बौद्धसंघाचा परिचय
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

बौद्धसंघाचा परिचय : भाग २ रा 44

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय

भाग २ रा 43   भाग २ रा 45

१४१. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं भगवंताचा मावसभाऊ नंद अत्यंत देखणा होता, व सुगतचीवराएवढें चीवर तो धारण करीत असे...ह्या प्रसंगीं भगवंतानें नियम केला तो असा:-

जो भिक्षु सुगतचीवराएवढें किंवा त्यापेक्षां मोठें चीवर करवील त्याला- तें चीवर कापावयास लावून- पाचित्तिय होते. सुगतचीवराचें प्रमाण असें:- नऊ सुगतवितस्ति लांबी व सहा सुगतवितस्ति रुंदी. हें सुगतचीवराचें प्रमाण ।।९२।।

चार पाटिदेसनिय

१४२. बुद्ध भगवान् श्रावस्ती येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं कोणी एक भिक्षुणी श्रावस्तींत भिक्षाटन करून परत येत असतांना एका भिक्षूला पाहून म्हणाली, “आर्य, भिक्षा ग्रहण करा.” त्या भिक्षूनें तिची सर्व भिक्षा घेतल्यामुळें व भिक्षाटनाची वेळ निघून गेली असल्यामुळें त्या भिक्षुणीला उपाशीं रहावें लगलें. हा प्रकार अनुक्रमें तीन दिवस घडला. चवथ्या दिवशीं ती कांपत कांपत रस्त्यानें चालली असतां समोरून रथांत बसून येणार्‍या एका श्रेष्ठीनें तिला बाजूस व्हावयास सांगितलें. ती अडखळून तेथेंच पडली. श्रेष्ठीनें खालीं उतरून तिची क्षमा मागितली. तेव्हां ती म्हणाली, “ह्यांत तुमचा कांहीं अपराध नाहीं. भुकेनें व्याकुळ झाल्यामुळें मी खालीं पडले.” तिच्या भुकेचें कारण समजलें, तेव्हां तो श्रेष्ठी भिक्षूंची निंदा करूं लागला. ...ह्या
प्रसंगीं भगवंतानें नियम केला तो असा:-

जो भिक्षु गांवांत गेलेल्या अज्ञाति भिक्षुणीकडून खाण्याचा किंवा जेवण्याचा पदार्थ आपल्या हातानें घेऊन खाईल किंवा जेवील, त्यानें आपला दोष कबूल करावा:- बंधुहो, निंद्य आणि अयोग्य (पाटिदेसनिय) गोष्ट माझ्या हातून घडली, ती मी कबूल करतों ।।१।।


१४३. बुद्ध भगवान् राजगृह येथें वेळुवनांत रहात होता. त्या काळीं एका कुटुंबांत आमंत्रित भिक्षु भोजन करीत असतां षड्वर्गीय भिक्षुणी गृहस्थांना सांगून षड्वर्गीय भिक्षूंना नानाप्रकारचे पदार्थ वाढावयास लावीत...ह्या प्रसंगीं भगवंतानें नियम केला तो असा:-

निमंत्रित भिक्षु कुटुंबामध्यें भोजन करीत असतां त्यांचा परामर्श घेण्यासाठीं एकादी भिक्षुणी, इकडे आमटी आणा, इकडे भात आणा, असें म्हणून उभी राहील, तर त्या भिक्षूंनीं, जोपर्यंत भिक्षु जेवीत आहेत तोंपर्यंत तूं येथून दूर हो, असें म्हणून तिचा निषेध करावा. जर त्यांपैकीं एकाद्या भिक्षूंनेंहि तिचा निषेध केला नाहीं, तर त्या सर्वांनीं आपला दोष कबूल करावा:- बंधुहो, निंद्य आणि अयोग्य (पाटिदेसनिय) गोष्ट आमच्या हातून घडली, ती आम्ही कबूल करतों ।।२
।।

१४४. बुद्ध भगवान् श्रावस्तीं येथें जे. अ. आरामांत रहात होता. त्या काळीं तेथील एका कुटुंबांत स्त्रीपुरुषें संघाची भक्त होती. श्रद्धेनें आणि संपत्तीनें त्या कुटुंबाची सारखी अभिवृद्धि होत होती. कधीं कधीं खाण्याचे सर्व पदार्थ भिक्षूंना देऊन त्या कुटुंबांतील माणसें स्वत: उपाशीं रहात असत... ह्या प्रसंगीं भगवंतानें नियम केला तो असा:-

“जीं शैक्षसंमत१ (१- शैक्षसंमत म्हणजे संघानें ज्यांना बौद्ध धर्माचे अधिकारी ठरविले असतील, अशा गृहस्थांचीं कुटुंबे.) कुटुंबें असतील, त्या कुटुंबांत जाऊन जो भिक्षु खाण्याचा किंवा जेवण्याचा पदार्थ आपल्या हातानें२ (२- येथें मूळ शब्द ‘सहत्था’ असा आहे. तसाच तो पहिल्या पाटिदेसनियांतहि आहे. ज्यावेळीं ह्या नियमांवर टीका लिहिली गेली, त्या वेळीं कोणत्याहि भिक्षूनें आपल्या हातानें कोणताहि पदार्थ घेऊन खातां कामा नये, अशी वहिवाट सुरू झाली होती; व त्यामुळें ह्या नियमाच्या टीकेंत ‘सहत्था’ ह्या शब्दाचा अर्थ मुळींच केला नाहीं, आणि मूळच्या वहिवाटीला निराळें स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे. मज्झिमनिकायांत घटीकारसुत्तांत (P. T. S. Majjhimanikaya, part II p.52)  काश्यप बुद्ध कुंभाराच्या घरीं जाऊन तो घरीं नसतांना स्वत:च्या हातानें त्याच्या भांड्यातील अन्न घेऊन खात असे, असा उल्लेख आहे. ह्यावरून एका काळीं भिक्षु श्रद्धावान् कुटुंबांत जाऊन स्वत:च्या हातानें अन्न घेऊन खात असावे, असें सिद्ध होतें.) घेऊन खाईल किंवा जेवील, त्यानें आपला दोष कबूल करावा, बंधूहो, निंद्य आणि अयोग्य (पाटिदेसनिय) गोष्ट माझ्या हातून घडली, ती मी कबूल करतों.”

ह्या नियमांत पुढें एकदोन प्रसंगीं फेरफार करण्यांत आला तो असा:-

जी शैभसंमत कुटुंबें असतील, त्या कुटुंबांत जाऊन पूर्वी आमंत्रण केलें नसतां जो निरोगी भिक्षु खाण्याचा किंवा जेवण्याचा पदार्थ आपल्या हातानें घेऊन खाईल किंवा जेवील, त्यानें आपला दोष कबूल करावा:- बंधुहो, निंद्य आणि अयोग्य (पाटिदेसनिय) गोष्ट माझ्या हातून घडली, ती मी कबूल करतों ।।३।।

१४५. बुद्ध भगवान् शाक्य देशांत कपिलवस्तु येथें निग्रोधारामांत रहात होता. त्यावेळीं शाक्यांचे दास जंगलांत पळून जाऊन बंड करीत असत. शाक्यांच्या कांहीं बायका अरण्यांत रहाणार्‍या भिक्षूंसाठीं खाण्याचे व भोजनाचे उत्तम पदार्थ घेऊन जात असतां, त्या बंडवाल्यांनीं त्यांच्यावर हल्ला केला व त्यांना लुटलें. पुढें शाक्यांनीं त्यांना पकडलें...ह्या प्रसंगीं भगवंतानें नियम केला तो असा:-

जीं संशयाचीं आणि धोक्यांची अरण्यांतील वसतिस्थानें, त्यांत राहणारा भिक्षु (गृहस्थांना) पूर्वी माहिती दिल्यावांचून आरामांत आणलेला खाण्याचा किंवा जेवण्याचा पदार्थ आपल्या हातानें घेऊन खाईल किंवा जेवील, त्यानें आपला दोष कबूल करावा:- बंधुहो, निंद्य आणि अयोग्य (पाटिदेसनिय) गोष्ट माझ्या हातून घडली, ती मी कबूल करतों ।।४।।


पंचाहत्तर सेखिय

सेखिय म्हणजे शिकण्याजोगे नियम. हे बहुतेक षड्वर्गियांनीं केलेल्या दोषांमुळें भगवंतानें श्रावस्ती येथें असतांना घालून दिले. परंतु त्या दोघांचें सविस्तर वर्णन देण्यापासून विशेष फायदा नसल्यामुळें व नियमांवरूनच त्या दोषांचें अनुमान सहज करतां येण्याजोगें असल्यामुळें केवळ नियमांचें भाषांतर येथें देण्यात येत आहे.
. . .