बौद्धसंघाचा परिचय
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

बौद्धसंघाचा परिचय : भाग २ रा 32

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय

भाग २ रा 31   भाग २ रा 33

८२. बुद्ध भगवान् वैशाली येथें महावनांत कूटागारशालेंत रहात होता. त्या काळीं वैशालींत भिक्षूंना आमंत्रणपरंपरा होती. त्यांत एका गरीब लोहारानें सर्व भिक्षुसंघाला एके दिवशीं आपल्या घरीं आमंत्रण केलें. हा गरीब लोहार कसलें जेवण देणार म्हणून भिक्षु आगाऊच भिक्षाटन करून जेवले, व नंतर त्याच्या घरीं आले. त्या गरीब लोहाराल त्याच्या मालकानें विशेष वेतन दिल्यामुळें, व शेजार्‍यापाजार्‍यांनीं चांगली मदत केल्यामुळें त्यानें भिक्षुसंघासाठीं उत्तम जेवण तयार केलें. पण जेवतेवेळीं भिक्षु थोडें थोडें खाऊं लागले. तो म्हणाला, “मी गरीब आहें असें समजून तुम्ही थोडें खाऊं नका. तुमच्यासाठीं पुष्कळ अन्न तयार केलें आहे.” भिक्षु म्हणाले, “आम्ही आगाऊच भिक्षाटन करून आलों आहोंत. त्यामुळे आम्हांस जास्त खाण्याची इच्छा राहिली नाहीं. तेव्हां तो गरीब लोहार भिक्षूंवर टीका करूं लागला कीं, मीं आमंत्रण केलें असतां भिक्षु इतर ठिकाणीं भिक्षा ग्रहण करतात हें कसें?...ह्या प्रकरणीं भगवंतानें नियम केला तो असा:-

“परंपरेनें१ (१ एकानें आमंत्रण दिलें असतां दुसर्‍या ठिकाणीं जेवून पुन्हां त्या ठिकाणीं जेवावयास जाणें ह्याला परंपरेनें भोजन करणें म्हणतात.) भोजन केलें असतां पाचित्तिय होतें.”
पुढें ह्या नियमांत वेळोवेळीं फरक करण्यांत आला तो असा:-

प्रसंगावांचून परंपरेनें भोजन केलें असतां पाचित्तिय होतें. आजारी असणें, चीवर करण्याची वेळ असणें, हा ह्या बाबतींत प्रसंग जाणावा ।।३३।।

८३. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं काणमाता उपासिका फार श्रद्धाळू होती. तिची मुलगी काणा दुसर्‍या एका गांवीं दिली होती. ती आपल्या माहेरीं आली असतां नवर्‍यानें तिला आणण्यासाठीं एक मनुष्य पाठविला. तिला रिकाम्या हातानें पाठवूं नये म्हणून काणमातेनें अपूप (वडे) तयार केले. इतक्यांत एक भिक्षु भिक्षेसाठीं तेथें आला. त्याला तिनें कांहीं अपूप दिले. त्यानें ती गोष्ट दुसर्‍या भिक्षूला, व दुसर्‍यानें तिसर्‍याला सांगितली. त्या सर्वांनीं तिथें भिक्षा घेतल्यामुळें काणमातेनें तयार केलेले सर्व अपूप खलास झाले. अर्थात मुलीला सासरीं पाठविणें तिल तहकूब ठेवावें लगलें. पुन्हां मुलीच्या नवर्‍याकडून माणूस आला. पुन्हां भिक्षूंनीं पूर्वी प्रमाणेंच भिक्षेला येऊन सर्व अपूप खलास केले. तिसर्‍यानदां मनुष्य आला तेव्हांहि अशीच गोष्ट घडली. बायकोला पाठवीत नाहीं म्हणून रागावून काणेच्या नवर्‍यानें दुसरें लग्न केलें. तें वर्तमान कळलें तेव्हां काणा रडूं लगली. भगवान् भिक्षेला आला असतां काणमातेनें त्याला ही गोष्ट सांगितली. भगवंतानें दोघींना धर्मोपदेश केला; व तो विहारांत परत गेला.

त्याच वेळीं दुसरी अशी एक गोष्ट घडली कीं, एक सार्थ (कारवानाचा तांडा) राजगृहाहून प्रवासाला जाण्याच्या बेतांत होता. एक भिक्षु तेथें भिक्षेला गेला असतां सार्थंपैकीं एका उपासकानें त्याला सत्तु दिला. त्यानें तें वर्तमान दुसर्‍या भिक्षूला, अशा रितीनें बर्‍याच भिक्षूंना सांगितलें; व त्या सर्वांनीं तेथेंच भिक्षा ग्रहण केल्यामुळें उपासकाचा सर्व सत्तु संपला. त्यानें सार्थांतील इतर मंडळीला तेथें राहण्यास विनंती केली, पण ते राहिलें नाहींत. पुन्हां पाथेय तयार करून दुसर्‍या दिवशीं त्यांच्या मागोमाग जात असतां चोरांनीं त्या उपासकाला लुटलें. त्यामुळें लोक भिक्षूंवर टीका करूं लागले; म्हणाले कीं, हे शाक्यपुत्रीय श्रमण प्रमाण न जाणतां भिक्षा ग्रहण करतात हें कसें? पुढें ही गोष्ट भगवंताला समजली, तेव्हां त्यानें त्यांचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:-

भिक्षु एकाद्या कुटुंबांत गेला असतां त्याला अपूप किंवा मंथ१ (१- मंथ म्हणजे प्रवासांत खाण्यासाठीं तयार केलेला पदार्थ) घेण्याची विनंती करण्यांत येईल; इच्छा असल्यास दोन तीन पात्रभर त्या भिक्षूनें घ्यावे. त्याहून जास्त घेईल त्याला पाचित्तिय होतें. दोन तीन पात्रभर घेऊन भिक्षूंना वांटून द्यावे, हा ह्या बाबतींत शिष्टाचार जाणावा ।।३४।।

८४. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं एका ब्रह्मणानें भिक्षूंना आमंत्रण करून जेवूं घातलें. भिक्षु त्याच्या घरीं जेऊन पुन्हां त्याच्या शेजारींपाजारीं रहाणार्‍या आपल्या नातलगांकडे जाऊन जेवले. भिक्षु गेल्यावर ब्राह्मण शेजार्‍यापाजार्‍यांस आमंत्रण करावयास गेला. पण ते म्हणाले, “तूं भिक्षूंनांच धड जेवावयास घातलें नाहींस; आणि आतां आम्हांला कशाला बोलावितोस?” हे ऐकून तो ब्राह्मण भिक्षूंवर टीका करूं लागला; म्हणाला कीं, भिक्षु माझ्या घरीं जेऊन पुन्हां दुसर्‍यांच्या घरी जेवतात हें कसें? त्यांना पोटभर खाऊं घालणें मला शक्य नव्हतें कीं काय? ही गोष्ट अनुक्रमें भगवंताला समजली तेव्हां त्यानें त्या भिक्षूंचा निषेध करून सर्व भिक्षूंना नियम घालून दिला तो असा:- “जो भिक्षु जेवून तृप्त झाल्यानंतर पुन्हां जेवील किंवा खाईल, त्याला पाचित्तिय होतें.”

त्या काळीं आजारी भिक्षूंसाठीं लोक चांगलें अन्न तयार करून पाठवीत असत. त्यांतून जे शिल्लक राही, तें बाहेर फेंकण्यांत येत असे; व तें खातांना कावळे मोठमोठ्यानें ओरडत असत. भगवंतानें आनंदापाशीं चौकशी केली असता आनंदाने ते वर्तमान भगवंताला सांगितलें. तेव्हां ह्या प्रकरणीं भगवान् भिक्षूंना म्हणाला, “आजारी भिक्षूंचें किंवा इतर भिक्षूंचे शिल्लक राहिलेलें अन्न ग्रहण करण्यास मी परवानगी देतों.” आणि त्यानें वरील नियमांत फेरफार केला तो असा:-

जो भिक्षु जेवून तृप्त झाल्यानंतर भिक्षूच्या शिल्लक राहिलेल्या अन्नाशिवाय इतर अन्न खाईल, त्याला पाचित्तिय होतें ।।३५।।
. . .