बौद्धसंघाचा परिचय
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

बौद्धसंघाचा परिचय : भाग ३ रा 19

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय

भाग ३ रा 18   भाग ३ रा 20

१३
सुभूति


“निल्केशवृत्ति भिक्षुश्रावकांत सुभूति श्रेष्ठ आहे.”
“दर्क्षिणार्ह भिक्षुश्रावकांत सुभूति श्रेष्ठ आहे.”

हा श्रावस्ती येथें सुमन श्रेष्ठीच्या घरीं जन्मला. सुभूति हें त्याचें नांव. बुद्ध भगवंताला आमंत्रण करून अनाथपिंडिकानें श्रावस्तीला आणलें व जेतवनविहार दान दिला, त्या वेळीं बुद्धोपदेश ऐकून हा भिक्षु झाला. जात्याच हा निष्कामबुद्धि होता, व मनस्ताप शमन करण्यासाठीं इतर श्रावकांप्रमाणें ह्याला प्रयास पडले नाहींत. म्हणून भगवंतानें निल्केशवृत्ति भिक्षूंत त्याला अग्रस्थान दिलें. मैत्रीचें ध्यान सुभूतीला अत्यंत प्रिय असे. मैत्रीची भावना केल्यावांचून तो पाऊल पुढें टाकीत नसे; घरोघरीं मैत्रीयुक्त चित्तानेंच भिक्षा ग्रहण करी. म्हणून त्याला दक्षिणार्ह भिक्षूंत अग्रस्थान मिळालें. पालि वाङ्मयांत सुभूतीसंबंधानें थोडा उल्लेख आहे; पण मैत्री हेंच त्याचें ब्रीद असल्यामुळें त्याला महायान वाङ्मयांत बरेंच महत्त्व होतें असें वाटतें. त्या पंथाचे जे अत्यल्प ग्रंथ उपलब्ध आहेत, त्यांत वज्रच्छेदिका हा एक आहे;  व हें सूत्र भगवंतानें सुभूतीलाच उद्देशून उपदेशिलेलें आहे.

१४
खदिरवनिय रेवत
“आरण्यक भिक्षुश्रावकांत खदिरवनिय रेवत श्रेष्ठ आहे.”

हा सारिपुत्ताचा कनिष्ठ बंधु. सारिपुत्त तीन बहिणींत आणि भावांत वडील, व हा सर्वांत लहान.१ (१- चाला, उपचाला आणि सीसूपचाला हीं त्याच्या बहिणींची नांवें थेरीगाथेंत आणि तिच्या व थेरगाथेच्या अट्ठकथेंत सांपडतात. सारिपुत्त, वंगन्तपुत्त व रेवत, हे तिघे भाऊ.) ह्यानें भिक्षु होऊं नये म्हणून त्याच्या आईबापांनीं लहानपणींच त्याचें लग्न करण्याचा बेत केला. त्याच्यासाठीं ठरविलेली मुलगी त्यांच्या आजीला व आज्याला नमस्कार करण्यासाठी आली होती. त्या वेळीं, तूं ह्या तुझ्या आजीबाईपेक्षां जास्ती वर्षे जग, असा आजोबानें तिला आशीर्वाद दिला. तेव्हां लहानगा रेवत म्हणाला, “तुम्ही काय म्हणतां? ही सुंदर दिसणारी मुलगी आमच्या आजीबाईसारखीच दिसणार कीं काय?”  आजोबा म्हणाला, “रे मुला, तुला कांहीं समजत नाहीं. पुण्यवान प्राणी असतात, ते असे वृद्ध होतात.” तें ऐकून रेवत चिंतामग्न झाला. ‘अरेरे, हें सुंदर शरीर आजीबाईप्रमाणें सुरकुतलेलें, ज्याच्या डोक्याचे केंस पांढरे झाले आहेत, दांत भग्न झाले आहेत, असें होणार ना? अशा रूपावर आसक्त होऊन मी काय करणार आहें? माझ्या बंधूचाच मार्ग मला पत्करला पाहिजे,’ अशा विचारांनी रेवताचें मन भरून गेलें;  व शेवटीं घरांतून पळ काढण्याचा त्यानें निश्चय केला.

लग्नाचा दिवस मुक्रर झाला. सगे सोयरे गोळा झाले. पण सकाळपासून रेवताचें मन ह्या मंगल कार्यांत नसून तो समवयस्क मुलांबरोबर इकडे तिकडे दौडत होता. आईबाप म्हणाले, “अशा दिवशीं तूं इकडे तिकडे धांवत आहेस, हें तुला शोभतें काय?” रेवत म्हणाला, “माझ्या सोबत्यांबरोबर जरा खेळलों तर काय झालें?” मुलगा उनाड आहे, असें म्हणून आईबापांनीं आपल्या मनाची समजूत करून घेतली. पण लग्नविधीला सुरवात होण्यापूर्वीं रेवतानें आपल्या सोबत्यांना मागें टाकून असा पळ काढला कीं, पुन्हां त्याच्या आईबापांना आणि नातलगांना तो सांपडला नाहीं १ !
-----------------------------------------------------------------------------------------------------
१- येथें ‘सुमुहूर्त सावधान’ म्हटल्याबरोबर पळ काढणार्‍या नारायणाची (रामदासांची) वाचकांना आठवण झाल्यावांचून राहणार नाहीं.
-----------------------------------------------------------------------------------------------------
एका अरण्यप्रदेशांत कांहीं भिक्षु रहात होतें. तेथें येऊन रेवत त्यांजपाशीं प्रव्रज्या मागूं लागला. पण ते म्हणाले, “मुला तूं आहेस कोण?  हा नवरदेवाचा पोशाख काय आणि प्रव्रज्या मागतोस काय?”

तें ऐकून, ‘मला लुटतात, मला लुटतात’ अशी रेवतानें आरडाओरड केली.
. . .