भगवान बुद्ध (उत्तरार्ध)
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

भगवान बुद्ध (उत्तरार्ध) : *परिशिष्ट 12

गौतम बुद्धांचे चरित्र

*परिशिष्ट 11   *परिशिष्ट 13

(४) आपल्या वृध्द राजकारणी पुरूषांचा मान ठेवला नाही, आणि त्यांची वारंवार भेट घेतली नाही, तर त्यांची सल्ला मिळावयाची नाही, आणि तेणेंकरून राज्यकर्त्याची अवनति होईल. पण जे वडिलांची सल्ला घेतात त्यांना अमुक प्रसंगी कसें वागावें हें बरोबर समजतें, आणि तेणेंकरून त्यांची उन्नति होते.

(५) विवाहित किंवा अविवाहित स्त्रियांवर बळजबरी केली, तर राज्यांतील लोक असंतुष्ट होतात. आम्ही ज्या मुलींना लहानाचें मोठें केलें, त्यांना हें राज्यकर्ते जबरदस्तीने आपल्या घरीं नेऊन ठेवतात, असें म्हणून लोक सरहद्दीवर जाऊन स्वत: बंड करतात, किंवा दुसर्‍या बंडखोरांना सामील होतात, आणि राज्यावर स्वार्‍या करतात. बायकांवर बळजबरी झाली नाही, राज्यकर्त्यांकडून त्यांना रक्षण मिळालें, म्हणजे लोक निश्चिंतपणें आपलीं कामें करतात, आणि त्यामुळे राज्याच्या संपत्तिची अभिवृध्दि होते.

(६) देवस्थानांची योग्य जोपासना केली म्हणजे देवता राज्याचें रक्षण करतात.

(७) अर्हन्तांना कोणत्याही प्रकारचा ताप पोचूं देत नाहीत, म्हणजे त्यांच्या राहण्याच्या जागेच्या आसपास कोणी झाडें न तोडावी, जाळीं पसरून मृगांना न पकडावें, तळयांत मासें मांरू नयेत, यासंबंधाने काळजी घेतात.
अट्टकथेंत वज्जींच्या कायद्यांवर थोडीशी विस्तृत टीका आहे. चोराला पकडला तर त्याची चौकशी क्रमश: विनिश्चय महामात्य, व्यावहारिक, अंत:कारिक, अष्टकुलिक, सेनापति, उपराजा, आणि राजा असे सात प्रकारचे अधिकारी करीत असत. यांत अष्टकुलिक म्हणजे आजकालच्या ज्युरीसारखे होते की काय हे सांगतां येत नाही. इतर अधिकार्‍यांची अधिकारमर्यादा काय होती, हें देखील समजमत नाही. राजा म्हणजे गणराजांचा अध्यक्ष. तो किती वर्षेंपर्यंत अध्यक्ष असे, याची माहिती कोठेच सापडत नाही. वज्जींच्या कायद्यांचें पुस्तक लिहिलेलें होतें, तें साफ नष्ट झालें, ही मोठया दु:खाची गोष्ट होय. ग्रीक लोकांप्रमाणे जर आमच्या पूर्वजांना राज्यव्यस्थेचें प्रेम असतें, तर ह्या गणराजांचा इतिहास लुप्तप्राय झाला नसता.

बायकांवर बळजबरी होऊं न देण्याविषयी वज्जी सावधगिरी बाळगीत, हा मुद्दा महत्वाचा आहे. गणराजे जेव्हा अव्यवस्थितपणें वागूं लागले, तेव्हा गरीब लोकांच्या बायकांवर जुलूम होऊं लागला, असें अनुमान करण्यास हरकत नाही. त्यामुळे लोकांना एकसत्ताक राज्यपध्दति बरी वाटूं लागली. महाराजा फार झालें तर आपल्या शहरांतील कांही बायकांना झनानखान्यात नेऊन ठेवी; पण हे गणराजे सगळया देशभर परसले असल्यामुळे कोणत्याही गावांतील बाई यांच्या जुलमापासून मुक्त राहणें शक्य नव्हतें. यास्तव लोकांनी राजीखुषीने एकसत्ताक राज्यपध्दति स्वीकारली असावी.

एकदा हे राजे अव्यवस्थितपणानें वागूं लागले, म्हणजे त्यांच्यात फाटाफूट होणें साहजिक होतें. वज्जी गणराजांत वस्सकार ब्राह्मणाने फूट पाडली, आणि त्यामुळे अजातशत्रूला त्यांचा पराजय करणें अगदी सोपें झालें. वज्जींच्या गणराज्याचा लय झाल्यावर लवकरच मल्लांचे गणराज्य देखील लयाला गेलें असावें. अशा रीतीने प्राचीन गणसत्ताक राज्यांचा नाश झाला. त्यांच्या संघटनेची आणि कायद्याची तुरळक माहिती बौध्द वाड:मयांत शिल्लक राहिली, एवढेंच काय तें.

बौध्द संघाने एकत्र जमून संघकृत्ये करण्याची जी पध्दति विनयपिटकांत दिली आहे, तिच्यावरून वज्जी इत्यादिक गणराजे एकत्र कसे जमत व आपल्या सभेचें काम कसें चालवील याचें अनुमान करतां येतें.
. . .