भगवान बुद्ध (उत्तरार्ध)
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

भगवान बुद्ध (उत्तरार्ध) : *परिशिष्ट 16

गौतम बुद्धांचे चरित्र

*परिशिष्ट 15   *परिशिष्ट 17

जो सर्व अभिनिवेश जाणतो व त्यांपैकी एकाचीही इच्छा धरीत नाही, तो वीततृष्ण निर्लोभी मुनि अस्थिर होत नाही ; कारण तो पार जातो. ४

जो सर्व जिंकणारा, सर्व जाणणारा, सुबुध्दि, सर्व पदार्थापासून अलिप्त राहणारा, सर्वत्यागी तृष्णेच्या क्षयाने मुक्त झालेला, त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. ५

प्रज्ञा ज्यांचें बळ, जो शीलाने व व्रताने संपन्न, समाहित, ध्यानरत, स्मृतिमान्, संगापासून मुक्त, काठिन्यरहित व अनाश्रव, त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात.६

एकाकी राहणारा, अप्रमत्त, मुनि, निंदेने आणि स्तुतिने न गडबडणारा, सिंहाप्रमाणे शब्दांना न घाबरणारा, वार्‍याप्रमाणे जाळ्यांत न अडकणारा, पाण्यांतील कमलाप्रमाणे अलिप्त राहणारा, इतरांचा नेता असून ज्याला नेता नाही, अशाला त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. ७

ज्याच्याविषयीं लोक वाटेल तें बोलले, तरी जो घाटावरील स्तंभाप्रमाणे स्थिर राहतो, जो वीतराग व सुसमाहितेंद्रिय, त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. ८
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* पालि शब्द 'पमाय'.टीकाकाराने याचा 'हिंसित्वा वधित्वा'असा अर्थ केला आहे. पण प्रपूर्वक मा धातुचा अर्थ मोजणें, किंवा यथार्थतया जाणणें असा होतो.

† नदीच्या घाटांवर चौकोनी किंवा अष्टकोनी खांब बांधीत असत. त्यावर सर्व जातीचे लोक स्नान करतांना पाठ घाशीत.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जो स्थितात्मा घोटयाप्रमाणे* सरळ जातो, पापकर्माचा तिरस्कार करतो,
विषमाची आणि समाची पारख करतो, त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. ९

लहान असो वा मध्यम वयाचा असो, जो संयतात्मा मुनि पाप करीत नाही, जो यतात्मा रागावत नाही व दुसर्‍या कोणालाही राग आणीत नाही, त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. १०

इतरांनी दिलेल्या अन्नावर उपिजिविका करणारा, जो शिजविलेल्या अन्नातून आरंभीं, मध्याला अथवा शेवटीं भिक्षा मिळाली असतां स्तुति किंवा निंदा करीत नाही, त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. ११

जो मुनि स्त्रीसंगापासून विरत झाला, तारूण्यात असूनही कोठेच बध्द होत नाही, जो मदप्रमादापासून विरत, जो मुक्त, त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. १२

इहलोक जाणून ज्याने परमार्थ पाहिला, ओघ व समुद्र तरून जो तादृग्भाव पावला, ज्याने बंधनें (ग्रंथि) तोडलीं, जो अनाश्रित व अनाश्रव, त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. १३

बायकोला पोसणारा गृहस्थ आणि निर्मम मुनि यां दोघांची राहणी व वृत्ति फार भिन्न आहे. कारण, प्राणघात होऊ न देण्याविषयीं गृहस्थ संयम बाळगीत नाही, पण मुनि सदोदित प्राण्यांचें रक्षण करतो. १४

जसा आकाशात उडणारा नीलग्रीव मोर हंसाच्या वेगाने जाऊं शकत नाही, तसा गृहस्थ एकान्तीं वनांत ध्यान करणार्‍या भिक्षु मुनिचें अनुकरण करूं शकत नाही. १५

मोनेय्यसुत्त


हें 'नालकसुत्त' या नांवाने सुत्तनिपांतांत आढळतें. याच्या प्रास्ताविक गाथा २० आहेत. त्यांचें भाषांतर येथे देत नाही. जिज्ञासूंनी जून १९३७ चा विविधज्ञानविस्ताराचा अंक पाहावा. त्यांत या सुत्तांचे प्रास्ताविक गाथासह भाषांतर दिलें आहे. नालक असित ऋषींचा भाचा तो अल्पवयी होता तेव्हा गोतम बोधिसत्व जन्मला. असितऋषीने बोधिसत्वाचें भविष्य वर्तविलें की, तो थोर मुनि होणार. आणि नालकाला गोतम बुध्दाच्या धर्माला अनुसरण्याचा त्याने उपदेश केला. नालक मामाच्या वचनावर श्रध्दा ठेवून गोतम बोधिसत्व बुध्द होईपर्यंत तापसी होऊन राहिला; आणि जेव्हा गोतमाला बुध्दपद प्राप्त झालें, तेव्हा त्याजपाशीं येऊंन त्याने मौनेयाबद्दल प्रश्न विचारले. त्या प्रश्नांपासून या सुत्ताला सुरवात होते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* धोटा विषम व सम धाग्यातून सरळ जातो व धाग्यात बध्द होत नाही, त्याप्रमाणे सरळ जातो.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
. . .