समाधिमार्ग
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

समाधिमार्ग : कायगतास्मृति आणि अशुभे 1

समाधिमार्ग फार प्राचीन आहे. आळार कालाम आणि उद्दक रामपुत्त हे दोघे समाधिमार्गाचे पुरस्कर्ते होते, व त्यांचा पंथ कोसल देशात बुद्धसमकाली अस्तित्वात होता.

आनापानस्मृतिभावना 5   कायगतास्मृति आणि अशुभे 2

कायगतास्मृति आणि अशुभे

आनापानस्मृतीच्या खालोखाल सुत्तापिटकात कायगतास्मृतीचे महत्त्व दिसून येते.  अंगुत्तरनिकायाच्या पहिल्याच निपातात अमत ते भिक्खवे न परिभुञ्ज्न्ति ये कायगतासतिं न परिभुञ्ज्न्ति ।  अमतन्ते विक्खवे परिभुञ्ज्न्ति ये कायगतासति परिभुञ्ज्न्ति ।  (भिक्षुहो, त्यांनी अमृताचा उपभोग घेतला नाही, ज्यांनी कायगतास्मृतीचा उपभोग घेतला नाही; पण त्यांनी अमृताचा उपभोग घेतला, ज्यांनी कायगतास्मृतीचा उपभोग घेतला.)  अशा अर्थाची कायगतास्मृतीच्या स्तुतीची अनेक सुत्ते आहेत.  तेव्हा त्या स्मृतीला येथे दुसरे स्थान देण्यात आले आहे.

कायगतास्मृति म्हणजे आपल्या शरीरातील केशलोमादिक बाह्य, किंवा मांसलोहितादिक अभ्यन्तर पदार्थांचे सूक्ष्म बुद्धीने निरीक्षण करून व त्यांची अशुभता जाणून त्यांच्यावर ध्यान करणे.  या स्मृतीचे विधान मञ्झमनिका-यातील कायगतासतिसुत्तांत (नं. ११९) दिले आहे, ते येणे प्रमाणे ः-

भगवान् म्हणतो, ''(१) भिक्षुहो, एकादा भिक्षु अरण्यांत वृक्षाखाली किंवा दुसर्‍या एखाद्या एकांत स्थळी आसनमांडी ठोकून आणि स्मृति जागृत ठेवून बसतो.  तो सावधानपणे आश्वास घेतो व सावधानपणे प्रश्वास सोडतो; दीर्घ आश्वास घेत असला, तर दीर्घ आश्वास घेत आहे असे जाणतो; दीर्घ प्रश्वास सोडीत असला, तर दीर्घ प्रश्वास सोडीत आहे असे जाणतो; र्‍हस्व आश्वास घेत असला, तर र्‍हस्व आश्वास घेत आहे असे जाणतो; र्‍हस्व प्रश्वास सोडीत असला, तर र्‍हस्व प्रश्वास सोडीत आहे असे जाणतो; सर्व देहाची स्मृति ठेवून आश्वास करण्याचा व प्रश्वास करण्याचा अभ्यास करतो; कायसंस्कार शांत करून आश्वास करण्याचा व प्रश्वास करण्याचा अभ्यास करतो.  याप्रमाणे सावधपणे आणि लक्ष्यपूर्वक वागत असता त्यांचे प्रपंचाकडे धावणारे संकल्प नष्ट होतात व चित्त एकाग्र होते.

'' (२) आणखी तो जात असता जात आहे हे जाणतो, उभा असता उभा आहे हे जाणतो; बसला असता बसलो आहे हे जाणतो; बिछान्यावर पडला असता पडलो आहे हे जाणतो; शरीर ज्या ज्या अवस्थेत असेल त्या त्या अवस्थेत ते आहे हे जाणतो.  या प्रमाणे सावधपणे इत्यादि....

'' (३) आणखी तो जात येत असता, इकडे तिकडे पहात असता, पात्रचीवर धारण करीत असता, खात पीत असता, मळमूत्रांचा उत्सर्ग करीत असता, चालत असता, उभा असता, बसला असता, अंथरूणावर पडला असता, बोलत असता, मुकाट्याने राहिला असता- या सर्व अवस्थांत विचारपूर्वक वागतो.  याप्रमाणे सावधपणे इत्यादि....

'' (४) आणखी भिक्षुहो, तो भिक्षु पादतलांच्यावर, डोक्याच्या केसाखाली आणि त्वचेने वेढलेला हा देह अनेक अशुचि पदार्थांनी भरला आहे असे जाणतो; या देहात केस, लोभ, नखे, दात, त्वचा, मांस, स्नायू, हाडे, अस्थिमज्जा, वृक्क (मृत्राशय), हृदय, यकृत्, क्लोम प्लीहा, फुप्फुस, आतडे, आतड्याची दोरी, औदर्य, विष्ठा, पित्त, कफ, पूं, रक्त, स्वेद, मेद, आसवे; वसा, थुंकी, शेंबूड, लस, मूत्र, हे पदार्थ आहेत, हे पहातो.

'' (५) आणखी तो या शरीराचे चार महाभूतांप्रमाणे चार विभाग पाडतो.  या देहात पृथ्वीधातु, आपोधातु, तेजीधातु आणि वायुधातु या चार धातु आहेत याचा तो विचार करतो.
. . .