बौद्धसंघाचा परिचय
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

बौद्धसंघाचा परिचय : भाग ३ रा 8

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय

भाग ३ रा 7   भाग ३ रा 9


कालिगोधेचा पुत्र भद्दिय


“उच्चकुलांत जन्मलेल्या माझ्या भिक्षुश्रावकांत कालिगोधेचा पुत्र भद्दिय श्रेष्ठ आहे.”

अनुरुद्धाचा मित्र तो हाच. ह्याच्या आईचें नांव कालिगोधा होतें, हें स्पष्टच आहे. परंतु ह्याचा बाप कोण होता, व ह्याला आपल्या गुणांमुळें किंवा थोर कुळांत जन्मला म्हणून शाक्यराज्याची गादी मिळाली, ह्याचा थांग लागत नाहीं.

अनुरुद्धाबरोबर त्यानें प्रव्रज्या घेतली, व तो अरण्यांत किंवा झाडाखालीं रहात असतां, ‘अहो सुख, अहो सुख,’ असे म्हणत असे. तें ऐकून कांहीं भिक्षु भगवंताला म्हणाले, “भदन्त, हा भद्दिय एकाकी रहात असतां, ‘अहो सुख, अहो सुख’ असें म्हणत असतो. त्यावरून तो ब्रह्मचर्य आचरण्यांत संतुष्ट नसावा, असें दिसून येतें. त्याला आपल्या राज्यसुखाची आठवण हेत असली पाहिजे.”

भगवंतानें भद्दियाला बोलावून आणलें, व त्याच्या ह्या उद्‍गारांचा अर्थ काय असा त्याला प्रश्न केला. तो म्हणाला, “भदंत, जेव्हां मी राजा होतों, तेव्हां राजमहालाच्या आंत व बाहेर, नगराच्या आंत व बाहेर, व सर्व राज्यांत माझ्या देहाच्या संरक्षणाबद्दल जय्यत तयारी ठेवण्यांत येत असे. असें असतां मी सदोदित साशंकितपणें व भयभीतपणें वागत असें. पण आतां मी जेथें जेथें रहातों, तेथें तेथें नि:शंकपणें व निर्भयपणें रहातों. मला कशाचीच उत्कंठा नाहीं. अरण्यांत रहाणार्‍या मृगांप्रमाणें माझें चित्त स्वतंत्र आहे, आणि ह्याच कारणास्तव माझ्या तोंडून, ‘अहो सुख, अहो सुख,’ असे उद्‍गार निघतात.”लकुण्टक (ठेंगणा) भद्दिय


“माझ्या मंजुभाषी भिक्षुश्रावकांत लकुण्टक भद्दिय श्रेष्ठ आहे.”

हा श्रावस्ती येथें संपन्न कुळांत जन्मला, व जेव्हां बुद्ध भगवान् प्रथमत: श्रावस्तीला आला, त्याच वेळीं भगवंताचा उपदेश ऐकून त्यानें प्रव्रज्या घेतली, एवढीच माहिती मनोरथपूरणींत सांपडते. पण निदानवग्गांतील भिक्खुसंयुत्तांत ह्यासंबंधानें एक सुत्त आहे. तें विशेष महत्त्वाचें वाटल्यामुळें त्याचें रूपांतर येथे देत आहें.


भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथपिंडिकाच्या आरामांत रहात असतां लकुण्टक भद्दिय तेथें आला. त्याला दुरून पाहून भगवान् भिक्षूंना म्हणाला, “भिक्षुहो, हा जो दुर्वर्ण, कुरूप, ठेंगणा, भिक्षूच्या थट्टेला कारण असा भिक्षु येत आहे, त्याला तुम्हीं पाहिलें आहे काय?”

‘होय भदन्त,’ असे भिक्षूंनीं उत्तर दिलें.

“भिक्षुहो, हा मोठा बुद्धिमान् आणि महानुभाव आहे. अशी कोणतीहि समाधि नाहीं कीं, जी ह्याला प्राप्त झाली नाहीं. ज्या ध्येयासाठीं थोर लोक घर सोडून प्रव्रज्या स्वीकारतात, त्या ब्रह्यचर्याच्या पर्यवसानाचा ह्यानें साक्षात्कार करून घेतला आहे.” असें म्हणून भगवंतानें ह्या गाथा म्हटल्या :-

हंसा कोञ्चा मयूरा च हत्थियो पसदा मिगा ।
सब्बे सीहस्स भायन्ति नत्थि कायस्मिं तुल्यता ।।१।।
एवमेव मनुस्सेसु दहरो चे पि पञ्ञवा ।
सो हि तत्थ महा होति नेव बालो सरीरवा ।।२।।

(१) हंस, क्रौंच, मोर, हत्ती आणि मृग हे सर्व सिंहाला भितात. येथें शरीराची तुलना उपयोगी नाहीं.

(२) त्याचप्रमाणें माणसांत लहान असून जो प्रज्ञावान् असतो तोच मोठा होय. महाशरीर मूर्ख मोठा ठरत नाहीं.
. . .