भगवान बुद्ध (उत्तरार्ध)
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

भगवान बुद्ध (उत्तरार्ध) : यज्ञयाग 9

गौतम बुद्धांचे चरित्र

यज्ञयाग 8   यज्ञयाग 10

भगवान् आपल्या गावाजवळ आल्याचें वर्तमान ऐकतांच खाणुमत गावांतील ब्राह्मण एकत्र जमून भगवंताच्या दर्शनाला कूटदन्त ब्राह्मणाच्या वाडयावरून चालले. ते कोठे जातात, याची कूटदन्ताने चौकशी केली, आणि तो आपल्या हुजर्‍याला म्हणाला, ''या ब्राह्मणांना सांग की, मी देखील भगवंताच्या दर्शनाला जाऊ इच्छितों, तुम्ही जरा थांबा.''

कूटदन्ताच्या यज्ञासाठी पुष्कळ ब्राह्मण जमले होते. कूटदन्त भगवंताच्या दर्शनाला जाणार, हें वर्तमान ऐकल्याबरोबर ते त्याजपाशीं येऊन म्हणाले,''भो कूटदन्त, गोतमाच्या दर्शनाला तूं जाणार आहेस, ही गोष्ट खरी काय?
कूटदन्त - होय, मला गोतमाच्या दर्शनाला जावें असें वाटतें.

ब्राह्मण - भो कूटदन्त, गोतमाच्या दर्शनाला जाणें तुला योग्य नाही. जर तूं त्याच्या दर्शनाला जाशील, तर त्याच्या यशाची अभिवृध्दि आणि तुझ्या भेटीला यावें, आणि तू त्याच्या भेटीला जाऊं नये, हे चांगले. तूं उत्तम कुलांत जन्मला आहेस, धनाढय आहेस, विद्वान आहेस, सुशील आहेस, पुष्कळांचा आचार्य आहेतस, तुजपाशीं वेदमंत्र शिकण्यासाठी चोहोंकडून पुष्कळ शिष्य येतात. गोतमापेक्षा तूं वयाने मोठा आहेस, आणि मगधराजाने बहुमानपुरस्सर हा गाव तुला इनाम दिला आहे. तेव्हा गोतमाने तुझ्या भेटीला यावे, आणि तूं त्याच्या भेटीला जाऊं नये, हेंच योग्य होय.

कूटदन्त -- आता माझें म्हणणे काय ते ऐका. श्रमण गोतम थोर कुलांत जन्मलेला असून मोठया संपत्तीचा त्याग करून श्रमण झाला आहे. त्याने तरूण वयांत संन्यास घेतला. तो तेजस्वी व सुशील आहे. तो मधुर आणि कल्याणप्रद वचन बोलणारा असून पुष्कळांचा आचार्य आणि प्राचार्य आहे. तो विषयापासून मुक्त होऊंन शांत झाला आहे. तो कर्मवादी आणि क्रियावादी आहे. सर्व देशांतील लोक त्याचा धर्म श्रवण करण्याला येत असतात. तो सम्यक संबुध्द, विद्याचरणसंपन्न, लोकविद्, दम्य पुरूषांचा सारथि, देव-मनुष्यांचा शास्ता अशी त्याची कीर्ति सर्वत्र पसरली आहे. बिंबिसार राजा, तसाच अशी त्याची किर्ती सर्वत्र पसरली आहे. बिंबिसार राजा, तसाच पसेनदि कोसलराजा आपल्या परीवारासह त्याचा श्रावक झाला. या राजांना जसा, तसाच तो पौष्करसादीसारख्या ब्राह्मणांना पूज्य आहे. त्याची योग्यता एवढी असून सांप्रत तो आमच्या गावी आला आम्ही आमचा अतिथि समजले पाहिजे; आणि अतिथि या नात्याने त्याच्या दर्शनाला जाऊन त्याचा सत्कार करणें आम्हाला योग्य आहे.

ब्रा.- भो कूटदन्त, तूं जी ही गोतमाची स्तुति केलीस, तिजमुळे आम्हाला असे वाटतें की सदगृहस्थाने शंभर योजनांवर जाऊन देखील त्याची भेट घेणें योग्य होईल. चला, आपण सर्वच त्याच्या दर्शनाला जाऊं.

तेव्हा कूटदन्त या ब्राह्मणसमुदायासह आम्रयष्टिवनामध्ये भगवान् राहत होता तेथे आला, आणि भगवंताला कुशलप्रश्नादिक विचारून एका बाजूला बसला. त्या ब्राह्मणांपैकी कांही जण भगवंताला नमस्कार करून, कांही जण आपलें नामगोत्र कळवून आणि काही जण कुशलप्रश्नादिक विचारून एका बाजूला बसले.

आणि कूटदन्त भगवंताला म्हणाला,'' आपणाला उत्तम यज्ञविधि माहीत आहे, असें मी ऐकलें. तो जर आपण आम्हाला समजावून सांगाल, तर चांगले होईल.''
. . .