बौद्धसंघाचा परिचय
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

बौद्धसंघाचा परिचय : भाग ३ रा 36

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय

भाग ३ रा 35   भाग ३ रा 37

३०
आनंद

“बहुश्रुत भिक्षुश्रावकांत आनंद श्रेष्ठ आहे.”
“स्मृतिमान् भिक्षुश्रावकांत आनंद श्रेष्ठ आहे.”
“गतिमान २ भिक्षुश्रावकांत आनंद श्रेष्ठ आहे.”

“धृतिमान् भिक्षुश्रावकांत आनंद श्रेष्ठ आहे.”
“उपस्थायक भिक्षुश्रावकांत आनंद श्रेष्ठ आहे.”
------------------------------------------------------------------------------------------------------------
२ गतिमान् म्हणजे वेगवान्; उपदेशकाचा उपदेश त्वरित लक्षांत घेणारा.
------------------------------------------------------------------------------------------------------------
आतांपर्यंत आलेल्या भिक्षूंत किंवा पुढें येणार्‍यांत दोहोंच्या पलिकडे सुत्तें कोणालाहि मिळालीं नाहींत; पण आनंदाला पांच देण्यांत आलीं आहेत. त्यावरून त्रिपिटकवाङ्मयांत आनंदाची केवढी योग्यता आहे, याचें अनुमान सहज करतां येईल. हा भगवंताचा चुलत भाऊ; अमितोदन शाक्याचा मुलगा; भगवंतापेक्षां वयानें लहान. अनुरुद्धाबरोबर पांच शाक्यकुमारांनीं प्रव्रज्या घेतली, त्यांपैकीं हा एक. हा इतका बहुश्रुत होता कीं, भगवंताच्या पश्चात् त्याच्या उदेशाचें संकलन करण्यासाठीं महाकाश्यपाला त्याची फार मदत झाली. बहुतेक सुत्ताच्या आरंभीं ‘एवं मे सुतं (असें मी ऐकलें आहे)’ हें वाक्य असतें. भगवंताच्या परिनिर्वाणानंतर तीन महिन्यांनीं राजगृह येथें भरलेल्या सभेंत (संगीतींत) महाकाश्यपानें ‘तूं काय ऐकलें आहेस?’ असा आनंदाला प्रश्न विचारल असतां, त्यानें ‘एवं मे सुतं’ असे म्हणून भगवंताकडून ऐकलेलीं उपदेशात्मक सुत्तें सांगितलीं, असा अट्ठकथाकाराचा खुलासा आहे. हा जरी सर्वत्र लागू पडत नाहीं - कांकीं असें मीं ऐकलें आहे : एके समयीं आयुष्मान् आनंद अमुक तमुक ठिकाणीं रहात होता, अशा प्रस्तावनेचींहि कांहीं सुत्तें आढळतात - तरी कांहीं निवडक सुत्तें पहिल्या सभेंत आनंदानेंच म्हटलीं असावीं, आणि तेव्हांपासून वरील वाक्य प्रत्येक सुत्ताच्या आरंभीं घालण्याचा प्रघात रूढ झाला असावा. भगवंताचा अत्यंत अमोलिक उपदेश ज्यानें शीघ्रगतीनें आपल्या अंतःकरणांत सांठवून ठेवला, त्याला बहुश्रुत, स्मृतिमान्, गतिमान्, आणि धृतिमान् भिक्षूंत अग्रस्थान मिळालें ह्यांत आश्चर्य काय?

आनंदा खरा भक्त होता. भगवंताच्या परिनिर्वाणापर्यंत त्याला अर्हत्पद मिळालें नाहीं. तो केवळ स्त्रोतआपन्न होता. तरी भगवंतावर त्याचें निस्सीम प्रेम होतें. नागसमाल नागित, उपवाण, सुनक्खत्त, चुन्दश्रामणेर, सागत, राध व मेघिय ह्या सर्वांनीं मधून मधून भगवंताची सेवा (उपस्थान) केली आहे. तरी आनंदासारखा त्या सर्वांत कोणीहि नव्हता. कोणच्या वेळीं भगवंताला काय पाहिजे असतें, कोणाची भेट कशी करून द्यावी, इत्यादि सर्व गोष्टींत आनंद कुशल आणि दक्ष असे. एक तेवढें महापरिनिब्बानसुत्त १  वाचलें म्हणजे आनंदाला उपस्थायकांत अग्रस्थान कां मिळालें हें सहज समजतें.
------------------------------------------------------------------------------------------------------------
१- ह्याचा सारांश बुद्धलीलासारसंग्रहाच्या तिसर्‍या भागाच्या शेवटीं आला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
. . .