भगवान बुद्ध (उत्तरार्ध)
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

भगवान बुद्ध (उत्तरार्ध) : *परिशिष्ट 21

गौतम बुद्धांचे चरित्र

*परिशिष्ट 20   *परिशिष्ट 22

भगवंताने पाय धुण्याच्या पात्रांत स्वल्प पाणी शिल्लक ठेवलें, आणि भगवान राहुलाला म्हणाला,'' राहुल, हें तूं स्वल्प पाणी पाहतोस काय?''

''होय भदन्त,'' राहुलाने उत्तर दिलें.

''राहुल, ज्यांना खोटे बोलण्याला लाज वाटत नाही, त्यांचें श्रामण्य या पाण्याप्रमाणें क्षुल्लक आहे.''

नंतर ते पाणी फेकून देऊन भगवान म्हणाला,''राहुल हें फेकलेलें पाणी तूं पाहतोसना?''

''होय भदन्त''असे राहुलाने उत्तर दिलें.

'' राहुल, ज्यांना खोटें बोलायला लाज वाटत नाही त्यांचें श्रामण्य पाण्याप्रमाणे त्याज्य आहे.''

नंतर तें पात्र पालथें करून भगवान म्हणाला,'' राहुल, ज्यांना खोटें बोलण्याला लाज वाटत नाही त्यांचें श्रामण्य या भांडयाप्रमाणें पालथें समजलें पाहिजे.''

नंतर तें सुलटें करून भगवान म्हणाला, ''राहुल, हे रिकामें पात्र तूं पाहत आहेस ना?''

'' होय भदन्त'' राहुलाने उत्तर दिलें.

''राहुल, ज्यांना खोटे बोलण्याला लाज वाटत नाही, त्यांचें श्रामण्य यां भांडयाप्रमाणें रिकामें आहे.

'' हें राहुल, लढाईसाठी सज्ज केलेला राजाचा मोठा हत्ती, पायांनी लढतो, डोक्याने लढतो, कानांनी लढतो,* दांतांनी लढतो, शेपटीने लढतो,* पण एक तेवढी सोंड राखतो. तेव्हा माहुताला वाटते की, एवढा मोठा हा राजाचा हत्ती सर्व अवयवांनी लढतो, फक्त सोंड राखतो; संग्रामविजयाला त्याने जीवित अर्पण केलें नाही. जर त्या हत्तीने इतर अवयवांबरोबर सोंडेचाही पूर्णपणें उपयोग केला, तर माहूत समजतो की, हत्तीने संग्रामविजयाला आपलें जीवित अर्पण केलें आहे, आता त्याच्यांत कमीपणा राहिला नाही. त्याचप्रमाणें ज्यांना खोटें बोलण्यास लाज वाटत नाही, त्यांनी कोणतेंही पाप सोडलें नाही असें मी म्हणतों * म्हणून, हें राहुल, थट्टेने देखील खोटे बोलावयाचे नाही असा अभ्यास कर.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* कानांनी बाण बचावण्याचें काम करतो, शेपटीला बांधलेल्या दगडी किंवा लोखंडी दांडयाने फोडतोड करतो, असा अट्टकथेंत अर्थ केला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
. . .