बौद्धसंघाचा परिचय
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

बौद्धसंघाचा परिचय : भाग २ रा 16

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय

भाग २ रा 15   भाग २ रा 17

२८. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथ पिंडिकाच्या आरामांत रहात होता. त्या समयीं एक मनुष्य दुसर्‍या मनुष्याला म्हणाला, “मी आर्य उपनंदाला चीवरानें आच्छादणार आहें.” दुसराहि तसेंच म्हणाला. पूर्वीप्रमाणें पिंडचारिक भिक्षूनें हे वर्तमान उपनंदाला सांगितलें. उपनंद त्यांजपाशीं येऊन त्यांना म्हणाला, “मला अशा अशा प्रकारचें चीवरवस्त्र तयार करून द्या.” तेव्हां त्यांनीं उपनंदावर टीका केली. अनुक्रमें हें वर्तमान भगवंताला समजलें. त्यानें भिक्षूंला नियम घालून दिला तो असा:-

ह्या चीवरद्रव्यानें चीवर तयार करून अमूक भिक्षूला आम्ही आच्छादूं, अशा उद्देशानें दोन अज्ञाति गृहपतींनीं किंवा गृपत्नींनी अलग अलग चीवरद्रव्य गोळा केलेलें असतें. अनधीष्ट भिक्षु तेथे जाऊन, आयुष्मन्त, तुम्ही पुण्यबुद्धि धरून ह्या अलग अलग चीवरद्रव्यानें अशा अशा प्रकारचें चीवर तयार करून दोघे एकाच चीवरानें मला आच्छादन करा, असें म्हणून विशिष्ट वस्त्राची आवड दर्शवील, त्याला निस्सग्गिय पाचित्तिय होतें ।।९।।

२९. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिंडिकाच्या आरामांत रहात होता. त्या काळीं उपनंदाच्या उपस्थापयक महामात्रानें ह्या चीवरद्रव्यानें चीवर तयार करून उपनंदाला आच्छादन कर असें म्हणून दूताकडून चीवरद्रव्य पाठविलें. त्या दूतानें तें द्रव्य घेण्यास उपनंदाला विनंति केली. तेव्हां तो म्हणला, “आम्ही चीवरद्रव्य घेत नसतों. आम्ही योग्य काळीं नियमाला अनुसरून चीवर घेत असतों.” दूत म्हणाला, “तुमचें कामकाज पहाणारा कोणी आहे काय?”

त्या समयीं एक उपासक कांहीं कामासाठीं आरामांत आला होता. उपनंद त्या दूताला म्हणाला, “हा भिक्षूंचे कामकाज पहाणारा उपासक आहे.” त्या दूतानें त्या उपासकाला सर्व सांगितलें, व तो उपनंदाला म्हणाला, “त्या उपासकाला मीं सर्व सांगितलें आहे. योग्य समयीं आपण त्याजकडे जावें. म्हणजे तो तुम्हांला चीवरानें आच्छादील,” नंतर त्या महामात्रानें तें चीवर घ्यावे, असा दूताकडून उपनंदाला निरोप पाठविला. पण उपनंदानें त्या उपासकाला कांहींच विचारलें नाहीं. दुसर्‍यांदा व तिसर्‍यांदाहि त्या महामात्रानें दूत पाठविला. पण उपनंद उभाच राहिला. त्याकाळीं नागरिकांची सभा होती. त्यांनीं असा नियम केला होता कीं, जो वेळेवर हजर रहाणार नाहीं त्यास पन्नास कार्षापण दंड करावा. उपनंद त्या उपासकाजवळ जाऊन चीवर मागूं लागला. पण तो म्हणाला, “आपण आजचा दिवस दम धरा; कारण मला सभेंत हजर राहिलें पाहिजे. आणि जो वेळेवर हजर रहाणार नाहीं त्याला पन्नास कार्षापण दंड द्यावा लागतो.” मला आजच चीवर दिलें पाहिजे असें म्हणून उपनंदानें त्याचें धोतर पकडलें. अशा रितीनें उपनंदानें आग्रह धरल्यावरून त्या उपासकानें त्याच दिवशीं त्याला चीवरवस्त्र घेऊन दिले; व तो सभेला उशीरां गेला. त्याला इतर सभासद म्हणाले, “तूं उशीरां येऊन पन्नास कार्षापण का घालविलेस?” त्यानें घडलेली गोष्ट सांगितली. तेव्हां ते लोक शाक्यपुत्रीय श्रमणांवर टीका करूं लागले. अनुक्रमें हें वर्तमान भगवंताला समजलें. त्यानें उपनंदाचा निषेध करून भिक्षूंला नियम घालून दिला तो असा:-

राजा किंवा राजाचा अंमलदार, ब्राह्मण किंवा गृहपति, ह्या चीवरद्रव्यानें चीवरवस्त्र घेऊन अमुक भिक्षूला चीवरानें आच्छादन कर असें म्हणून दूताकडून चीवरद्रव्य पाठवील, व तो दूत येऊन जर त्या भिक्षूला म्हणेल, “हें आपणासाठीं चीवरद्रव्य आणिलें आहे, तें आपण ग्रहण करावें,” तर त्या भिक्षूनें त्या दूताला म्हणावें, “आम्ही चीवरद्रव्य घेत नसतों; योग्य वेळीं नियमाला अनुसरून चीवर घेत असतों.” जर तो दूत त्या भिक्षूला म्हणेल कीं, आपला कोणी कामकाज पहाणारा आहे काय? तर ज्या भिक्षूला चीवराची गरज असेल त्यानें ‘हा भिक्षूंचा कामकाज पहाणार आहे’ असें म्हणून कामकाज पहाणारा आरामिक किंवा उपासक दाखवून द्यावा. त्या कामकाज पहाणार्‍याला सर्व व्यवस्था सांगून जर तो दूत भिक्षूला म्हणेल, “ज्या कामकाज पहाणार्‍याला आपण दाखवून दिलें त्याजपाशीं मीं सर्व व्यवस्था केली आहे; आपण तिकडे वेळेवर जावें; तो तुम्हांला चीवरानें आच्छादील,” तर ज्या भिक्षूला चीवराची गरज असेल त्यानें कामकाज पहाणार्‍याकडे जाऊन मला चीवराची गरज आहे असें दोन तिनदां सांगावें, व आठवण द्यावी. दोनतीनदां सांगितलें असतां व आठवण दिली असतां, तें चीवरवस्त्र मिळालें तर चांगले; नाहीं मिळालें तर चारदां, पांचदां, कमाल सहादां जाऊन तिकडे मुकाट्यानें उभें रहावें. चारदां, पांचदां, कमाल सहादां चीवराच्या उद्देशानें तेथें उभा राहिला असतां तें चीवर मिळालें तर चांगले. त्यापेक्षां जास्त प्रयत्न करून तें चीवरवस्त्र मिळवील, तर त्याल निस्सग्गिय पाचित्तिय होतें. जर मिळविलें नाहीं तर ज्यांच्याकडून चीवरद्रव्य मिळालें त्यांना स्वत: जाऊन किंवा दूत पाठवून म्हणावें, “जें तुम्ही भिक्षूला उद्देशून चीवरद्रव्य पाठविलें त्याचा त्या भिक्षूला कांहीं उपोयग नाहीं. तुमच्या द्रव्याची चौकशी करा. त्याचा नाश होऊं देऊं नका.” ह्या प्रसंगी शिष्टाचार समजावा ।।१०।।
. . .