समाधिमार्ग
धर्मानंद कोसंबी Updated: 15 April 2021 07:30 IST

समाधिमार्ग : ब्रम्हविहार 5

समाधिमार्ग फार प्राचीन आहे. आळार कालाम आणि उद्दक रामपुत्त हे दोघे समाधिमार्गाचे पुरस्कर्ते होते, व त्यांचा पंथ कोसल देशात बुद्धसमकाली अस्तित्वात होता.

ब्रम्हविहार 4   अनुस्मृति, संज्ञा आणि व्यवस्थान 1

या सूत्रात सांगितलेले फायदे जसे मैत्रीभावनेला लागू पडतात तसे ते करुणा, मुदिता आणि उपेक्षा, या तीन भावनांनाही लागू पडतात.  या चार भावनांच्या फायद्यासंबंधाने अंगुत्तरनिकायाच्या दसकनिपातांत एक महत्त्वाचे सुत्त (नं. २०८) आहे.  त्याचा सारांश असा --

भगवान् म्हणाला, ''विचारपूर्वक केलेल्या कर्माचे फळ अनुभविल्याशिवाय त्याचा अंत होत नाही.  इहलोकी किंवा परलोकी त्यांचे फळ भोगावे लागते.  आणखी भिक्षुहो, ही कर्मे जाणल्याशिवाय दुःखाचा अंत होत नाही.  भिक्षुहो, आर्यश्रावक अभिध्येपासून (लोभापासून), द्वेषापासून आणि मोहापासून मुक्त होऊन मोठ्या जागृत अंतकरणाने मैत्रीसहमतचित्ताने... करुणासहगतचित्ताने... मुदितासहगतचित्ताने...उपेखासहगतचित्ताने एक दिशा, त्याचप्रमाणे दुसरी, तिसरी, चवथी दिशा वर खाली, चारी बाजू, सर्व भरून टाकतो; सर्व जग विपुल, महद्‍गत, अप्रमाण, अवैर, द्वेषरहित मैत्रीसहगतचित्ताने भरून टाकतो.  तो जाणतो की, पूर्वी हे माझे चित्त भावना ना केल्यामुळे आकुंचित होते, पण ते आता उत्तम रीतीने भावना केल्यामुळे अमर्यादित (अनंत) झाले आहे.  जे काही मर्यादित कर्म माझ्या हातून घडले असेल, ते या अमर्यादित भावनेमुळे आता शिल्लक रहाणे शक्य नाही.  ते या भावनेसमोर राहू शकणार नाही.  भिक्षुहो, लहानपणापासून जर मनुष्याने मैत्रीचित्तविमुक्तीची... करुण... मुदिता उपेक्षाचित्तविमुक्तीची भावना केली तर त्याच्या हातून पाप होईल काय ?  आणि जर पाप झाले नाही तर त्याला दुःख भोगावे लागेल काय ?''

भिक्षु म्हणाले, ''भदंत, जर पापकर्म मुळीच केले नाही, तर दुःख कोठून उत्पन्न होणार ?''

भगवान् म्हणाला, ''भिक्षुहो, या मैत्रीचित्तविमुक्तीची ... करुणा... मुदिता... उपेक्षाचित्तविमुक्तीची स्त्रीने किंवा पुरुषाने अवश्य भावना करावी.  स्त्रीने किंवा पुरुषाने असा विचार केला पाहिजे की, हा देह बरोबर घेऊन जाता येत नाही; चित्त तेवढे मर्त्य मनुष्याचे राहणार आहे.

मैत्री, करुणा आणि मुदिता या तीन भावनांमुळे पहिली तीनच ध्याने साध्य होतात, व उपेक्षाभावनेमुळे केवळ चवथे स्थान मिळते, असे अभिधर्माचे म्हणणे आहे.  आणि तेच बुद्धघोषाचार्याने पत्करले आहे.  त्याच्या म्हणण्याप्रमाणे पहिली तीन ध्याने पहिल्या तीन भावनापैकी एका भावनेने प्राप्‍त करून घेतल्यावर मग उपेक्षाभावनेला आरंभ करावयाचा असतो; व तिच्यामुळे केवळ चवथे ध्यान प्राप्‍त होते.  पहिल्या तीन ध्यानात सुख असल्यामुळे उपेक्षावेदना राहणे शक्य नाही; व चवथ्या ध्यानात उपेक्षा असल्यामुळे सुख राहत नाही.  उपेक्षाभावना आणि उपेक्षावेदना यांचे तादात्म्य केल्यामुळे अभिधर्मकाराने (किंवा-कारांनी) वरील विधान केले असावे.  परंतु ते सुत्तपिटकाला, आणि व्यवहारालाहि अनुसरून नाही.  बोध्यंगसंयुत्ताच्या एका सुत्तांत (नं. ५४) सातहि बोध्यंगे या चार भावनांशी जोडली आहेत.  भगवान म्हणतो, ''भिक्षुहो, एखादा भिक्षु मैत्रीसहगत स्मृतिसंबोध्यंग, धर्मप्रविचयसंबोध्यंग, वीर्य, प्रीती, प्रस्त्रब्धि, समाधि, उपेक्षासंबोध्यंग, यांची भावना करतो.... करुणासहगत स्मृतिसंबोध्यंग... उपेक्षासंबोध्यंग यांची भावन करतो... मुदितासहगत स्मृतिसंबोध्यंग... उपेक्षासंबोध्यंग, यांची भावना करतो.''  उपेक्षासहगत स्मृतिसंबोध्यंग,... उपेक्षासंबोध्यंग यांची भावना करतो.'' 

या सुत्तावरून स्पष्ट होते आहे की, मैत्रीभावनेबरोबर उपेक्षा, व उपेक्षाभावनेबरोबर प्रीती राहू शकते.  दुसरेहि सुत्तपिटकांतील पुष्कळ उतारे देऊन हीच गोष्ट सिद्ध करता येणे शक्य आहे.  परंतु विस्तारभयास्तव हे देण्यात येत नाहीत.

व्यवहारिकदृष्ट्या पाहिले तरी असे दिसून येते की, उपेक्षाभावनेबरोबर प्रीती रहाणे शक्य आहे.  मूल धूळीत रांगत असताना आई त्याची प्रीतीपूर्वक उपेखा करीत नाही काय ?  अर्थात या ज्या चार भावना आहेत त्या जगावर प्रेम करण्याचे चार उपाय आहत; आणि त्या चार भावनांनी चारहि ध्याने मिळवता येणे शक्य आहे.  दूध पिणार्‍या मुलावर आई अत्यंत प्रेम किंवा मैत्री करते,  आजारी मुलावर करुणा करते,. तोच नाचू उडू लागला किंवा चांगला अभ्यास करू लागला म्हणजे त्यावर मुदिता करते आणि स्वतंत्रपणे संसार करू लागला म्हणजे त्यावर उपेक्षा करते.  या सर्वांवर तिचे कमी-जास्त प्रेम असते असे नाही; परंतु त्या त्या अवस्थेत त्या प्रेमाचा विकास भिन्न भिन्न प्रकारे होत असतो.  त्याचप्रमाणे जगाला बालकतुल्य समजणार्‍या योग्याचे मन भिन्न भिन्न प्रसंगी या चार भिन्न भावनांनी विकसित होत असते.
. . .