भगवान बुद्ध (उत्तरार्ध)
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

भगवान बुद्ध (उत्तरार्ध) : जातिभेद 2

गौतम बुद्धांचे चरित्र

जातिभेद 1   जातिभेद 3

जातिभेदाचा निषेध

याप्रमाणे क्षत्रिय जातीला महत्व आलें असलें, तरी त्यांचें प्रमुख कर्तव्य जें युध्द तें बुध्दाला मुळीच पसंत नसल्याकारणाने सर्वच जातिभेद त्याला निरूपयोगी वाटला, आणि त्याचा त्याने सर्वथैव निषेध केला. इतर श्रमणांच्या पुढार्‍यांनी बुध्दाप्रमाणे जातीचा निषेध केल्याचा दाखला सापडत नाही. त्यांच्या संघांत जातिभेदाला थारा नव्हताच. परंतु त्यांच्या उपासकवर्गांत अस्तित्वांत असलेल्या जातिभेदाला त्यांनी विरोध केला नसावा. तें काम बुध्दाने केले. तें कसें हें पाहूं.

जातिभेदाविरूध्द बुध्दाने उपदेशिलेलें सर्वांत प्राचीन असें वासेट्ठसुत्त सुत्तनिपातांत आणि मज्झिमनिकायांत सापडतें. त्याचा सारांश असा -

एके समयीं बुध्द भगवान् इच्छानंगल नांवाच्या गावाजवळ इच्छानंगल उपवनांत राहत होता. त्या काळीं पुष्कळ प्रसिध्द ब्राह्मण इच्छानंगल गावीं होते. त्यांपैकी वसिष्ठ आणि भारद्वाज या दोन तरूण ब्राह्मणांमध्ये 'मनुष्य जन्माने श्रेष्ठ होतो किंवा कर्माने ' हा वाद उपस्थित झाला.

भारद्वाज आपल्या मित्राला म्हणाला, ''भो वासिष्ठ, ज्याच्या आईच्या बाजूला आणि बापाच्या बाजूला सात पिढया शुध्द असतील, ज्याच्या कुलांत सात पिढयांत वर्णसंकर झाला नसेल, तोच ब्राह्मण श्रेष्ठ होय.''

वासिष्ठ म्हणाला, '' भो भारद्वाज, जो मनुष्य शीलसंपन्न आणि कर्तव्यदक्ष असले त्यालाच ब्राह्मण म्हणावे.''

पुष्कळ वादविवाद झाला. तथापि ते दोघे परस्परांचें समाधान करूं शकले नाहीत. शेवटीं वसिष्ठ म्हणाला,'' भो भारद्वाज, आमचा हा वाद येथे तुटावयाचा नाही. हा श्रमण गोतम आमच्या गावाजवळ राहत आहे. तो बुध्द आहे, पूज्य आहे, आणि सर्व लोकांचा गुरू आहे. अशी त्याची कीर्ति सर्वत्र पसरली आहे. आपण त्याजपाशी जाऊन आपला  मतभेद कळवूं, आणि तो जो निकाल देईल, तो मान्य करूं.''

तेव्हा ते दोघे बुध्दापाशीं गेले आणि बुध्दाला कुशलप्रश्नादि विचारून एका बाजूला बसले. आणि वसिष्ठ म्हणाला, ''भो गोतम, आम्ही दोघे सुशिक्षित ब्राह्मणकुमार आहोंत. हा तारूक्ष्याचा शिष्य आणि मी पौष्करसादीचा शिष्य आहें. आमचा जातिभेदासंबंधाने विवाद आहे. हा म्हणतो, जन्मामुळे ब्राह्मण होतो, आणि मी म्हणतों, कर्मामुळे ब्राह्मण होतो. आपली कीर्ति ऐकून आम्ही येथे आलों आहोत. आपण आमच्या वादाचा निकाल द्यावा.''
. . .