बौद्धसंघाचा परिचय
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

बौद्धसंघाचा परिचय : भाग ३ रा 52

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय

भाग ३ रा 51   भाग ३ रा 53

भद्दा, अशा स्थितींत घरी जाणें योग्य नाहीं, असें वाटून एका निर्ग्रंथांच्या २ आश्रमांत गेली, व तेथें तिनें प्रव्रज्येची याचना केली. त्यांनीं ताडफळाच्या बाट्यानें केंस उपटून तिला प्रव्रज्या दिली. पुन्हां केंस वाढूं लागले तेव्हां ते कुण्डलाकार झाले. त्यामुळें लोक तिला ‘कुंडलकेसा’ म्हणूं लागले.
------------------------------------------------------------------------------------------------------------
२- जैनसंप्रदायाला पूर्वी निर्ग्रंथसंप्रदाय म्हणत असत.
------------------------------------------------------------------------------------------------------------
निर्ग्रंथांच्या पंथांत निष्णात होऊन ती वादविवाद करीत फिरत असे. कोणत्याहि गांवाजवळ आल्यावर तेथें एक वाळूची रास करून त्याच्यावर जांभळीची फांदी रोवीत असे; व, जो कोणी श्रमण किंवा ब्राह्मण माझ्याशीं वाद करण्यास सिद्ध असेल त्यानें ही फांदी तुडवावी, असें म्हणत असे. श्रावस्ती येथें अशा रितीनें फांदी रोवून ती नगरांत गेली असतां सारिपुत्तानें मुलांकडून ती फांदी तुडवावयास लाविली, व भद्देच्या आव्हानावरून सर्व लोकांसमोर वाद करून तिला वादांत जिंकलें. त्यामुळें निर्ग्रंथांचा पंथ सोडून ती भिक्षुणी झाली.

वरील कथा मनोरथपूरणींत आणि थेरीगाथाअट्ठकथेंत सांपडते. परंतु खुद्द थेरीगाथेंत तिच्या पांच गाथा आहेत. त्यांपैकी पहिल्या चार अशा :-

लूनकेसी पड्कधरी एकसाटी पुरे चरिं।
अवज्जे वज्जमतिनी वज्जे चावज्जदस्सिनी।।१।।
दिवाविहारा निक्खम्म गिज्झकूटम्हि पब्बते।
अद्दसं विरजं बुद्धं भिक्खुसङ्घपुरक्खतं।।२।।
निहच्च जानुं वंदित्वा सम्मुखा पञ्जलि अहं।
एहि भद्देति अवच सा मे आसूपसम्पदा।।३।।
चिण्णा अङ्गा च मगधा वज्जी कासी च कोसला।
अनणा पञ्ञास वस्सानि रट्ठपिण्डं अभुञ्जिहं।।४।।

(१) केंस उफटलेली, दांतावर मळ धारण करणारी व एकच वस्त्र वापरणारी अशी मी (निर्ग्रंथभिक्षुणी) होतें. अयोग्य तें मला योग्य वाटत असे, व योग्य तें मी अयोग्य समजत असें. (२) दिवसा गृध्रकूटपर्वतावर गेलें असतां भिक्षुसंघानें पुरस्कृत केलेल्या विमल बुद्धाला मी पाहिलें. (३) गुढगे टेकून नमस्कार करून हात जोडून मी समोर उभी राहिलें; ‘भद्दे, ह्या धर्मात ये,’ असें भगवान् म्हणाला व तीच माझी उपसंपदा झाली. (४) अंग, मगध, वज्जी, काशी आणि कोसल ह्या देशांत मी (उपदेश करीत) प्रवास केला आहे. आज पन्नास वर्षे ऋणमुक्त होऊन मी राष्ट्रपिंड खात आहें.१
------------------------------------------------------------------------------------------------------------
१- ह्या गाथांचें आणि अपदानांतील भद्देच्या गोष्टीचें जुळतें. परंतु सारिपुत्तानें तिला भिक्षुणी केलें ही गोष्ट अपदानांत सांपडत नाहीं.
------------------------------------------------------------------------------------------------------------
. . .