बौद्धसंघाचा परिचय
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

बौद्धसंघाचा परिचय : भाग १ ला 16

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय

भाग १ ला 15   भाग १ ला 17

कठिन

५९. बुद्ध भगवान श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिंडिकाच्या आरामांत रहात होता. त्या काळी पावा य़ेथील तीस भिक्षु-सर्वच अरण्यवासी, सर्व भिक्षाचर्येवरच निर्वाह करणारे, सर्व चिंध्यांचींच वस्त्रें धारण करणारे, सर्व तीनच चीवरें ठेवणारे- श्रावस्ती येथें भगवंताच्या दर्शनाला येण्यास निघाले. परंतु वर्षाकाल जवळ आल्यामुळें त्यांना वाटेंत साकेत नगराजवळ रहावें लागलें. भगवंताच्या दर्शनाला उत्कंठित होऊन त्यांनी तो वर्षाकाल घालविला; व आश्विन पौर्णिमेला प्रवारणा करून ते भगंवताच्या दर्शनाला आले. वाटेंत त्यांना पाऊस फार लागला; आणि त्यांची चीवरें खराब झालीं. जेव्हां ते भगवंताला भेटले तेव्हां त्याच्या विचारण्यावरून घडलेली सर्व हकीगत त्यांनीं सांगितली. तेव्हां ह्या प्रकरणीं भिक्षूंला बोलावून कठिन अंथरण्याची बुद्धानें परवानगी दिली. कठिन म्हणजे एक चीवर. हें संघाच्या अनुमतीनें विहारांत मांडण्यांत आलें तर तें तेथून काढीपर्यंत भिक्षूला तिनांपेक्षां जास्त चीवरें बालगतां येतात; चिंध्या मिळाल्या नाहीं तर आपल्या दायकांकडून वस्त्रें गोळा करून त्यांची चीवरें बनवितां येतात. हें कठिन आश्विनी पौर्णिमेला मांडून कार्तिकी पौर्णिमेला उठविलें पाहिजे.

चीवर

६०. बुद्ध भगवान् राजगृह येथें वेळुवनांत रहात होता. त्या काळी वैशाली राजधानी अत्यंत समृद्ध होती. तेथें आम्रपालिका नांवाची सुस्वरूप गणिका रहात होती. ती नृत्यगीतवाद्यदिकांत कुशल असे. राजगृहांतील नागरिक कांही कारणास्तव वैशालीला आले, व तेथें त्यांनीं त्य गणिकेला पाहिलें; आणि तेथून परत गेल्यावर आपल्याहि राजधानींत अशी गणिका असावी अशी त्यांनीं बिंबिसार राजाला विनंती केली. राजानें अशी कुमारी निवडून तिला गणिका करण्यात नागरिकांना परवानगी दिली, व त्याप्रमाणें त्यांनी शालवती नांवाच्या कुमारीला गणिका केलें. ती लौकरच नृत्यगीतवाद्यादिकांत अत्यंत कुशल झाली. पुढें कांही काळानें गरोदर होऊन तिला मुलगा झाला. पण ही गोष्ट प्रकट न व्हावी ह्या हेतूनें त्या मुलाला तिनें एका सुपांत घालून आपल्या दासीकडून उकिरड्यावर ठेवविलें. तो अभय नांवाच्या राजकुमाराला सांपडला. उकिरड्यावर फेंकून दिला असतांहि जिवंत राहिला म्हणून त्याचें जीवक असें नांव ठेविलें; राजकुमरानें पाळल्यामुळें त्याला कौमारभृत्य असें म्हणत असता.

६१. कौमारभृत्य वयांत आल्यावर अभय राजकुमाराच्या परवानगीनें तक्षशिलेला जाऊन गुरुगृहीं राहून आयुवर्वेदांत अत्यंत प्रवीण झाला. त्याच्या परिक्षेच्या वेळीं आचार्यानें ‘तक्षशिलेच्या आसपास तीन योजनें हिंडून जी मुळी औषधी नसेल ती घेऊन ये’ असें सांगितलें. जीवक सर्व प्रदेश फिरून रिकाम्या हातानेंच परत आला; व आचार्याला म्हणाला, “औषधी नव्हे अशी एकहि वनस्पती मला आढळली नाहीं.” त्यावरून तो आयुर्वेदांत पारंगत झाला असें पाहून आचार्यानें अल्प वाटखर्ची देऊन त्याल रवाना केलें. वाटेंत जीवकानें औषधानें व शस्त्रक्रियेनें अनेक रोगी बरे केले; व मोठा लौकिक संपादन केला. त्यायोगें राजगृहाला आल्यावर बिंबिसार राजाच्या मुख्य वैद्याचें स्थान त्याला मिळालें.

६२. त्या काळीं अवंती राष्ट्रांत प्रद्योत नांवाचा राजा राज्य करीत होता. तो अत्यंत तापट असल्यामुळें त्याला चंडप्रद्योत म्हणत असत. एखदां त्याला पंडुरोग झाला; व जीवकाची कीर्ति ऐकून त्यानें बिंबिसार राजापाशीं कांहीं दिवसांकरितां त्याला उज्जयनीस पाठविण्यास मागणी केली. त्याप्रमाणें जीवक उज्जयनीला गेला; व प्रद्योताची प्रकृति तपासून ती अत्यंत प्रखर औषधांवांचून बरी होणार नाहीं असें त्यानें जाणलें. प्रद्योताची भद्गवतिका नांवाची एक फार जल चालणारी हत्तीण होती. आपणाला जंगलांतून कांही औषधी आणावयाच्या आहेत असें सांगून ती हत्तीण जीवकानें आपल्या ताब्यांत घेतली, आणि नंतर प्रद्योताला तयार केलेले प्रखर औषध पाजिलें; व आपण त्या हत्तिणीवर बसून पळ काढला. चंडप्रद्योताला औषध लागू पडल्याबरोबर जीवकाचा अत्यंत संताप आला. पण जीवक आगाऊच पळाला होता. पुढें राजा चंडप्रद्योत त्या औषधाच्या योगें बरा झाला; व त्यानें जीवकाला मोठ्या आदरानें आपल्या भेटीला बोलाविले परंतु जीवक तिकडे गेला नाहीं; तेव्हा प्रद्योतानें त्याल शिवेयक नांवाच्या वस्त्राची एक जोडी पाठविली.
. . .