बौद्धसंघाचा परिचय
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

बौद्धसंघाचा परिचय : भाग २ रा 12

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय

भाग २ रा 11   भाग २ रा 13

१९. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिडिकाच्या आरामांत रहात होता. त्या काळीं भगवंतानें, स्त्रीबरोबर एकान्तांत प्रछन्न जागीं बसण्याची मनाई केल्यामुळें उदायी त्याच तरुण स्त्रीबरोबर मोकळ्या जागीं एकटा बसून संभाषण करीत होता. तेथें विशाखेनें त्याला पाहिलें, व तसें बसणें योग्य नाहीं असें म्हटलें. पण उदायीनें तिच्या म्हणण्याकडे लक्ष्य दिलें नाहीं. तेव्हां तिनें ती गोष्ट भिक्षूंना, व त्यांनीं भगवंताला कळविली. तेव्हां त्यांने त्याचा निषेध करून भिक्षूंला नियम घालू दिला तो असा:-

स्त्रीसंगाला योग्य अशी प्रच्छन्न जागा नसते; परंतु स्त्रीबरोबर ग्राम्य भाषण करण्याइतका एकान्त असतो. जो भिक्षु अशा ठिकाणीं स्त्रबरोबर एकटा बसेल, व विश्वासून उपासिका त्याला पाहून संघादिशेष किंवा पाचित्तिय ह्या दोहोंपैकीं एक आपत्ति लागू करील. जर तो भिक्षु तेथें बसल्याचें कबूल करीत असेल, तर ती विश्वासू उपासिका बोलेल त्याप्रमाणें त्याला संघादिशेष किंवा पाचित्तिय आपत्ति लागू करावी. ही सुद्धां आपत्ति अनियत (अनिश्चित) आहे ।।२।।

निस्सग्गिय पाचित्तिय


२०. बुद्ध भगवान् वैशाली येथें गोतमक चेतियांत रहात होता. त्या काळीं भगवंतानें भिक्षूंला तीन चीवरें वापरण्याची परवानगी दिली होती. षड्वर्गीय भिक्षु तीन चीवरें वापरण्याची परवानगी मिळाली आहे असें म्हणून गांवांत जातांना निराळीं तीन चीवरें, आणि आरामांत निराळीं तीन चीवरें वापरीत; व स्नानाच्या वेळीं निराळींच चीवरें वापरीत. जे भिक्षु साधेपणानें वागणारे होते त्यांनीं त्यांचा निषेध केला; व ही गोष्ट भगवंताला कळविली. त्यानेंहि त्यांचा निषेध करून भिक्षूंला नियम घालून दिला तो असा:-

“जो भिक्षु अतिरेक (तीन चीवरांपेक्षां अधिक) चीवर ठेवील, त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें.”

त्या काळीं आयुष्मान् आनंदाला एक अतिरेक चीवर मिळालें होतें, व त्याच्या मनांतून तें सारिपुत्ताला द्यावयाचें होतें. पण सारिपुत्त त्यावेळीं साकेत येथें रहात होता. तेव्हां कसे करावें असा आनंदाला प्रश्न पडला; व त्यानें भगवंताला त्याचा खुलासा विचारला. भगवंतानें सारिपुत्त किती दिवसांनीं येणार, हें विचारलें; व आनंदानें, नवव्या किंवा दहाव्या दिवशीं येथें पोहोचणार असें उत्तर दिले. तेव्हां भगवंतानें दहा दिवसपर्यत अतिरेक चीवर ठेवण्याची परवानगी दिली; व वरील नियमांत फेरफार केला तो असा:-

चीवर करून संपल्यावर व कठिनं१  उठल्यावर भिक्षूनें अतिरेक चीवर दहा दिवसपर्यंत ठेवावें. त्यापेक्षां जास्त ठेवील, तर त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें ।।१।।
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१- भाग. १क. ५९.)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
निस्सग्गिय पाचित्तिय म्हणजे त्या भिक्षूनें तें चीवर (किंवा ती वस्तू) संघाच्या, भिक्षूच्या किंवा भिक्षूंच्या हवालीं केलें पाहिजे, व त्यांच्या समोर पाचित्तिय आपत्ति आपल्या हातून झाल्याचें कबूल केलें पाहिजे. ती वस्तू जोंपर्यंत तो आपणाशीं ठेवील तोंपर्यत केवळ आपत्ति कबूल केल्यानें त्या आपत्तींतून मोकळा होत नाहीं.
. . .