श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला
Shivam Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला : गौळणींची धांदल - अभंग २६५

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.

गौळणींचा आकांत - अभंग २६४   उद्धवास आज्ञा - अभंग २६६

२६५

कृष्ण आला परिसुनी मथुरे नारी । चपळा धांवती अति सुंदरी ।

एकी त्या कवळ करीं । एकीं त्या आलिया मार्जन शिरीं ॥१॥

अरे कृष्णा अरे कान्हा मनमोहना । गोपिका भाळल्या तुझिया गुणा ।

जय जय मानस मनमोहना । जीवीं जीवें गुंतल्या नंदनंदना ॥२॥

कृष्णदृष्टी पहावया प्राणपिसा । एकी त्या आलिया मुक्तकेशां ।

एकी त्या आलिया विगुंतवासा । देह गेह नाठवे कृष्णमानसा ॥३॥

कृष्णदृष्टी पहावया वेगु कामिनी । अस्ताव्यस्त इंद्रिया बाणलीं लेणीं ।

एकी त्या आलिया कर्म सांडोनी बाणलीं लेणीं । तत्नुमन वेधला सांगपणी ॥४॥

एकी त्या काजळ सुदल्या मुखीं । जावड कुंकम लाविती नाकीं ।

तांबुल विडीया खोविती मस्ताकीं । कृष्णदृष्टी इंद्रिया नाहीं वोळखी ॥५॥

एकी त्या तानवडे लेइल्या पायीं । पायींची पोल्हारे कानीं वो बाई ।

वाळे वाक्या बांधिल्या कंठाचे ठायीं । लाहे लाहे नेपुरें बांधिली डोई ॥६॥

एकी त्या आलिया चोखणा शिरीं । नागवें शरीर नेणें सुंदरीं ।

मोतियाचे हार नेसल्या नारीं । पाटाउ विसरल्या घरच्या घरीं ॥७॥

एकी त्या अर्धांगी लेईल्या चोळी । गुढरिया बांधिली मोतिया जाळी ।

नाकींचे मुक्ताफळ खोविती भाळीं । देह गेह नाठवें कृष्ण स्नेहाळी ॥८॥

एकी त्या कडिये घेतिल्या झारी । बाळकें विसरल्या घरींच्याघरीं ।

दृष्टीं सम दृश्या न दिसे नारी । पुत्र स्नेहें नाठवे देखोनि हरी ॥९॥

रंगी रंगल्या आल्हादें भारी । आपपर नाठवे तया सुंदरी ।

एका जनार्दनीं वेधल्या नारी । परतोनी संसारा नुरेची उरी ॥१०॥

. . .