भगवान बुद्ध (उत्तरार्ध)
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

भगवान बुद्ध (उत्तरार्ध) : जातिभेद 4

गौतम बुद्धांचे चरित्र

जातिभेद 3   जातिभेद 5

बराच वेळ भवति न भवति झाल्यावर ते ब्राह्मण आश्वलायनाला म्हणाले,'' भो आश्वलायन, तूं परिव्राजकधर्माचा अभ्यास केला आहेस, आणि युध्दावाचून पराजित होणें तुला योग्य नाही.''

आश्वलायन म्हणाला,''गोतमाशीं वाद करणें जरी कठिण आहे, तरी तुमच्या आग्रहास्तव मी तुमच्याबरोबर येतों.''

तदनंतर आश्वलायन त्या ब्राह्मणसमुदायासह बुध्द भगवंताजवळ गेला, आणि कुशलसमाचारादिक विचारून झाल्यावर ते सर्वजण एका बाजूला बसले. तेव्हा आश्वलायन म्हणाला,'' भो गोतम, ब्राह्मण म्हणतात,'ब्राह्मण वर्णच श्रेष्ठ आहे, इतर वर्णहीन आहेत. ब्राह्मण शुक्ल आहे, इतर वर्ण कृष्ण आहेत. ब्राह्मणांच मोक्ष मिळतो, इतरांना नाही. ब्राह्मण ब्रह्मदेवाच्या मुखापासून झाले. ते त्याचे औरस पुत्र. अर्थात् तेच ब्रह्मदेवाचे दायाद होत.' भो गोतम, यासंबंधीं आपलें मत काय?''

भगवान - हे आश्वलायना, ब्राह्मणांच्या बायका ऋतुमती होतात, गरोदर होतात, प्रसूत होतात, आणि मुलांना दूध पाजतात. याप्रमाणें ब्राह्मणांची संतति इतर वर्णासारखीच मातेच्या उदरांतून जन्मली असतां, ब्राह्मणांनी आपण ब्रह्मदेवाच्या मुखापासून उत्पन्न झालों, असे म्हणावें, हे आश्चर्य नव्हे काय?

आ. - भो गोतम, आपण कांही म्हणा. पण ब्राह्मण ब्रह्मदेवाचे दायाद आहेत, यावर ब्राह्मणांचा पूर्ण विश्वास आहे.

भ.- हे आश्वलायन, यौन, कांबोज वगैरे सरहद्दीवरील प्रदेशांत आर्य आणि दास असे दोनच वर्ण असून कधीकधी आर्याचा दास आणि दासाचा आर्य होतो, ही गोष्ट तुझ्या ऐकण्यांत आलीं आहे काय?

आ.- होय, असें मी ऐकलें आहे.

भ.- असें जर आहे, तर ब्रह्मदेवाने ब्राह्मणांना मुखापासून उत्पन्न केलें व ते सर्व वर्णांत श्रेष्ठ आहेत, ह्या म्हणण्याला आधार काय?

आ.- आपलें म्हणणें कांही असो, पण ब्राह्यणांची अशी बळकट समजूत आहे की, ब्राह्मण वर्णच काय तो श्रेष्ठ, आणि इतर वर्ण हीन आहेत.

भ.- क्षत्रियाने, वैश्याने किंवा शूद्राने प्राणघात, चोरी, व्यभिचार, खोटें भाषण, चहाडी, शिवीगाळ, वृथा बडबड केली, लोकांच्या धनावर दृष्टि ठेवली, द्वेषबुध्दि वाढविली, नास्तिकपणा अंगीकारला, तर तोच काय तो देहत्यागानंतर नरकाला जाईल; पण ब्राह्मणाने हीं कर्मे केलीं, तरी तो नरकाला जाणार नाही, असें तुला वाटतें काय?
. . .