भगवान बुद्ध (उत्तरार्ध)
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

भगवान बुद्ध (उत्तरार्ध) : दिनचर्या 9

गौतम बुद्धांचे चरित्र

दिनचर्या 8   दिनचर्या 10

वर्षावास

बुध्द भगवंताने उपदेशाला आरंभ केला तेव्हा त्याचे भिक्षु वर्षाकाळांत एका ठिकाणीं राहत नसत; चारी दिशांना हिंडून धर्मोपदेश करीत. इतर संप्रदायाचे श्रमण वर्षाकाळांत एका ठिकाणी राहत असल्यामुळे सामान्य जनांना बुध्द भिक्षूंचे हे वर्तन आवडले नाही. ते भिक्षूंवर टीका करू लागले; तेव्हा त्यांच्या समाधानाकरितां बुध्द भगवंताने, भिक्षूंनी वर्षाकाळांत निदान तीन महिने एका ठिकाणीं राहावें, असा नियम केला.*

महावग्गांत वर्षावासाची जी कथा आली आहे, तिचा हा सारांश. परंतु ती कथा सर्वथैव बरोबर असेल असें वाटत नाही. एक तर सगळे श्रमण वर्षाकाळी एकाच स्थळीं राहत होते असे नाही, आणि भगवंताने केलेल्या नियमालाही पुष्कळच अपवाद आहेत. चोरांचा किंवा असाच दुसरा उपद्रव उत्पन्न झाला असता वर्षाकाळीही भिक्षूला दुसरीकडे जाता येतें.

बुध्द भगवंताने उपदेशाला सुरवात केली, तेव्हा त्याची फारशी प्रसिध्दी नसल्यामुळे त्याली किंवा त्याच्या लहानशा भिक्षुसमुदायास वर्षावासासाठी एका ठिकाणीं राहता येणे शक्य नव्हतें. जेव्हा त्याची चोहोंकडे प्रसिध्दि झाली, तेव्हा प्रथमत: अनाथपिंडिक श्रेष्ठीने श्रावस्तीजवळ जेतवनांत त्याच्यासाठी एक मोठा विहार बांधला ; †
आणि काही काळाने विशाखा उपासिकेने त्याच शहराजवळ पूर्वाराम नांवाचा प्रासाद बांधून बौध्दसंघाला अर्पण केला. बुध्द भगवान उत्तर वयात बहुधा या दोन ठिकाणी वर्षाकाळीं राहत असे. इतर ठिकाणच्या उपासकांनी आमंत्रण केले असता वर्षाकाळासाठी भगवान बुध्द त्यांच्या गावी देखील जात असावा. वर्षाकाळापुरत्या झोपडया बांधून लोक भिक्षूंच्या राहण्याची व्यवस्था करीत. भगवंतासाठी एक निराळी झोपडी असे. तिला गंधकुटी म्हणत.

वर्षाकाळात आजूबाजूचे उपासक बुध्ददर्शनाला येत आणि धर्मोपदेश ऐकत. परंतु ते नित्य विहारांत आणून भिक्षा देत नसत. भिक्षूंना आणि बुध्द भगवंताला वहिवाटीप्रमाणे भिक्षाटन करावें लागे; क्वचितच गृहस्थांच्या घरी आमंत्रण असें.

आजारी भिक्षूंची चौकशी


भिक्षूंपैकी कोणी आजारी असला, तर बुध्द भगवान दुपारी ध्यानसमाधि आटपून त्याच्या समाचाराला जात असे. एकदा महाकाश्यप राजगृह येथे पिप्फली गुहेंत आजारी होता. त्यावेळी भगवान वेळुवनांत राहत असे; आणि तो संध्याकाळीं महाकाश्यपाच्या समाचाराला गेल्याची कथा बोज्झंगसंयुक्ताच्या चौदाव्या सुत्तांत आली असून पंधराव्या सुत्तांत दुसर्‍या एका प्रसंगी भगवान महामोग्गल्लानाच्या समाचाराला गेल्याची कथा आहे. या दोघांनाही भगवंताने सात बोघ्यंगांची आठवण करून दिली आणि त्यामुळे त्यांचा आजार शमला.

कांही दिवसांचा एकान्तवास

भगवान प्रवासात असला काय, किंवा वर्षाकाळीं एका ठिकाणी राहिला काय, दुपारीं एक दोन तास आणि रात्रीच्या पहिल्या व शेवटल्या यामात बराच वेळ ध्यानसमधींत घालवीत होता, हें वर सांगितलेंच आहे. याशिवाय, भगवान एकदा वैशालीजवळ महावनांतील कूटागार शाळेंत राहत असतां पंधरा दिवसपर्यंत एकान्तांत राहिला, भिक्षा घेऊन येणार्‍या एका भिक्षूला तेवढी त्याने जवळ येण्यास परवानगी दिली होती, अशी कथा आनापानस्मृतिसंयुक्ताच्या नवव्या सुत्तांत आली आहे. याच संयुक्ताच्या अकराव्या सुत्तांत मजकूर आहे तो असा-
. . .