भगवान बुद्ध (उत्तरार्ध)
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

भगवान बुद्ध (उत्तरार्ध) : यज्ञयाग 1

गौतम बुद्धांचे चरित्र

कर्मयोग 11   यज्ञयाग 2

प्रकरण नववें
यज्ञयाग
पौराणिक बुध्द


हिंदु लोक बुध्दाला विष्णूचा नववा अवतार मानतात. विष्णूने बुध्दावतार धारण करून असुरांना मोह पाडला व देवांकडून त्यांचा उच्छेद केला, अशी कथा विष्णुपुराणांत आली आहे. तिचा सारांश भागवतांतील खालील श्लोकांत सापडतो:-

तत: कलौ संप्रयाते संमोहाय सुरद्विषाम्।
बुध्दो नामाऽजनसुत: कीकटेषु भविष्यति॥

'त्यानंतर कलियुग आलें असतां, असुरांना मोह पाडण्यासाठी बुध्द नांवाचा अजनाचा पुत्र कीकट देशांत उत्पन्न होईल.'

सामन्य हिंदु लोकांना बुध्दावताराची विशेष माहिती नाही. शास्त्री पंडितांना आणि पुराण श्रवण करणार्‍या भाविक हिंदुंना बुध्दासंबधी जी काहीं माहिती आहे, ती विष्णुपुराणावरून किंवा भागवतावरून मिळालेली.

विष्णुशास्त्री यांची कल्पना

पाश्चात्य देशांत मॅक्सम्यूलर यांचे गुरू प्रसिध्द फ्रेंच पंडित बर्नुफ यांचे लक्ष प्रथमत: बौध्द धर्माकडे वेधलें, परंतु भरपूर सामग्री न मिळाल्यामुळे त्यांना या धर्माची सांगोपांग माहिती पाश्चात्यांसमोर मांडता आली नाही. तथापि बौध्द धर्म केवळ त्याज्य असून विचारांत घेण्याला योग्य नाही, अशी जी पाश्चात्य लोंकाची समजूत होती, तिला बर्नुफच्या प्रयत्नाने बराच आळा बसला: आणि त्याचा परिणाम असा झाला की, डॉ. विल्सन्सारखे ख्रिस्तभक्त देखील बौध्द धर्माचा अभ्यास करूं लागले, आणि त्यांच्या सहवासामुळे आमच्या इकडील कॉलेजांतून शिक्षण घेऊन निघालेल्या तरूण मंडळींची बौध्दधर्माविषयीं कल्पना बदलत चालली.

विष्णुशास्त्री चिपळूणकर आपल्या बाण कवींवरील निबंधांत म्हणतात, -
''आर्य लोकांचा मूळचा जो वैदिक धर्म त्यावर पहिला मतभेद बुध्द याने काढला. त्याच्या मतास कालगत्या पुष्कळ लोक अनुसरून धर्मांत दुफळी झाली व हे नवे लोक आपणास बौध्द असे म्हणवू लागले. यांचीं नवी मतें कोणतीं होतीं, यांचा उदय, प्रसार व लय केव्हा झाला व कशामुळे झाला, वगैरे गोष्टी इतिहासकारास मोठा मनोरंजक विषय होता; पण आता बोलून   उपयोग काय ? मागलीच दिलगीरीची गोष्ट पुन: एकवार येथे सांगितली पाहिजे की, इतिहासाच्या अभावास्तव या महालाभास आण एकंदर जगासह अंतरलों. असो; बुध्दाविषयी जरी आपणांस कांही माहिती नाही, तरी एवढी गोष्ट स्पष्ट दिसते की, त्याची बुध्दी लोकोत्तर असावी. कां की त्याच्या प्रतिपक्षांनी म्हणजे ब्राह्मणांनीही त्यास ईश्वराचा साक्षात नववा अवतार गणला! जयदेवाने 'गीतगोंविदा'च्या आरंभी म्हटले आहे-

निंदसी यज्ञविधेरहह श्रुतिजातं।
सदयह्वदयर्शितपशुघातं।
केशव धृतबुध्दशरीर जय जगदीश हरे॥(धृवपद)

....ख्रिस्ती शकाच्या आरंभाच्या सुमारास बुध्दाचे व ब्राह्यणांचे मोठे वाद होऊन त्यांत शंकराचार्यांनी बौध्दधर्माचें खंडन केलें, व पुन: ब्राह्मणधर्माची स्थापना केली. याप्रमाणें बौध्दांचा मोड झाल्यावर ते आपल्या खुषीनेच म्हणा किंवा राजाज्ञेने देशत्याग करूण कोणी तिबेटांत, कोणी चीनांत, तर कोणी लंकेत असे जाऊन राहिले.''

या उतार्‍यावरून त्या काळच्या इंग्लिश भाषाभिज्ञ हिंदूची बौध्दधर्मविषयक कल्पना कशा प्रकारची होती याचे अनुमान करतां येतें.
. . .