बौद्धसंघाचा परिचय
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

बौद्धसंघाचा परिचय : भाग ३ रा 20

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय

भाग ३ रा 19   भाग ३ रा 21

भिक्षु म्हणाले, “अरे सज्जन मुला, आम्हांला तुजपासून कांहीं नको आहे, आणि उगाच आरडाओरडा कां करतोस?”

“भदंत, माझीं वस्त्रप्रावरणें तुम्ही हिरावूं पहात नाहीं, हें मी पक्कें जाणून आहें. पण माझ्या वडील बंधूनें मिळविलेली संपत्ति तुम्ही मला देऊं इच्छीत नाहीं.”

“अरे पण तुझा वडील बंधु कोण? त्यानें मिळविलेली संपत्ति ती काय?  आणि आमच्यापाशीं ती कशी आली?”

“माझ्या वडील बंधूचें नांव उपतिष्य; पण तो सारिपुत्त ह्या नावांनेंच प्रसिद्ध आहे. त्याची मिळकत कोणती, हें तुम्हांस सांगावयास पाहिजे काय?”

सारिपुत्त सर्व भिक्षुसंघांत प्रसिद्धच होता, व त्याच्या धाकट्या भावाला शोभण्यासारखी हुशारी रेवताच्या आंगीं पाहून त्या भिक्षूंनीं त्याचें कौतुक केलें व त्याला श्रामणेरप्रव्रज्या दिली.

श्रामणेर झाल्यावर रेवत एका भयंकर खदिरवनांत रहात असे, व तेथेंच तो अर्हतपदाला पावला. त्याला भेटण्याची सारिपुत्ताला इच्छा होती. पण एक दोनदां खदिरवनाला जाण्याची परवानगी मागितली असतां भगवंतानें ती दिली नाहीं, कां कीं, रेवत त्या वेळीं अर्हत्पदाला पावला नव्हता. पु्न्हां सारिपुत्तानें परवानगी मागितली, तेव्हां भिक्षुसंघासह भगवानहि तिकडे जाण्यास सिद्ध झाला. रेवताच्या वसतिस्थानीं जाण्याला दोन रस्ते होते. सरळ रस्ता साठ योजनांचा व जवळचा रस्ता तीस योजनांचा होता;  पण हा रस्ता अडचणीचा असून वाटेंत अन्नपाण्याची टंचाई होती. कोणत्या रस्त्यानें जाऊं या, असा आनंदानें प्रश्न केला;  तेव्हां जवळचा रस्ता पत्करण्यास भगवंतानें सांगितलें. आनंद म्हणाला, “पण भदन्त, ह्या रस्त्यांत भिक्षुसंघाला अन्नपाण्याची टंचाई पडेल.” भगवान् म्हणाला, “आनंद, त्याची तुला काळजी नको. आमच्याबरोबर सीवलि १  आहे, तो सर्व व्यवस्था पाहील.”
-----------------------------------------------------------------------------------------------------
१- सीवलीनें मोठमोठाले प्रवास केले होते, व पूर्वपुण्याईमुळें त्याला कोठेंच अन्नपाण्याची ददात पडली नाहीं. सीवलीची कथा ह्या भागाच्या अठराव्या प्रकरणांत पहावी.
-----------------------------------------------------------------------------------------------------
भगवान् निवासस्थानाजवळ आला, तेव्हां रेवतानें त्याची व भिक्षुसंघाची रहाण्यासवरण्याची यथाशक्ती व्यवस्था लाविली. भगवान् त्याला म्हणाला, “रेवता, हें तर हिंस्त्रप्राण्यांचें जंगल दिसतें. येथें सिंहव्याघ्रादिकांच्या गर्जना व हत्तींच्या किंकाळ्या ऐकून तुला काय वाटतें?”

रेवत म्हणाला, “भदंत, अशा प्रसंगीं मला भय न वाटतां एक प्रकारचें अरण्यप्रेम वाटतें.”

हें त्याचे उत्तर ऐकून भगवान् प्रसन्न झाला, व अरण्यवासापासून, कोणकोणते फायदे आहेत, ह्या संबंधानें त्यानें रेवताला सविस्तर उपदेश केला.

भिक्षुसंघासह भगवान् परत श्रावस्तीला आला तेव्हां विशाखा उपासिकेनें, हा प्रवास कसा काय झाला व रेवताचें रहाण्याचें स्थान कसें काय आहे, इत्यादिकांची भिक्षूंपाशीं चौकशी केली. जे भिक्षु अर्हत्पदाला पोहोंचले होते, त्यांनीं रेवताच्या स्थानाची स्तुति केली; पण सामान्य भिक्षूंला तें अरण्यमय स्थान आवडलें नाहीं, असें त्यांच्या बोलण्यावरून विशाखेला दिसून आलें. जेव्हां तिनें त्या प्रवासासंबंधी भगवंताला विचारलें, तेव्हां भगवंतानें ही गाथा म्हटली :-

गामे वा यदि वारञ्ञे निन्ने वा यदि वा थले ।
यत्थारहन्तो विहरन्ति तं भूमिं रामणेय्यकं ।।
. . .