बौद्धसंघाचा परिचय
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

बौद्धसंघाचा परिचय : भाग ३ रा 10

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय

भाग ३ रा 9   भाग ३ रा 11

ही गोष्ट भगवंताला कळवून भिक्षु म्हणाले, “भदंत, पिंडोल भारद्वाजानें असें कां केलें असावें?” भगवान् म्हणाला, “स्मृति, समाधि आणि प्रज्ञा ह्या तीन इंद्रियांची १  भावना परिपूर्ण झाल्यामुळें भारद्वाजानें अर्हतपदप्राप्तीचें आविष्करण केलें आहे... ही इंद्रियें जातिजरामरणाचा अंत करणारीं आहेत.”
-----------------------------------------------------------------------------------------------------
१- येथें इंद्रियशब्द  सामर्थ्य किंवा शक्तिवाचक आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------
कौशांबी येथें असतांनाच तेथील राजा उदयन ह्याचा व भारद्वाजाचा संवाद वर सांगितलेल्या सळायतन संयुत्ताच्या सुत्तांत आला आहे. तो प्रसंग कसा घडून आला ह्याचें वर्णन त्या सुत्ताच्या अट्ठकथेंत आलें आहे तें असें :-

एके दिवशीं पिंडोल भारद्वाज गंगेच्या २  [यमुनेच्या?] कांठीं असलेल्या उदकस्थान नांवाच्या उदयन राजाच्या उद्यानांत येऊन विश्रांतीसाठीं एका वृक्षाखालीं बसला. उदयनराजानें त्यावेळीं दारू पिण्याचा सप्ताह केला होता. सात दिवसापर्यंत यथेच्छ मद्यपान करून आठव्या दिवशीं आपल्या स्त्रीपरिवाराला घेऊन तो त्या उद्यानांत आला, व तेथें नाचतमाशाल सुरुवात झाली. राजा एका शय्येवर पडला होता, व एक बाई त्याचे पाय दाबीत बसली होती. इतक्यांत त्याला गाढ झोंप लागली. इकडे तिकडे फिरून मजा करण्याची हीच वेळ आहे, असें जाणून इतर स्त्रियांनीं आपलीं विविध वाद्यें तेथेंच ठेवून उद्यानांत प्रवेश केला. फळें फुलें तोडीत त्या पिंडोल भारद्वाज बसला होता तेथें आल्या, व त्याला पाहून अत्यंत शांत वृत्तीनें त्याजवळ येऊन त्याला नमस्कार करून एका बाजूला बसल्या. लोभ सोडावा, ईर्ष्या सोडावी, मात्सर्याचा नाश करावा इत्यादि क्रमानें पिंडोल भारद्वाजानें त्यांना उपदेश केला.
-----------------------------------------------------------------------------------------------------
२- सिंहल द्वीपांत बहुतेक नद्यांना गंगाच म्हणण्याची वहिवाट असे.
-----------------------------------------------------------------------------------------------------
इकडे पाय दाबणार्‍या बाईनें पाय हालवून हालवून राजाला जागें केले. ‘इतर बायका कोठें गेल्या,’ असा त्यानें प्रश्न केला. तेव्हां ती म्हणाली, “आपणाला त्या कशाला पाहिजेत? त्या एका श्रमणाला घेरून बसल्या आहेत.” चूलींत टाकलेल्या मिठाप्रमाणें तडतडणारा तो राजा अत्यंत क्रोधाविष्ट होऊन उठला. जवळच्या एका अशोक वृक्षावर तांबड्या मुंग्यांचें घरटें होतें. तें काढून भारद्वाजाच्या डोक्यावर फोडण्यासाठीं त्यानें ती फांदी वांकविली. परंतु तें घरटें तुटून राजाच्याच डोक्यावर पडलें. सगळें अंग भाताच्या तुसानें भरल्यासारखें झालें, आणि अंगाला मशाली लावल्यासारखा दाह होऊं लागला.

राजा क्रोधाविष्ट झाला, हें पाहून पिंडोल भारद्वाजानें आपल्या ऋद्धिबळानें आकाशमार्गानें तेथून गमन केलें. तेथें बसलेल्या स्त्रिया राजाजवळ आल्या आणि राजाचें शरीर साफ करण्याच्या मिषानें खालीं पडलेल्या मुंग्या उचलून राजाच्या अंगावर टाकूं लागल्या. त्या म्हणाल्या, “दुसरे राजे श्रमणांना नमस्कार करीत असतात, पण आमचे राजेसाहेब श्रमणाच्या डोक्यावर मुंग्यांचें घरटें फोडूं पहात आहेत!” राजाला आपला अपराध दिसून आला, आणि उद्यानपाळाला बोलावून तो म्हणाला, “हा भिक्षु जर पुन्हां येथें आला तर मला वर्दी दे.”
. . .