बौद्धसंघाचा परिचय
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

बौद्धसंघाचा परिचय : भाग २ रा 4

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय

भाग २ रा 3   भाग २ रा 5

तो पंधरवडा संपल्यावर भगवान् एकान्तांतून बाहेर आला आणि आनंदाला म्हणाला, “भिक्षुसंघ असा कमी कां दिसतो?” आनंदानें तें वर्तमान सांगितलें; तेव्हां आनंदाला पाठवून वैशालीच्या आसपास रहाणार्‍या भिक्षूंना भगवंतानें कूटागार शाळेंत एकत्र केलें आणि तो म्हणाला, “भिक्षुहो, ह्या प्राणायामस्मृतिसमाधीची जर भावना केली तर सुंदर मधुर सुख मिळतें; व उत्पन्न झालेले पापविचार ताबडतोब नष्ट होतात. उन्हाळ्याच्या शेवटीं वार्‍यानें उडालेली धूळ अकालिक महामेघानें जशी जागच्याजागीं शांत करावी, तशी ही समाधि उत्पन्न झालेल्या पापविचारांना जागच्याजागीं शांत करते. भिक्षुहो, ह्या समाधीच्या भावनेचा प्रकार कसा? एकादा भिक्षु अरण्यांत झाडाखालीं किंवा एकांतस्थळीं जाऊन देह सरळ ठेवून मोठ्या सावधगिरीनें बसतो, तो सवधानपणें आश्वास घेतो व सावधानपणें प्रश्वास सोडतो. दीर्घ आश्वास घेत असला तर दीर्घ आश्वास घेत आहे असें जाणतो. दीर्घ प्रश्वास सोडीत असला तर दीर्घ प्रश्वास सोडीत आहे असें जाणतो. र्‍हस्व आश्वास घेत असला तर र्‍हस्व आश्वास घेत आहे असें जाणतो. र्‍हस्व प्रश्वास सोडीत असला तर र्‍हस्व प्रश्वास सोडीत आहे असें जाणतो. सर्व देहाची स्मृति ठेवून आश्वास करण्याचा व प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो. कायसंस्कार शांत करून आश्वास करण्याचा व प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो. प्रीतीचा अनुभव घेऊन आश्वास करण्याचा व प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो. सुखाचा अनुभव घेऊन आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो. चित्तसंस्कार जाणून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो. चित्तसंस्कार शांत करून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो. चित्त जाणून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो. चित्ताला प्रमुदित करून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो. चित्ताचें समाधान करून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो. चित्ताला विमुक्त करून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो. अनित्यता जाणून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो. वैराग्य जाणून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास करितो. निरोध जाणून आश्वास प्रश्वास करिण्याचा अभ्यास करितो. त्याग जाणून आश्वास प्रश्वास करण्याचा अभ्यास किरतो. अशा रितीनें प्राणायामस्मृतिसमाधीची भावना केली असतां, ती उत्पन्न झालेले पापविचार ताबडतोब शमन करिते.”

नंतर भगवंतांनी ह्या प्रकरणीं भिक्षूंना बोलावून, ते आत्महत्या करतात किंवा मिगलंडिकापाशीं जाऊन आपला वध करण्यास सांगतात ह्याची चौकशी केली; व ह्या गोष्टीचा निषेध करून भिक्षूंला नियम घालून दिला तो असा:-

“जो भिक्षु जाणूबुजून मनुष्याला ठार मारील किंवा त्यासाठीं शस्त्र शोधील तोही पाराजिक होतो; सहवासाला अयोग्य होतों.”
त्या काळीं एक उपासक आजारी होता. त्याची बायको अत्यंत देखणी होती. षड्वर्गीय भिक्षूंची तिच्यावर पापदृष्टि पडली. त्यांना असें वाटलें कीं हा उपासक मेला तर ही स्त्री आपल्या हस्तगत होईल. ते त्या उपासकाजवळ जाऊन म्हणाले, “हे उपासका, तूं सज्जन आहेस. तूं पुष्कळ कुशल कर्म केलें आहेस. भयभीतांचे रक्षण केलें आहेस. दुष्ट पापकृत्य केलें नाहींस. आतां तुला ह्या दु:खित जगण्यानें काय करावयाचें! जगण्यापेक्षां तुला मरणेंच चांगले. अशा स्थितींत जर तूं मेलास तर स्वर्गांत जन्म पावून खूब चैन भोगशील.” त्या उपासकाला हें षड्वर्गीयांचे बोलणें पटलें; व अपथ्यकारक अन्नपाण्याचें सेवन करून त्यांने प्राणत्याग केला. तेव्हां त्याच्या बायकोनें षड्वर्गीयांना फार दोष दिला. ह्यांनी मरणाची स्तुति करून माझ्या पतीला मारिलें असे ती म्हणूं लागली. तिनें केलेला आरोप ऐकून दुसरे लोकहि भिक्षूंला दोष देऊं लागले. भगवंताच्या कानीं जेव्हां ही गोष्ट आली, तेव्हां त्यानें वरील नियामांत फेरफार केला तो असा:-

जो भिक्षु जाणूनबुजून मनुष्याला ठार मरील किंवा त्यासाठी शस्त्र शोधील किंवा मरणाची स्तुति करील, मरणाला उत्तेजित करील-हे मनुष्या, तुला ह्या दु:खद जगण्यानें काय करावयाचें, तुला जगण्यापेक्षां मरणें चांगलें, अशा रितीनें अनेक बाजूंनीं मरणाची स्तुति करील, :मरणाला उत्तेजित करील-तोहि पाराजिक होतो. सहवासाला अयोग्य होतो।।३।।
. . .