भगवान बुद्ध (पूर्वार्ध)
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

भगवान बुद्ध (पूर्वार्ध) : समकालीन धर्मिक परिस्थिति 1

गौतम बुद्धांचे चरित्र

समकालीन राजकीय परिस्थिति 13   समकालीन धर्मिक परिस्थिति 2

समकालीन धर्मिक परिस्थिति

प्रकरण तिसरें

भ्रामक विचार

आजकालच्या पुष्कळ विद्वानांची अशी समजूत दिसते की, प्रथमतः ब्राह्मणांचा वेदांवर सर्व भार होता, नंतर त्यांनी यज्ञयागांचें स्तोम माजवलें, त्यांतून उपनिषदांचें तत्त्वज्ञान निघालें आणि मग बुद्धाने त्या तत्त्वज्ञानांत सुधारणा करून आपला संप्रदाय स्थापला. ही विचारसरणी अत्यंत भ्रममूलक आहे. ती सोडून दिल्याशिवाय बुद्धचरित्राचा यथातथ्य बोध होणें शक्य नाही. म्हणून या प्रकरणांत बुद्धसमकालीं धार्मिक परिस्थिति कशा प्रकारची होती याचें संक्षिप्‍त वर्णन करणें योग्य वाटतें.

यज्ञसंस्कृतीचा प्रवाह

पहिल्या प्रकरणांत सांगितलें आहे की, आर्यांच्या आणि दासांच्या संघर्षामुळे सप्‍तसिंधूच्या प्रदेशांत यज्ञयागाची संस्कृति उद्‍भवली, आणि परिक्षित् आणि त्याचा मुलगा जनमेजय यांच्या कारकीर्दीत या वैदिक संस्कृतीने कुरु देशांत आपलें कायमचें ठाणें दिलें. परंतु त्या संस्कृतीचा प्रवाह कुरूंच्या पलीकडे पूर्वेला जोराने वाहत गेला नाही. त्या प्रवाहाची गति कुरू देशांतच कुंठित झाली.  याचें मुख्य कारण पूर्वेकडील देशांत ॠषिमुनींच्या अहिंसेला आणि तपश्चर्येला महत्त्व देणारे लोक पुष्कळ होते.

तपस्वी ॠषिमुनि

जातकअट्ठकथेंत तपस्वी ॠषिमुनींच्या अनेक गोष्टी आल्या आहेत. त्यांवरून असें दिसतें की, हे लोक जंगलांत जाऊन तपश्चर्या करीत. त्यांच्या तपश्चर्येचा मुख्य विषय म्हटला म्हणजे कोणत्याही प्राण्याला दुखवावयाचेयं नाही आणि शक्य तेवढें देहदंडन करावयाचें. हे लोक एकाकी किंवा संघ बनवून राहत असत. एकेका संघांत पांचशें पांचशें तपस्वी परिव्राजक असल्याचा उल्लेख अनेक जातककथांत सापडतो. जंगलांतील कंद, फळें वगैरे पदार्थांवर ते आपला निर्वाह करीत, आणि प्रसंगोपात्त खारट आणि आंबट पदार्थ (लोण-अम्बिल-सेवनत्थं) खाण्यासाठी लोकवस्तीच्या ठिकाणीं येत. त्यांच्याविषयीं लोकांना फार आदर वाटत असे आणि त्यांना लागणार्‍या पदार्थांची ते वाण पडूं देत नसत. या ॠषिमुनींचें लोकांवर फार वजन होतें; पण ते लोकांना धर्मोपदेश करीत नसत. त्यांच्या उदाहरणाने लोक अहिंसेला मानीत, एवढेंच काय तें.

ॠषिमुनींचें भोळेपण

हे तपस्वी लोक व्यवहारानभिज्ञ असल्याकारणाने कधी कधी प्रपंचांत फसत. ॠष्यशृंगाला बायकांनी फसवून आणल्याचें आणि पराशर सत्यवतीशीं रत झाल्याचें वर्णन पुराणांत आहेच. याशिवाय जातकअट्ठकथेंत देखील हे ॠषिमुनि भलत्याच मार्गाला लागल्याच्या अनेक गोष्टी आढळून येतात. त्यांपैकी येथे एक देतों-

प्राचीन काळीं वाराणसी नगरींत ब्रह्मदत्त राजा राज्य करीत असतां बोधिसत्त्व काशी राष्ट्रांत औदिच्य ब्राह्मणकुलांत जन्मला. वयांत आल्यावर त्याने प्रवज्या घेतली; आणि तो पांचशें शिष्यांसहवर्तमान हिमालयाच्या पायथ्याशीं राहूं लागला. पावसाळा जवळ आला, तेव्हा त्याचे शिष्य त्याला म्हणाले, ''आचार्य, आपण लोकवस्तींत जाऊन खारट आणि आंबट पदार्थ सेवन करूं या.'' आचार्य म्हणाला, ''आयुष्मन्तांनो, मी इथेच राहतों. तुम्हीं जाऊन शरीराला अनुकूल पदार्थ खाऊन या.''

ते तपस्वी वाराणसीला आले. राजाने त्यांची कीर्ति ऐकून त्यांना आपल्या उद्यानांत चातुर्मासांत राहण्याची विनंती केली; व त्यांच्या जेवण्याखाण्याची व्यवस्था आपल्याच राजवाड्यांत करविली. एक दिवस शहरांत सुरापानमहोत्सव चालला होता. परिव्राजकांना जंगलांत दारू मिळणें कठीण, म्हणून राजाने या तपस्व्यांना उत्तम दारू देवविली. तपस्वी दारू पिऊन नाचूं लागले, गाऊं लागले, आणि कांही अव्यवस्थितपणें खाली पडले. जेव्हा ते पूर्वस्थितीवर आले, तेव्हा त्यांना फार पश्चात्ताप झाला. त्याच दिवशीं राजाचें उद्यान सोडून ते हिमालयाकडे वळले; आणि क्रमशः आपल्या आश्रमांत येऊन आचार्याला नमस्कार करून एका बाजूला बसले. आचार्य त्यांना म्हणाला, ''तुम्हांला लोकवस्तींत भिक्षेचा त्रास झाला नाही ना ? आणि तुम्ही समग्रभावाने राहिलांत ना ?'' ते म्हणाले, ''आचार्य ! आम्ही सुखाने राहिलों; मात्र ज्या पदार्थाचें पान करूं नये त्याचेयं पान केलें.

अपयिम्ह अनच्चिम्ह अगायिम्ह रुदिम्ह च ।
विसञ्ञकरणिं पित्वा दिट्ठा नाहुम्ह वानरा ॥


आम्हीं प्यालों, नाचलों, गाऊं लागलों आणि रडलों. उन्मत्त करणारी (दारू) पिऊन आम्ही वानर बनलों नाही, एवढेंच काय तें !''*
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* सुरापान जातक (नं. ८१)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
. . .