भगवान बुद्ध (उत्तरार्ध)
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

भगवान बुद्ध (उत्तरार्ध) : मांसाहार 1

गौतम बुद्धांचे चरित्र

जातिभेद 15   मांसाहार 2

प्रकरण अकरावे
मांसाहार
बुध्द भगवन्ताचा मांसाहार

परिनिर्वाणाच्या दिवशीं बुध्द भगवंताने चुन्द लोहाराच्या घरीं डुकराचें मांस खाल्लें, आणि आजकालचे बौध्द भिक्षु देखील कमी जास्ती प्रमाणाने मांसाहार करतात; तेव्हा असा प्रश्न उपस्थित होतो की, अहिंसेला परमधर्म समजणार्‍या बुध्दाचें आणि त्याच्या अनुयायांचें हें वर्तन क्षम्य आहे काय? या प्रश्नांची चर्चा करणें योग्य वाटतें.

बुध्दाने परिनिर्वाणाच्या दिवशीं जो पदार्थ खाल्ला त्याचे नाव 'सूकरमद्दव' होतें. त्याच्यावर बुध्दघोषाचार्यांची टीका आहे ती अशी '' सूकरमद्दवं ति नातितरूणस्स नातिजिण्णस्स एक जेठ्ठकसूकरस्स पवत्तमंसं। तं किर मुदुं चेव सिनिद्वं च होति । तं पटियादापेत्वा साधुकं पचापेत्वा ति अत्थो। एके भणन्ति, सूकरमद्दवं ति पन मुदुओदनस्स पञ्चगोरसयूसपाचनविधानस्स नाममेतं, यथा गवपानं नाम पाकनामं ति। केचि भणन्ति सूकरमद्दवं नाम रसायनविधि, तं पन रसायनत्थे आगच्छति, तं चुन्देन भगवतो परिनिब्बानं न भवेय्या ति रसायनं पटियत्तं ति।''

'सूकरमद्दव म्हणजे फार तरूण नव्हे व फार वृध्द नव्हे, पण जो अगदी लहान पोराहून वयाने मोठा अशा डुकराचें शिजविलेलें मांस. तें मृदु आणि स्निग्ध असतें. तें तयार करवून म्हणजे उत्तम रीतीने शिजवून असा अर्थ समजावा. कित्येक म्हणतात, पंचगोरसाने तयार केलेल्या मृदु अन्नाचें हें नांव आहे, जसें गवपान हें एका विशिष्ट पक्वान्नाचें नावं. कोणी म्हणतात, सूकरमद्दव नांवाचें एक रसायन होतें. रसायनार्थी त्या शब्दाचा उपयोग करण्यांत येतो. भगवन्ताचें परिनिर्वाण होऊं नये, एतदर्थ तें चुन्दाने भगवंताला दिलें.'

या टीकेत सूकरमद्दव शब्दाचा मुख्य अर्थ सूकरमांस असाच करण्यांत आला आहे. तथापि तो अर्थ बरोबर होता, याजबद्दल बुध्दघोषाचार्याला खात्री नव्हती. कां की, त्याच वेळीं ह्या शब्दाचे आणखी दोन अर्थ करण्यांत येत असत. याशिवाय दोन भिन्न अर्थ उदानअट्टकथेंत सापडतात, ते असे-

''केचि पन सूकरमद्दंव ति न सूकरमंसं, सकरेहि मद्दितवंसकळीरो ति वदन्ति । अञ्ञे सूकरेहि मद्दितपदेसे जातं अहिच्छत्तकं ति।''

'कोणी म्हणतात, सूकरमद्दव म्हणजे डुकराचें मांस नव्हे. डुकरांनी तुडवलेल्या वेळूचा तो मोड. दुसरे म्हणतात, डुकरांनी तुडविलेल्या जागीं उगवलेलें अळंबे.'

याप्रमाणे सूकरमद्दव शब्दाच्या अर्थासंबधाने पुष्कळच मतभेद आहेत. तथापि बुध्द भगवान सूकरमांस खात होता, याला अंगुत्तंरनिकायाच्या पंचकनिपातांत आधार सापडतो. उग्ग गहपति म्हणतो-
. . .