.३।२६.हा गीतेचा सर्वचा अध्याय विचारणीय आहे.)

भगवद्गीता कोणत्या शतकांत लिहिली या वादांत पडण्याचें कारण नाही. परंतु कोणत्याही लेखकाने तिला बुध्दसमकालीन गणलें नाही. बुध्दानंतर पांचशे वर्षांपासून एक हजार वर्षांपर्यंत तिचा काळ भिन्न भिन्न अनुमानें पाश्चात्य पण्डितांनी केलीं आहेत. यांत शंका नाही की, ती बरीच आधुनिक आहे. तथापि येथे दर्शविलेले विचार बुध्दसमकालच्या ब्राह्मणांत प्रचलित होते. आपणाला जरी कुशल तत्व समजलें, तरी तें लोकांत प्रगट करूं नये, असें लोहित्य नांवाचा कोसलदेशवासी प्रसिध्द ब्राह्मण प्रतिपादीत असे.*

संक्षेपाने त्याची गोष्ट येणेंप्रमाणे -
. . .