बौद्धसंघाचा परिचय
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

बौद्धसंघाचा परिचय : भाग ३ रा 62

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय

भाग ३ रा 61   भाग ३ रा 63

उग्ग म्हणाला, “भदन्त, हे आठ गुण कोणते, तें मला माहीत नाहीं. तरी माझ्या अंगी कोणते कोणते गुण आहेत, हें मी तुम्हाला सांगतों. (१) जेव्हां मीं भगवंताला प्रथमतः पाहिलें, तेव्हांच माझी त्याजवर भक्ति जडली. हा पहिला उत्तम गुण माझ्यामध्यें आहे. (२) भगवंतानें मला धर्मोपदेश केला, आणि त्याचें तत्त्व मी जाणलें. आतां मला त्याच्या धर्माविषयी शंका राहिली नाहीं. बुद्धाला, धर्माला आणि संघाला मी शरण गेलों आहें, आणि ब्रह्मचर्यासहित पांच शिक्षापदे १
मीं अंगीकरारिलीं आहेत. हा दुसरा उत्तम गुण माझ्या अंगीं आहे. (३) मला चार कौमारिक स्त्रिया २ (२- कौमारिक स्त्रिया म्हणजे पुनर्विवाहाच्या नव्हेत.) होत्या. मी त्यांजकडे जाऊन त्यांना म्हणालों, “भगिनीनों, मी ब्रह्मचर्यासह पांच शिक्षापदें अंगीकारिलीं आहेत. तेव्हां तुमच्यापैकीं जिची इच्छा असेल, तिनें येथें राहून धर्मारचण करावें. जिची इच्छा असेल तिनें आपल्या माहेरीं जावें, व पुनर्विवाह करण्याची जिची इच्छा असेल १ (१- नष्टे मृते प्रव्रजिते क्लीबे च पतिते पतौ । पञ्चस्वापत्सु नारीणां पतिरन्यो विधीयते।। या पराशरस्मृतींतील श्लोकाची येथें आठवण होते.) तिनें आपणाला कोणता पति आवडतो, हें मला सांगावें. तेव्हां जी माझी ज्येष्ठ भार्या होती, ती म्हणालीं, “मला अमुक गृहस्थाला द्या.” त्या गृहस्थाला मी बोलावून आणलें, आणि डाव्या हातांत बायकोला व उजव्या हातांत पाण्याची झारी घेऊन तिला त्याच्या स्वाधीन करून त्याच्या हातावर पाणी सोडलें. अशा प्रसंगींहि माझ्या चित्तांत यत्किंचित् विकृति उत्पन्न झाली नाहीं. हा माझ्या अंगीं तिसरा उत्तम गुण आहे. (४) माझ्या घरीं जी संपत्ति आहे, ती केवळ माझीच नव्हे तर साधु संतांचीहि आहे, असें मी समजतों. हा माझ्या अंगीं चौथा उत्तम गुण आहे. (५) ज्या ज्या भिक्षूची मी उपासना करतों, त्या त्याची मोठ्या आदरानें उपासना करतों, हा माज्या अंगी पांचवा उत्तम गुण आहे. (६) ज्या भिक्षूनें जर मला धर्मापदेश केला तर मी तो आदरानें ऐकतों. त्यानें जर धर्मोपदेश केला नाहीं, तर मी त्याला धर्मोपदेश करतो. हा माझ्या अंगीं सहावा उत्तम गुण आहे. (७) भगवंतानें उत्तम प्रकारें धर्म उपदेशिला आहे, असें देवता मला सांगतात, ह्यांत कांहीं आश्चर्य नाहीं. पण मी त्यांना म्हणतों की, तुम्ही असें म्हणा किंवा न म्हणा, भगवंतानें उत्तम प्रकारें धर्म उपदेशिला आहे, ह्यांत मला शंका नाहीं. देवतांशीं माझा संवाद होतो, ह्या कारणास्तव माझ्या मनाला गर्वाची बाधा कधींच झालीं २ नाहीं.  हा माझ्या अंगीं सातवा उत्तम गुण आहे. (८) इहलोकाला आणणारीं जी पांच संयोजनें ३  भगवंतानें सांगितलीं त्याचा माझ्या मनांत लेशहि राहिला नाहीं. हा माझ्या अंगीं आठवा उत्तम गुण आहे.”
------------------------------------------------------------------------------------------------------------
१- प्राणघात न करणें, चोरी न करणें, व्यभिचार न करणें, खोटें न बोलणें व मादक पदार्थांचें सेवन न करणें, हे पांच नियम (शिक्षापदें (प्रत्येक बौद्ध गृहस्थाला पाळावे लागतात. त्यांत व्यभिचार न करणें, ह्याच्या ऐवजीं पूर्ण ब्रह्मचर्य पालन करणें, असा नियम उग्गगृहपतीनें केला होता. म्हणून ब्रह्मचर्यासहित पांच शिक्षापदें असें म्हटलें आहे. ‘ब्रह्मचरियपश्चमानि च शिक्खापदानि समादियिं’ असें मूळ वाक्य आहे. ‘अहिंसा सत्यमस्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमाः’ ह्या पतंजलीनें सांगितलेल्या यमांत ‘अपरिग्रह’ ह्याचा अर्थ मादक पदार्थांचें सेवन न करणें, असा जर केला, तर उग्गाच्या शिक्षापदांत आणि पतंजलीच्या यमांत मुळींच फरक रहात नाहीं.

२- येथें सॉक्रेटिसाबद्दल Oracle of Delphi  नें दिलेलें मत व त्यासंबंधीं सॉक्रेटिसाचें वर्तन यांची आठवण होते.

३- ‘बुद्ध, धर्म आणि संघ’ परिशिष्ट २ पहा.
------------------------------------------------------------------------------------------------------------
हें उग्ग गृहपतीचें भाषण ऐकून तो भिक्षु तेथून निघाला, व भिक्षाटन आटपून भगवंताजवळ आला. उग्गाची गोष्ट त्यानें भगवंताला सांगितली, तेव्हां भगवान् म्हणाला, “जें उग्ग गृहपति बोलला, तें ठीकच बोलला.”
. . .