भगवान बुद्ध (उत्तरार्ध)
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

भगवान बुद्ध (उत्तरार्ध) : मांसाहार 5

गौतम बुद्धांचे चरित्र

मांसाहार 4   मांसाहार 6

बौध्द आणि जैन श्रमणांच्या मांसाहारांत फरक

मांसाहारासंबधाने जैनांचा आणि बौध्दांचा वाद कशा प्रकारचा होता, याचा विचार केला असतांही श्री गोपाळदास यांचेच म्हणणें बरोबर आहे असें ठरतें.

वैशालीतील सिंह सेनापति निर्ग्रन्थांचा उपासक होता, याचा उल्लेख आठव्या प्रकरणांत आलाच आहे (पृ. ३२) बुध्दाचा उपदेश ऐकून तो बुध्दोपासक झाला व त्याने बुध्दाला आणि भिक्षुसंघाला आपल्या घरीं आमंत्रण देऊन आदरपूर्वक त्यांचें संतपर्ण केलें. पण निर्ग्रन्थांना ही गोष्ट रूचली नाही. त्यांनी वैशाली नगरींत अशी वंदता उठविली की, सिंहाने मोठा पशु मारून गोतमाला आणि भिक्षुसंघाला मेजवानी दिली आणि गोतमाला हें माहीत असतां, सिंहाने दिलेल्या भोजनाचा त्याने स्वीकार केला! ही बातमी एका गृहस्थाने येऊन हळूच सिंहाला सांगितली, तेव्हा तो म्हणाला,'' यांत कांही अर्थ नाही. बुध्दाची नालस्ती करण्यांत निर्ग्रन्थांना आनंद वाटतो. पण मी जाणून बुजून मेजवानीसाठी प्राण्यांची हिंसा करीन हें अगदीच असंभवनीय आहे.''
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* म्हणजे १९३८ साली.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अशाच तर्‍हेचा दुसरा एक उतारा मज्झिमनिकायांतील (५५ व्या ) जीवक सुत्तांत सापडतो तो असा -

एके समयीं भगवान राजगृह येथे जीवक कौमारभृत्याच्या आम्रवनांत राहत होता. तेव्हा जीवक कौमारभृत्य भगवंताजवळ आला, भगवंताला अभिवादन करून एका बाजूला बसला आणि म्हणाला, ''भदन्त, आपणाला उद्देशून प्राणी मारून तयार केलेले अन्न आपण खात असतां, असा आपणावर आरोप आहे, तो खरा आहे काय? ''भगवान् म्हणाला,''हा आरोप साफ खोटा आहे. आपल्यासाठी प्राणिवध केलेला आपण पाहिला, ऐकला किंवा तशी आपणांस शंका आली, तर तें अन्न निषिध्द आहे, असें मी म्हणतों.''

यावरून जैनांचा बुध्दावर आरोप कशा प्रकारचा होता हें समजून येतें. बुध्द भगवंताला कोणी आमंत्रण करून मांसाहार दिला असतां जैन म्हणत, श्रमण गोतमाकरितां पशु मारून तयार केलेलें (उद्दिस्सकटं) मांस तो खातो! स्वत: जैन साधु कोणाचें आमंत्रण स्वीकारीतच नसत. रस्त्यातून जात असतांना मिळालेली भिक्षा घेत आणि त्या प्रसंगी मिळालेले मांस खात.

कांही तपस्वी मांसाहार वर्ज्य करीत

बुध्दसमकालीन कांही तपस्वी लोक मांसाहार निषिध्द समजत. त्यापैकी एका तपस्व्याचा आणि काश्यप बुध्दाचा संवाद सुत्तनिपातांतील (१४ व्या ) आमगंध सुत्तांत सापडतो. त्या सुत्ताचें भाषांतर असें*
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* ह्या आमगंध सुत्तांतील उपदेशाची तुलना ख्रिस्ताच्या खाली दिलेल्या वचनाशी करावी. ''जे तोंडात जातें, ते माणसाला विटाळवीत नाही; पण जें तोंडातून निघते, तें विटाळवितें.'' (म्याथ्यू १५।११).
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
. . .