बौद्धसंघाचा परिचय
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

बौद्धसंघाचा परिचय : भाग ३ रा 33

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय

भाग ३ रा 32   भाग ३ रा 34

२५
दब्ब मल्लपुत्त

“शयनासनांची व्यवस्था लावणार्‍या भिक्षुश्रावकांत दब्ब मल्लपुत्त श्रेष्ठ आहे.”

हा मल्लांच्या राज्यांत अनुप्पिय येथें एका मल्लराजाच्या घरीं जन्मला. आईला नवमास पूर्ण झाल्यावर ती एकाएकीं मरण पावली. तिला चितेवर ठेवून अग्नि देण्यांत आला. तेव्हां अग्निसंतापानें पोट फुटून गर्भ खालीं एका बाजूला द्रव्यतृणावर (दूर्वांवर) पडला. त्यांतून जिवंत मुलगा निघाला; व त्याला आणून आजीच्या स्वाधीन करण्यांत आलें. द्रव्यतृणावर पडून बचावला म्हणून आजींने त्याचें नांव दब्ब (द्रव्य) हेचं ठेविलें. वयांत आल्यावर आजीची परवानगी घेऊन तो भिक्षु झाला. त्याची कार्यक्षमता पाहून संघानें त्याला शयनासनांचा व्यवस्थापक नेमलें. हें काम तो उत्कृष्ट रितीनें करीत असे. पण त्यामुळें मेत्तिय आणि भुम्मजक हे दोघे भिक्षु त्याचे वैरी झाले. दुसर्‍या भागाच्या १२, १३ व ६२ कलमांत ह्याची गोष्ट आलीच आहे. दब्बाचें चीवर जीर्ण झालें असतां संघानें आपल्या मालकीचें चीवर दब्बाला दिलें व त्यामुळें षड्वर्गीय भिक्षु संघाला दोष देऊं लागले, ही गोष्ट त्याच भागाच्या १३० व्या कलमांत आहे. ह्यावरून असें दिसून येतें कीं, अपवादादाखल थोडे भिक्षु खेरीज करून व्यवस्थापक ह्या नात्यानें दब्ब मल्लपुत्त सर्व भिक्षुसंघाला प्रिय होता, व त्यामुळेंच शयनासनांची व्यवस्था लावणार्‍या भिक्षुश्रावकांत त्याला अग्रस्थान मिळालें.

२६
पिलिंदवच्छ

“देवतांना प्रिय असलेल्या भिक्षुश्रावकांत पिलिंदवच्छ श्रेष्ठ आहे.”

हा श्रावस्ती येथें ब्राह्मणकुळांत जन्मला. पिलिंदवच्छ हें त्याचें नांव. वयांत आल्यावर भिक्षु होऊन अनुक्रमें तो अर्हत्पदाला पावला. तरी भिक्षूंना आणि इतरांना ‘वृषल’ म्हणून हांक मारण्याची त्याची खोड गेली नव्हती. ह्या संबंधीं उदानवग्गांत जी गोष्ट आहे, तिचा सारांश असाः-

एके समयीं भगवान् राजगृह येथें वेळुवनांत रहात होता. त्या वेळीं पिलिंदवच्छ भिक्षूंना ‘वृषल’ म्हणत असे. ही गोष्ट भगवंताला समजली, तेव्हां पिलिंदवच्छाला बोलावून आणून त्यानें ह्यासंबंधीं चौकशी केली. ‘आपण असें म्हणत असतों,’ हें पिलिंदवच्छानें कबूल केलें. पण त्याच्या मनांत दुष्टबुद्धि मुळींच नाहीं हें जाणून भगवान् भिक्षूंना म्हणाला, “भिक्षुहो, पांचशें जन्म हा ब्राह्मकुळांत जन्मला असल्यामुळें वृषल शब्द ह्याच्या तोंडीं बसला आहे. पण ह्याच्या मनांत कपट किंवा मान नाहीं.”

२७
बाहिय दारुचीरिय


“तत्काळ बोध करून घेणार्‍या भिक्षुश्रावकांत बाहिय दारुचीरिय श्रेष्ठ आहे.”

हा बाहिय राष्ट्रांत समुद्रकिनार्‍याच्या गांवीं जन्मला होता, व नौकानयनानें आपला निर्वाह करी. एके वेळीं नावेंतून सुवर्णभूमीला जात असतां नाव तुफानांत सांपडून बुडाली. पण सुदैवानें एका दारूखंडाच्या आश्रयानें तरंगत तरंगत हा सुप्पारक पट्टनाजवळ येऊन किनार्‍याला लागला. त्याचीं वस्त्रेंप्रावरणें सुमद्राच्या लाटांनीं हिरावून नेल्यामुळें नग्नस्थितींत गांवांत जाणें त्याला लज्जास्पद वाटलें, व जवळच्या तलावाच्या कांठीं पडलेलें शेवाळ १ नेसून व एक मृत्कपाल हातांत घेऊन तो गांवांत भिक्षेला गेला. सुप्पारक येथील लोक त्याला पाहून फार प्रसन्न झाले. हा कोणी तरी मोठा सत्पुरुष असावा, असें त्यांस वाटलें, व त्याचें सत्त्व पहाण्यासाठीं त्यांनीं नानाप्रकारचीं वस्त्रें देऊं केलीं. शेवाळ नेसल्यानें आपला इतका गौरव होत आहे, हें पाहून बाहियानें तीं वस्त्रें घेण्याचें साफ नाकारलें. तेव्हांपासून त्याचा अधिकच गौरव होऊं लागला. शेवाळापेक्षां फलकाचा तुकडा अधिक साधा व सोईस्कर, असें जाणून फलकाच्या तुकड्यांला दोर्‍या बांधून, ते तो नेसत असे;  म्हणून त्याला दारुचीरिय हें नांव पडलें. ह्या गुणामुळें लोकांनीं त्याचे फार देव्हारे माजविल्यामुळें त्यालाहि आपण अर्हन्त झालों असें वाटूं लागलें.
------------------------------------------------------------------------------------------------------------
१- उदानअट्ठकथेंत, ‘रुईचीं फळें वाकाच्या दोर्‍यांनीं बांधून ती नेसला,’ असे आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
. . .