बौद्धसंघाचा परिचय
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

बौद्धसंघाचा परिचय : भाग ३ रा 75

धर्मानंद कोसंबी यांनी लिहिलेला बौद्धसंघाचा परिचय

भाग ३ रा 74   भाग ३ रा 76

ती :- आर्य, आज तुम्हांला फार मेहनत पडल्यामुळें तुमचे डोळे बिघडले असले पाहिजेत.

पूर्ण :- अग, जर तुझा माझ्यावर विश्वास नाहीं, तर तूं स्वतःच जाऊन पहा.

तें सोनेंच आहे, अशी तिचीहि खात्री झाली. तेव्हां पूर्ण म्हणाला, “हें आपण चोरून नेलें तर अपराधी ठरूं. तूं येथेंच रहा. मी राजाला ह्याची वर्दी देतों.”

एका ताटांत तेथील सोन्याची माती भरून पूर्ण राजद्वारीं गेला, व राजाला घडलेलें सर्व वर्तमान त्यानें निवेदित केलें. राजानें तें सर्व सोनें राजवाड्यांत आणलें, व पूर्णाला ‘धनश्रेष्ठी’ हें नांव देऊन श्रेष्ठीपदाला चढविलें.

उत्तरा सुस्वरूप होतीच. त्यांत तिच्या बापाची मोठी योग्यता झाल्यामुळें खुद्द पूर्णाच्या मालकानें-सुमन श्रेष्ठीनें - आपल्या मुलासाठीं तिची मागणी केली. पण पूर्ण म्हणाला, “मला तुमच्या घरीं मुलगी द्यावयाची नाहीं.” तें ऐकून सुमन श्रेष्ठीला वाईट वाटलें व त्यानें सांगून पाठविलें कीं, ‘इतकीं वर्षें माझ्या पदरी राहून अधिकार मिळाल्याबरोबर मला विसरलास कीं काय?’ तेव्हा पूर्ण म्हणाला, “मी तुम्हांला विसरलों नाहीं. तुमच्या कुळाची आणि गोत्राची मला पर्वा नाहीं. पण तुम्ही पडलां इतर पंथाचे, आणि माझी मुलगी बुद्धानुयायिनी! तेव्हां तिचे तुमच्या घरी कसें जमणार?” त्यावर सुमन श्रेष्ठीनें लिहिलें कीं, ‘आमचा जुना संबंध तोडणें चांगलें नाहीं. मी जरी अन्यपंथी असलों, तरी माझ्या सुनेच्या वहिवाटींत कांहीं अंतर पडूं देणार नाहीं. बुद्धाचा सत्कार करण्यासाठीं १ जो तिला खर्च येईल, तो देण्यांत येईल.’
------------------------------------------------------------------------------------------------------------
१- ती बुद्धपूजेसाठीं एका कार्षापणाचीं फुलें पाठवीत असे, असें मनोरथपूरणींत आहे. पण विहारांत रोज फुलें पाठविण्याची चाल बुद्धाच्या वेळची नसून बुद्धघोषाच्या वेळची होती. म्हणून मूळच्या वाक्याचें रूपांतर करतांना थोडा फेरफार केला आहे.)
------------------------------------------------------------------------------------------------------------
त्यानंतर उत्तरेचें सुमनश्रेष्ठीच्या मुलाशीं लग्न करण्यांत आलें. कांही काळानें ती आपल्या नवर्‍याला म्हणाली, “मी माझ्या माहेरीं असतां दरमहिन्याला आठ दिवस उपोसथव्रत पाळीत असें. तेव्हां येथेंहि तसें करण्यास परवानगी द्या.” पण त्याला ही गोष्ट पसंत पडली नाहीं. चातुर्मास आला तरी उत्तरेला उपोसथ करण्याला परवानगी मिळेना. चातुर्मासाचा शेवटचा पंधरवडा येण्यापूर्वीं तिनें आपल्या बापास पत्र लिहिलें कीं, ‘तुम्ही येथें मला तुरुंगांत टाकून दिलें आहे. इतक्या काळांत मला एक दिवसहि उपोसथ पाळतां आला नाहीं. तेव्हां आतां माझ्यासाठीं एकदम पंधरा हजार कार्षापण पाठवा.’

तिच्या आईबापांनीं ही एवढे पैसे कां मागते ह्याची चौकशी करण्याच्या भरीस न पडतां एकदम पंधरा हजार कार्षापण पाठवून दिले. त्या वेळीं राजगृहांत सिरिमा नांवाची एक गणिका असे. तिला बोलावून आणून उत्तरा म्हणाली, “सिरिमाबाई, मी पंधरा दिवस उपोसथव्रत पाळूं इच्छित आहें. तेव्हां हे पंधरा हजार कार्षापण घेऊन ह्या पंधरवड्यांत माझ्या जागीं तूं माझ्या नवर्‍याची सेवा कर.”

सिरिमेनें ही गोष्ट कबूल केली. तिच्या बरोबर मजा करण्यास मिळणार आहे, हें पाहून उत्तरेच्या नवर्‍यानें उत्तरेला उपोसथ पाळण्यास तेव्हांच परवानगी दिली. त्या दिवसापासून उत्तरा दासींना बरोबर घेऊन खाण्यापिण्याचे पदार्थ तयार करून संघाला दान देत असे, व राहिलेला वेळ धर्मचिंतनांत घालवीत असे. ह्या प्रमाणे पंधरवडा संपत आला.
. . .