बौद्धसंघाचा परिचय
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

बौद्धसंघाचा परिचय : भाग १ ला 12

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय

भाग १ ला 11   भाग १ ला 13

४५. त्या भिक्षूंनीं, आपण परस्पराशीं न बोलण्याचा नियम करून कसे वागलों हे सर्व भगवंताला सांगितलें, तेव्हां भगवान् सर्व भिक्षूंना उद्देशून म्हणाला, “हे निरुपयोगी मनुष्य मोठ्या दु:खानें वर्षाकाल घालवून, आपण सुखानें वर्षाकाल घालविला असें सांगत आहेत. पशूंसारखे राहून, आपण सुखानें राहिलों असें सांगत आहेत. मेंढरांसारखें राहून, आपण सुखाने राहिलों असें सांगत आहेत. प्रमत्तभावानें राहून आपण सुखानें राहिलों असें सांगत आहेत. ह्या निरुपयोगी मनुष्यांनीं इतर पंथांच्या परिव्रजकांप्रमाणें मूकव्रत धारण करावें हें कसें ? भिक्षुहो, अन्य परिव्राजकांप्रमाणें मूकव्रात धारण  करण्यांत येऊं नये. वर्षाकाल संपल्यावर पाहिलेल्या, ऐकलेल्या किंवा परिशङ्कित दोषांची प्रवारणा करावी. तीच तुम्हांला योग्य होईल; व ती येणेंप्रमाणें:- समर्थ भिक्षूनें संघाला विज्ञाप्ति करावी, ‘भदंत संघाने माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावें; आज प्रवारणेचा दिवस आहे; जर संघाला योग्य वाटेल तर संघानें आज प्रवारणा करावी.’ नंतर सर्वात जो वृद्ध भिक्षु असेल त्यानें उत्तरासंग एका खांद्यावर करून उकिडव्यानें बसून म्हणावें कीं, ‘आयुष्मान संघाला माझे जे दोष दिसले असतील, ऐकूं आले असतील किंवा त्यांची शंका आली असेल तर ते दाखवून देण्याची मी विनंती (प्रवारणा) करतों; माझ्यावर अनुकंपा करून संघानें ते दोष मला दाखवावे; मला ते पटल्यास त्यांचें यथा योग्य प्रायश्चित करीन.’ असे त्यानें त्रिवार म्हणावें. जे भिक्षु तरुण असतील त्यांनी ‘आयुष्मान संघ’ असे म्हणण्याऐवजीं ‘भदंत संघ’ असें म्हणावें. त्या वेळीं कोणी कोणाचे दोष दाखवून दिल्यास. ते त्यानें सरळपणे स्वीकारावे, व संघाची माफी मागावी. ह्याप्रमाणें वर्षाकाळाअखेर संघांत ऐक्य स्थापन करण्यांत यावें.”

वहाणा

४६. बुद्ध भगवान् राजगृह येथें गृध्रकूट पर्वतावर रहात होता. त्या काळी बिंबिसार राजा ८०००० गांवांवर आपली सत्ता चालवीत असे. कांही रजकीय कामासाठीं बिंबिसार राजानें त्या सर्व गांवांच्या ८०००० पुढार्‍यांना रागृहात बोलावून मोठी सभा भरविली होती. सोण कोळिविस नांवाचा एक तरुण श्रेष्ठ त्या काळीं चंपानगरींत रहात होता. तो इतका सुकुमार होता कीं, त्याच्या पायाच्या तळव्याला केस आले होते. राजगृहांत ही मोठी सभा भरली असतां सोणाला पाहण्याची बिंबिसार राजाला इच्छा झाली; व त्यानें त्याला चंपेहून बोलावून आणिलें. आपल्या राज्याच्या उन्नतीला काय केले पाहिजे ते सगळें ८०००० पुढार्‍यांना समजावून देऊन बिंबिसार राजा म्हणाला, “ऐहिक संपत्ति कशी मिळवावी त्याचा मार्ग मी तुम्हांस दाखविला आहे. आतां तुम्ही बुद्ध भगवंतापाशीं जा. तो तुम्हांस पारमार्थिक संपत्तीचा उपदेश करील.” त्या वेळीं सागत नांवाचा भिक्षु बुद्धाचा ‘उपस्थायक’१ होता. जेव्हां हे ८०००० गांवांचे पुढारी गृध्रकूट पर्वतावर बुद्धदर्शनाला आले. तेव्हां सागत भिक्षूनें बुद्धाच्या सांगण्याप्रमाणें विहाराच्या सावलींत मोकळ्या जागीं त्यांना बसविण्याची सोय केली; व तेथें बुद्धानें त्यांना उपदेश केला; आणि ते सर्व बुद्धाचे उपासक झाले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१- जवळ राहून यथाययोग्य सेवा करणारा
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
४७. त्या सभेंत सोण कोळिविसहि होता. त्याला असे वाटले कीं, भगवंताच्या उपदेशाप्रमाणें गृहस्थाला अत्यंत परिशुद्ध ब्रह्मचर्य पाळणें शक्य नाहीं, तेव्हां आपण भिक्षु व्हावें हें बरें. ते ८०००० गांवांचे पुढारी भगवंताला वंदन करून गेल्यावर सोण भगवंतापाशीं आला, व वंदन करून एका बाजूला बसला, आणि म्हणाला, “हे भगवान्, आपल्या धर्मोपदेशाप्रमाणें मला असें वाटतें कीं, गृहस्थाश्रमांत राहून अत्यंत परिशुद्ध ब्रह्मचर्य पाळणें शक्य नाहीं; तेव्हां आपण मला प्रव्रज्या द्या.” भगवंतानें त्याला प्रव्रज्या दिली, व तो शीत वनांत राहूं लागला. तेथें रात्रीं चंक्रमण करीत असतां त्याच्या पायांतून रक्त निघून सर्व जागा रक्तानें माखली जात असे. तेव्हां त्याच्या मनांत असा विचार आला की, भगवंताच्या श्रावकांत जे कोणी अत्यंत उत्साही असतील त्यांपैकी मी एक आहें; आणि असें असतां माझे चित्त आश्रवांपासून१ विमुक्त होत नाहीं. माझ्या कुळांत पुष्कळ संपत्ति आहे. मला तिचा उपोभोग घेतां येईल, व पुष्कळ दानधर्म करतां येईल. तेव्हां पुन्हां गृहास्थाश्रम स्वीकारून संपत्तीचा उपभोग घ्यावा व दानधर्म करावा हें बरें.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
१- चित्ताच्या दोषांपासून
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
. . .