भगवान बुद्ध (उत्तरार्ध)
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

भगवान बुद्ध (उत्तरार्ध) : दिनचर्या 1

गौतम बुद्धांचे चरित्र

मांसाहार 10   दिनचर्या 2

प्रकरण बारावें
दिनचर्या
प्रसन्न मुखकान्ति

गोतमाच्या बोधिसत्वावस्थेंतील, म्हणजे त्याच्या गृहवासांतील आणि तपस्याकालांतील चर्येचा विचार चवथ्या व पांचव्या प्रकरणांत करण्यांत आलाच आहे. आता ह्या प्रकरणांत बुध्दत्वप्राप्तीपासून परिनिर्वाणापर्यंत त्याच्या दिनचर्येचें दिग्दर्शन करण्याचे योजिलें आहे.

तत्त्वबोध झाल्यानंतर बुध्द भगवंताने बोधिवृक्षाखालीच आपला पुढील जीवनक्रम आखला. तपश्चर्या तर त्याने सोडून दिलीच होती; आणि पुन्हा कामोपभोगांकडे वळण्याची त्याला वासना राहिली नाही. तेव्हा शरीरच्छादनापुरतें वस्त्र व क्षुधाशमनापुरतें अन्न ग्रहण करून अवशेष आयुष्य बहुजनहितार्थ लावण्याचा त्याने बेत केला. ह्या निश्चयाचा बुध्दाच्या मुखकान्तीवर कसा परिणाम झाला, याचें वर्णन मज्झिमनिकायांतील अरियपरियेसनसुत्तांत आणि विनयाच्या महावग्गांत आढळतें.

बुध्द भगवान पंचवर्गीयांना उपदेश करण्याच्या उद्देशाने गयेहून वाराणसीला चालला असतां वाटेत त्याला उपक नांवाचा आजीवक पंथांतील श्रमण भेटला आणि म्हणाला, ''आयुष्यमान् गोतमा, तुझा चेहरा प्रसन्न आणि अंगकान्ति तेजस्वी दिसत आहे. तूं कोणत्या आचार्याचा शिष्य आहेस?

भ.- माझा धर्ममार्ग मी स्वत: शोधून काढला आहे.
उपक - पणं तूं अरहन्त झाला आहेस काय? तुला जिन म्हणतां येईल काय?
भ.- हे उपका, मी सर्व पापकारक वृत्तींना जिंकले आहे, म्हणून जिन आहे.
उपकाला दिसलेली बुध्दाच्या मुखचर्येवरील प्रसन्नता शेवटपर्यंत कायम होती, असें समजण्यास हरकत नाही.  .

साधारण दिनचर्या

बुध्द भगवान पहाटेला उठत असे आणि त्या वेळीं ध्यानकरी, किंवा आपल्या वसतिस्थानाच्या आजूबाजूला चंक्रमण करी. सकाळच्या प्रहरीं तो गावांत भिक्षाटनासाठी जाई. त्याच्या भिक्षापात्रांत शिजवलेल्या अन्नाची सर्व जातीच्या लोकांकडून मिळालेली जी भिक्षा एकत्रित होई, ती घेऊन तो गावाबाहेर येत असे आणि तेथे भोजन करून थोडया अंतरावर ध्यानस्थ बसे. संध्याकाळी पुन्हा तो प्रवास करी. रात्री कोठे तरी एखाद्या देवालयात, धर्मशाळेंत किंवा झाडाखाली राही.

रात्रींच्या तीन यामांपैकी पहिल्या यामांत भगवान ध्यान करी, किंवा चंक्रमण करी. मध्यम यामांत आपली संघाटी चतुर्गुणित दुडून हातरीत असे आणि उशीला हात घेऊन उजव्या कुशीवर उजव्या पायावर डावा पाय ठेवून मोठया सावधगिरीने निजत असे.
. . .