भगवान बुद्ध (उत्तरार्ध)
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

भगवान बुद्ध (उत्तरार्ध) : *परिशिष्ट 19

गौतम बुद्धांचे चरित्र

*परिशिष्ट 18   *परिशिष्ट 20

सर्व तमाचा नाश करून श्रमणधर्मात रत झालेला असा हा सदेवक जगाला एकच चक्षुष्मान् दिसत आहे. २

अनाश्रित व अदांभिक अशा त्या बुध्दपदाला पावलेल्या संघनायकापाशीं मी पुष्कळ बध्द माणसांच्या हितेच्छेने प्रश्न विचारण्यास आलो आहें ३

संसाराला कंटाळून झाडाखाली स्मशानांत किंवा पर्वतांच्या गुहांमध्ये एकान्तवास सेवन करणार्‍या भिक्षूला, ४

तशा त्या बर्‍यावाईट स्थळीं भये कोणती? त्या नि:शब्द प्रदेशांत कोणत्या भयांना त्या भिक्षूने घाबरता कामा नये? ५

अमृत दिशेला जाण्यासाठी सुदूर प्रदेशांत वास करणार्‍या भिक्षूने कोणती विघ्नें सहन केलीं पाहिजेत? ६

त्या द्दढनिश्चयी भिक्षूची वाणी कशी असावी? त्याची राहणी कशी असावी ? आणि त्याचें शील व व्रत कसें असावें? ७

सोनार जसा रूपें आगीत घालून त्यांतील हिणकस काढतो, त्याप्रमाणें समाहित, सावध आणि स्मृतिमान् भिक्षूने कोणता अभ्यासक्रम स्वीकारून आपलें मालिन्य जाळून टाकावें? ८

भगवान म्हणाला, हे सारिपुत्त, संसाराला कंटाळून एकांन्तवास सेवन करणार्‍या संबोधपरायण भिक्षूचें जें मला कर्तव्य वाटतें तें मी तुला सांगतों. ९
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* संतुष्ट शब्दाबद्दल मुळांत 'तुसितो' आहे. पण अट्टकथेंत तुसिता असा पाठ असून त्याचा तुषितदेवलोकांतून इहलोकीं आलेला असा अर्थ केला आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
एकान्तवासांत राहणार्‍या स्मृतिमान् धीर भिक्षूने पाच भयांना भिऊं नयें. डासांच्या चावण्याला, सर्पांना, मनुष्यांच्या उपद्रवाला, चतुष्पदांना, १०

आणि परधर्मिकांना घाबरू नयें. परधर्मिकांचीं पुष्कळ भेसूर कृत्यें पाहून देखील त्यांना घाबरूं नये. आणि त्या कुशलान्वेषी भिक्षूने दुसरींही विघ्नें सहन करावी. ११

रोगाने आणि भुकेने उत्पन्न होणारा त्रास, थंडी व उन्हाळा त्याने सहन करावा. त्या विघ्नांची अनेकविध बाधा झाली, तरी अनागरिक राहून त्याने आपला उत्साह, पराक्रम दृढ करावा. १२

त्याने चोरी करूं नये, खोटे बोलू नये, स्थिरचर प्राण्यांवर मैत्रीची भावना करावी आणि मनाचा कलुषितपणा मारपक्षीय जाणून दूर करावा. १३

त्याने क्रोधाला व अतिमानाला वश होऊं नये, त्यांची मुळेपाळें खणून काढावीं, आणि खात्रीने वृध्दिमार्गगामी होऊन प्रियाप्रिय सहन करावें. १४
. . .