भगवान बुद्ध (उत्तरार्ध)
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

भगवान बुद्ध (उत्तरार्ध) : *परिशिष्ट 14

गौतम बुद्धांचे चरित्र

*परिशिष्ट 13   *परिशिष्ट 15

पुनरपि, भिक्षुहो, भिक्षु मिळेल तशा भिक्षेने संतुष्ट होतो, अशा संतुष्टीची स्तुति करतो, भिक्षेसाठी अयोग्य आचरण करीत नाही. भिक्षा न मिळाल्यास त्रस्त होत नाही, मिळाल्यास हावरा न होतां, मत्त न होता, आसक्त न होतां, अन्नांत दोष जाणून केवळ मुक्तीसाठी अन्न सेवन करतो; आणि त्या आपल्या तशा प्रकारच्या संतुष्टीने आत्मस्तुति व परनिंदा करीत नाही. जो अशा संतोषांत दक्ष, सावध, हुशार व स्मृतिमान होतो, भिक्षुहो, त्यालाच प्राचीन अग्र आर्यवंशाला अनुसरून वागणारा भिक्षु म्हणतात.

पुनरपि, भिक्षुहो, भिक्षु कशाही प्रकारच्या निवासस्थानाने संतुष्ट होतो, तशा प्रकारच्या संतुष्टीची स्तुति करतो, निवासस्थानासाठी अयोग्य आचरण करीत नाही, निवासस्थान न मिळालें तर त्रस्त होत नाही, मिळालें तर हावरा न होतां, मत्त न होता, आसक्त न होतां, निवासस्थांनात दोष जाणून केवळ मुक्तीसाठी ते वापरतो आणि त्या आपल्या तशा प्रकारच्या संतुष्टीने आत्मस्तुति व परनिंदा करीत नाही. जो अशा संतोषांत दक्ष, सावध, हुशार व स्मृतिमान होतो, त्यालाच प्राचीन अग्र आर्यवंशाला अनुसरून वागणारा भिक्षु म्हणतात.

भिक्षुहो, हे ते चार आर्यवंश ...... ह्यांना कोणत्याही श्रमणांनी व ब्राह्मणांनी दोष लावला नाही.*
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* ब्राह्मण प्राचीन वंशपरंपरेला फार महत्व देत. पण ती परंपरा महत्त्वाची नसून ह्या सुत्तांत वर्णिलेली आर्यवंशपरंपराच महत्त्वाची, तिला श्रमणब्राह्मण दोष लावूं शकत नाहीत, असा येथे ध्वन्यर्थ आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
भिक्षुहो, ह्या चार आर्यवंशानी समन्वित झालेला भिक्षु जर पूर्व दिशेला जातो, तर तोच अरतीला जिंकतो, अरति त्याला जिंकीत नाही ....पश्चिम...उत्तर......दक्षिण दिशेला जातो, तर तोच अरतीला जिंकतो, अरति त्याला जिंकीत नाही. तें कां? कारण धीर अरतीवर आणि रतीवर जय मिळवतो.

धीराला जिंकणारी अरति नव्हे. अरति धीरावर जय मिळवूं शकत नाही. अरतीला जिंकणारा धीर तो अरतीवर विजय मिळवतो.

सर्व कर्मांचा त्याग करणार्‍या व रागद्वेषादिकांचें निरसन करणार्‍या त्या धीराच्या आड कोण येईल.? शंभर नबंरी सोन्याच्या नाण्यासारख्या त्याला दोष कोण लावील? देवही त्याची प्रशंसा करितात, आणि ब्रह्मदेव देखील प्रशंसा करतो.

अनागतभयानि

हें सुत्त अड्:गुत्तरनिकायाच्या पञ्चकनिपातांत सापडते. त्याचें रूपांतर येणेंप्रमाणे -

भिक्षुहो, हीं पांच अनागतभयें पाहणार्‍या भिक्षूला अप्राप्त पदाच्या प्राप्तीसाठी, जें जाणलें नाही तें जाणण्यासाठी, ज्याचा साक्षात्कार झाला नाही त्याच्या साक्षात्कारासाठी, अप्रमत्तपणें उद्यमशीलतेने आणि मन लावून वागण्याला पुरे आहेत. तीं पांच कोणतीं?

येथे, भिक्षुहो, भिक्षु असा विचार करतो की, मी सांप्रत तरूण व यौवनसपंन्न आहें. पण असा एक काळ येईल की, ह्या शरीराला जरा प्राप्त होईल. वृध्दाला, जराजीर्णाला बुध्दाच्या धर्माचें मनन सुकर नाही, अरण्यांत एकान्तवासांत राहणें सुकर नाही. ती अनिष्ट अप्रिय दशा येण्यापूर्वीच म्यां अप्रात्यपदाच्या प्राप्तीसाठी, जें जाणलें नाही तें जाणण्यासाठी, ज्याचा सांक्षात्कार झाला नाही त्याच्या साक्षात्कारासाठी प्रयत्न केलेला बरा! जेंणेंकरूनं वृध्दावस्थेंत देखील मी सुखाने राहूं शकेन. हे पहिले अनागतभय पाहणार्‍या भिक्षुला ....मन लावून वागायला लावण्यास पुरें आहे.

पुनरपि, भिक्षुहो, भिक्षु असा विचार करतो की, सध्या मी निरोगी आहें, माझा जठराग्नि चांगला आणि प्रयत्नाला अनुकूल आहे. पण असा एक काळ येतो की, हें शरीर व्याधिग्रस्त होते. व्याधिग्रस्ताला बुध्दाच्या धर्माचें मनन सुकर नाही, अरण्यांत एकान्तवासांत राहणें सुकर नाही. ती अनिष्ट अप्रिय अवस्था प्राप्त होण्यापूर्वीच म्यां......प्रयत्न केलेला बरा! जेणेंकरून रूग्णावस्थेंत देखील मी सुखाने राहूं शकेन. हें दुसरें अनागत भय पाहणार्‍या भिक्षूला ...... मन लावून वागायला लावण्यास पुरें आहे.
. . .