भगवान बुद्ध (उत्तरार्ध)
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

भगवान बुद्ध (उत्तरार्ध) : यज्ञयाग 6

गौतम बुद्धांचे चरित्र

यज्ञयाग 5   यज्ञयाग 7

'' हे ब्राह्मणा, हे तीन अग्नी त्याग करण्याला, परिवर्जनाला योग्य आहेत; त्यांचें सेवन करूं नये. ते कोणते? कामाग्नि, द्वेषाग्नि आणि मोहाग्नि. जो मनुष्य कामाभिभूत होतो, तो कायावाचामनें कुकर्म आचरतो आणि त्यामुळे मरणोत्तर दुर्गतीला जातो. त्याचप्रमाणें द्वेषाने आणि मोहाने अभिभूत झालेला मनुष्य देखील कायावाचामनें कुकर्मे आचरून दुगतीला जातो. म्हणून हे तीन अग्नि त्याग करण्याला, परिवर्जनाला योग्य आहेत; त्यांचें सेवन करूं नये.

'' हे ब्राह्मणा, या तीन अग्निंचा सत्कार करावा, त्यांना मान द्यावा, त्यांची पूजा आणि चांगल्या रितीने, सुखांने परिचर्या करावी. ते अग्नि कोणते? आहवनीयाग्नि(आहुनेय्यग्गि), गार्हपत्याग्नि (गहपतग्गि), व दक्षिणाग्नि (दक्खिणेय्यग्गि) * आईबापें आहवनीयाग्नि समजावा, आणि त्यांची मोठया सत्काराने पूजा करावी. बायकामुलें, दास कर्मकार गार्हपत्याग्नि आहेत असें समजावें, व त्यांची आदरपूर्वक पूजा करावी. श्रमणब्राह्मण दक्षिणाग्नि समजावा आणि त्याची सत्कारपूर्वक जा करावी. हे ब्राह्मणा, हा लांकडाचा अग्नि कधी पेटवावा लागतो, कधी त्याची उपेक्षा करावी लागते, व कधी विझवावा लागतो.''
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* हे तीन अग्नि ब्राह्मणी ग्रन्थांत प्रसिध्द आहेत.'दक्षिणाग्निर्गार्हपत्याहवनीयौ त्रयोऽग्नय:। (अमरकोश). यांची परिचर्या कशी करावी व तिचें फळ काय इत्यादि माहिती गृहयसूत्रादि ग्रन्थांत सापडते.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हें भगवंताचे भाषण ऐकून उग्दतशरीर ब्राह्मण त्याचा उपासक झाला, आणि म्हणाला, ''भो गोतम, पांचशें बैल, पांचशें गोहरे, पांचशें कालवडी, पांचशें बकरे व पांचशें मेंढे, या सर्व प्राण्यांना मी यूपांपासून मोकळे करतों. त्यांना जीवदान देतो. ताज गवत खाऊन आणि थंड पाणी पिऊन ते शीतल छायेंत आनंदाने राहोत.''

यज्ञांत तपश्चर्येचें मिश्रण

बुध्दसमकालीन यज्ञयागांत ब्राह्मणांनी तपश्चर्येचें मिश्रण केलें होतें. वैदिक मुनि जंगलांत राहून तपश्चर्या करूं लागले, तरी सवडीप्रमाणें मधून मधून लहान मोठा यज्ञ करीतच. याचीं एक दोन उदाहरणें तिसर्‍या प्रकरणांत दिलीं आहेतच. याशिवाय याज्ञवल्क्याचें उदाहरण घ्या . याज्ञवल्क्य मोठा तपस्वी आणि ब्रह्मिष्ठ समजला जात असे. असें असतां त्याने जनक राजाच्या यज्ञांत भाग घेतला, आणि शेवटीं एक हजार गाईंची दहा हजार सुवर्ण पादांसह दक्षिणा स्वीकारली.

परंतु यज्ञ आणि तपश्चर्या यांचें मिश्रण दुप्पट दु:खकारक आहे असें बुध्द भगवंताचें म्हणणें होतें. कन्दरक सुत्तांत   भगवंताने चार प्रकारचीं माणसें वर्णिली आहेत, तीं अशीं - (१) आत्मन्तप पण परन्तप नव्हे; (२) परन्तप पण आत्मन्तप नव्हे; (३) आत्मन्तप आणि परन्तप ; (४) आत्मन्तपही नव्हे आणि परन्तपही नव्हे.
. . .