भगवान बुद्ध (उत्तरार्ध)
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

भगवान बुद्ध (उत्तरार्ध) : *परिशिष्ट 4

गौतम बुद्धांचे चरित्र

*परिशिष्ट 3   *परिशिष्ट 5

महाराज, तीं बत्तीस लक्षणें कोणतीं तीं ऐका. (१) हा कुमार सुप्रतिष्ठित आहे; (२) त्याच्या पादतलाखाली सहस्त्र आरे, नेमि व नाभि यांनी संपन्न व सर्वाकारपरिपूर्ण अशीं चक्रें आहेत;(३) त्याच्या टाचा लांब आहेत ;(४)बोटें लांब आहेत; (५) हातपाय मृदु व कोमल, (६) जाळयासारखे आहेत; (७) पायांचे घोटे शंकूसारखे वर्तुळाकार ; (८) हरिणीच्या जंघांसारख्या जंघा; (९) उभा राहून न वाकतां हाताच्या तळव्यांनी त्याला आपल्या गुढग्यास स्पर्श करतां येतो, ते चोळतां येतांत ; (१०) त्याचे वस्त्रगुहय कोशाने झाकलें आहे; (११) त्याची कान्ति सोन्यासारखी; (१२) कातडी सूक्ष्म असल्यामुळे त्याच्या शरीराला धूळ लागत नाही; (१३) त्याच्या रोमकूपांत एकएकच केस उगवलेला आहे; (१४) त्याचे केस ऊर्ध्वाग्र, निळे, अंजनवर्ण, कुरळे व उजव्या बाजूला वळलेले आहेत; (१५) त्याचीं गात्रें सरळ आहेत; (१६) त्याच्या शरीराचे सात भाग भरीव आहेत; (१७) त्याच्या शरीराचा पुढला अर्धा भाग सिंहाच्या पुढल्या भागाप्रमाणें आहे; (१८) त्याच्या खांद्यावरील प्रदेश भरीव आहे;(१९) तो न्यग्रोध वृक्षाप्रमाणे वर्तुलाकार आहे; जितकी त्याची उंची तितका त्याचा परिघ आणि जितका परिघ तितकी उंची;(२०) त्याचे खांदे एकसारखे वळलेले आहेत; (२१) त्याची रसना उत्तम आहे; (२२) हनुवटी सिंहाच्या हनुवटीप्रमाणें आहे;(२३) त्याला चाळीस दांत आहेत;(२४) ते सरळ आहेत; (२५) ते निरंतर आहेत; (२६) ते पांढरे शुभ्र आहेत;(२७) त्याची जिव्हा लांब आहे;(२८) तो ब्रह्मस्वर असून करवीक पक्ष्यांच्या स्वराप्रमाणें त्याचा आवाज मंजुळ आहे; (२९) त्याची बुबळें निळीं आहेत;(३०) गाईच्या पापण्यांप्रमाणें त्याच्या पापण्या आहेत; (३१) त्याच्या भुंवयांमध्ये मऊ कापसाच्या तंतूंप्रमाणें पांढरी लव उगवलेली आहे; (३२) त्याचें डोकें उष्णीषाकार (म्हणजे मध्ये जरा उंच) आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* परिणायक म्हणजे मुख्य प्रधान
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नंतर भिक्षुहो, बंधुमा राजाने विपस्सीकुमारासाठी तीन प्रासाद बांधविले; एक पावसाळयाकरितां, एक हिवाळयाकरितां आणि एक उन्हाळयाकरितां ; आणि त्या प्रासादात पंचेद्रियांच्या सुखाचे सर्व पदार्थ ठेवविले. भिक्षुहो, पावसाळयाकरितां बांधलेल्या प्रासादात विपस्सी कुमार पावसाळयाचे चार महिने केवळ स्त्रियांनी वाजविलेल्या वाद्यांनी परिवारित होऊन राहत असे, प्रासादाखाली उतरत नसे.

आणि भिक्षुहो, शेकडो हजारों वर्षांनंतर विपस्सी कुमार सारथ्याला बोलावून म्हणाला,''मित्रा सारथे, चांगलीं चांगलीं यानें तयार ठेव. सृष्टिशोभा पाहण्यासाठी उद्यानांत जाऊं.'' सारथ्याने यानें तयार केलीं आणि विपस्सीकुमार रथांत बसून उद्यानाकडे जाण्यास निघाला. वाटेंत गोपानसीप्रमाणे वाकलेल्या भग्नशरीर, काठी टेकीत कापत कापत चालणार्‍या, रोगी गतवयस्क अशा एका म्हातार्‍या मनुष्याला पाहून तो सारथ्याला म्हणाला,''ह्या मनुष्याची अशी स्थिती कां? त्याचे केस आणि शरीर इतरांप्रमाणें नाही.''
. . .