बौद्धसंघाचा परिचय
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

बौद्धसंघाचा परिचय : भाग ३ रा 72

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय

भाग ३ रा 71   भाग ३ रा 73

खुज्जुत्तरेच्या सांगण्याप्रमाणें तिला बसण्यासाठीं एक उत्तम आसन देण्यांत आलें, आणि सामावती आणि तिच्या सख्या हलक्या आसनांवर बसून धर्मोपदेश ऐकूं लागल्या. त्यांना तो इतका आवडला कीं, त्या दिवसापासून खुज्जुत्तरेला पाठवून बुद्धाचा नवा नवा उपदेश त्या ऐकावयास लावीत, व तिच्याकडून आपण स्वतः ऐकत. त्याशिवाय खुज्जुत्तरेला महालांत दुसरें कोणतेंहि काम सांगण्यांत येत नसे.

सामावतीच्या सख्या बुद्ध भगवंताच्या धर्मावर अत्यंत प्रसन्न झाल्या होत्या खर्‍या; तरी राजाच्या भयामुळें भगवंताची भेट घेणें त्यांना शक्य नव्हतें. पण जेव्हा भगवान् रस्त्यांतून जाई, तेव्हां त्याला पहाण्यासाठीं महालाच्या खिडक्यांतून त्यांची एकच गर्दी होत असे. खिडक्या पुरत नसल्यामुळें त्या तोडून मोठ्या कराव्या लागल्या. त्यांची श्रद्धा पाहून मागंदियेचा मत्सर आणखीहि वाढला, व तिखटमीट लावून हें वर्तमान तिनें राजाला सांगितलें. राजानें सामावतीच्या महालाच्या खिडक्या बुजवावयास लावून वरच्या बाजूला खिडक्या करविल्या ज्यांतून महालांत प्रकाश येई. पण रस्त्यांतील कोणतीच वस्तू दिसत नसे.

परंतु एवढ्यानें मागंदियेची तृप्ति झाली नाहीं. राजा आपण सांगितलेलें ऐकतो, असें पाहून तिनें आणखीहि तरकटें रचण्यास सुरवात केली. राजा तिच्यावर महालांत गेला असतां ती त्याला म्हणाली, “महाराज, सामावतीचें तुमच्यावर प्रेम आहे, असें तुम्हांला वाटतें पण तें अगदीं खोटें आहे! याचा तुम्हांला अनुभव घ्यावयाचा असेल तर हे आठ कोंबडे तिच्याकडे पाठवा, व त्यांचें मांस तयार करून आणावयास सांगा.”

राजानें त्याप्रमाणें केलें. पण सामावती म्हणाली, “भगवंताचा धर्म जाणल्यामुळें ह्या जिंवत प्राण्यांला मारणें मला शक्य नाहीं.” अर्थात् तो मनुष्य परत कोंबडे घेऊन मागंदियेच्या महालांत आला. तेव्हां मागंदिया म्हणाली, “पाहिलेंत ना सामावतीचें आपल्यावरचें प्रेम! आतां हेच कोंबडे मारून भिक्षुसंघाला मांस तयार तरून पाठवा, असें मी तुमच्यातर्फे तिला सांगून पाठवितें; आणि मला खात्री आहे कीं, हें काम ती तेव्हांच करील.”

मागंदियेनें राजाला न कळत ते कोंबडे आपल्या माणसाकडून मारविले व त्यांचें मांस तयार करून भिक्षुसंघाला द्यावें, असा सामावतीला निरोप पाठविला. त्याप्रमाणें सामावतीनें केलें, मागंदियनें आल्हाळपाल्हाळ करून ही गोष्ट राजाला सांगितली; तरी राजाच्या मनावर तिच्या बोलण्याचा फारसा परिणाम झाला नाहीं.

एके दिवशीं सामावतीच्या महालांतून राजा थेट मागंदीयेच्या महालांत आला. उदयन राजा आपणाबरोबर एक लहानसा वीणा ठेवीत असे. हा वीणा त्याला हत्ती पकडण्याच्या कामीं फार उपयोगी पडे, आणि हा घेतल्याशिवाय तो कोठेंहि जात नसे. संधि साधून मागंदियेनें त्या विण्याला नाजूक शस्ज्ञानें भोंक पाडलें, व कांहीं दिवसांपूर्वीं महालांत आणून वेळूच्या नळकांड्यांत ठेवलेलें कृष्णसर्पाचें पिलूं हळूच त्या भोकांत सोडून देऊन तें भोंक बंद करविलें. नंतर राजापाशीं येऊन ती त्याला म्हणाली, “महाराज, सामावती तुमचा कधीं घात करील, याचा नेम नाहीं. ह्यासाठी तुम्ही सावध असा.” राजा आपला, वीणा वाजविण्याच्या बेतांत होता, तो लाडीगोडीनें त्याच्या हातांतून घेऊन मागंदिया स्वतः वाजवूं लागली, आणि एकाएकीं तें भोंक खुलें करून म्हणाली, “महाराज, येथें कांहीं तरी भयंकर आहे, आणि वीणा खालीं टाकून ती पळत सुटली. इतक्यांत तो सर्प त्या भोंकावाटे बाहेर पडला. त्याला पाहून राजाचा क्रोध गगनांत मावेना. त्यानें एकदम सामावतीला आणि तिच्या सख्यांना आपणासमोर आणण्याचा हुकूम केला.
. . .