श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला
Shivam Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीसंतएकनाथ गाथा - भाग पहिला : गुरुपरंपरा - अभंग १८८९ ते १९००

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.

सद्गुरुमहिमा - अभंग १८६१ ते १८८८  

१८८९

ध्यानीं बैसोनी शंकर । जपे रामनाम सार ॥१॥

पार्वती पुसे आवडी । काय जपतां तांतडी ॥२॥

मंत्र तो मज सांगा । ऐसी बोलतसे दुर्गा ॥३॥

एकांतीं नेऊन । उपदेशी राम अभिधान ॥४॥

तेचि मच्छिद्रा लाधलें । पुढें परंपरा चालिलें ॥५॥

तोचि बोध जनार्दनीं । एका लागतसें चरणीं ॥६॥

१८९०

वदुनीं श्रीगुरुचरण । संतमहिमा वर्णु ध्यान ॥१॥

आदिनाथगुरु । तयापासोनी विस्तारु ॥२॥

आदिनाथें उपदेश । केला मत्स्येद्रा तोशिष्य ॥३॥

मत्स्येंद्र तो वोळला । गोरक्षासी बोध केला ॥४॥

गोरक्ष अनुग्रहित । गहिनी संप्रदाययुक्त ॥५॥

गहिनी दातारें । निवृत्ति बोधिलासे त्वरें ॥६॥

निवृत्ति प्रसाद । ज्ञानदेवा दिला बोध ॥७॥

ज्ञानदेव कृपेंकरुन । शरण एका जनार्दन ॥८॥

१८९१

सांबें बोधियेला कृपावंत विष्णु । परब्रह्मा पुर्ण सांब माझा ॥१॥

सांब उपदेशी उमा मच्छिद्रासी । ब्रह्मारुप त्यासी केलें तेणें ॥२॥

मच्छिंद्रापासुनी चौरंगी गोरक्ष । एका जनार्दनीं अलक्ष दाखविलें ॥३॥

१८९२

गोरक्षनाथें उपदेश केला । ब्रह्मारुप झाला गहिनीनाथें ॥१॥

गहिनीनें निवृत्तिनाथासी । उपदेश त्यासी आत्मबोध ॥२॥

निवृत्तिनाथाने ज्ञानदेव पाहीं । एका जनार्दनीं तेही बोधियेलें ॥३॥

१८९३

ज्ञानदेवें उपदेश करुनियां पाहीं । सोपान मुक्ताई बोधियेली ॥२॥

मुक्ताईनें बोधखेचरासी केला । तेणे नामियाला बोधियेलें ॥२॥

नाम्याचें कुंटुंब चांगा वटेश्वर । एका जनार्दनीं विस्तार मुक्ताईचा ॥३॥

१८९४

ज्ञानराजें बोध केला । सत्यबळा रेडा बोलाविला प्रतिष्ठानीं ॥१॥

भोजलिंग ज्याची समाधी आळंदीं । ज्ञानराज बोधी तिघांजणां ॥२॥

सत्यबळें बोध गैबीराया केला । स्वयें ब्रह्मा झाला सिद्धरुप ॥३॥

एका जनार्दनीं ऐसी परंपरा । दाविले निर्धारा करुनिया ॥४॥

१८९५

मच्छिंद्रानें मंत्र गोरक्षासीदिला । गोरक्ष वोळला गहिनीराजा ॥१॥

गहिनीनें खूण निवृत्ति दिधली । पूर्ण कृपा केली ज्ञानराजा ॥२॥

ज्ञानदेवें बोध जगासी पैं केला । एका जनार्दनीं धाला पूर्ण बोधें ॥३॥

१८९६

परेंचें जें सुख पश्यंती भोगी । तोचि राजयोगी मुकुटमणी ॥१॥

सिद्धाची ही खुन साधक सुख जाण । सदगुरुसी शरण रिघोनिया ॥२॥

वैखरीं व्यापारी मध्यमेच्या घरीं । ओंकाराच्या शिरी वृत्ति ठेवी ॥३॥

आदिनाथ ठेवणें सिद्ध परंपरा । जनार्दनीं वेव्हारा एकनाथीं ॥४॥

१८९७

आदि गुरु शंकर ब्रह्माज्ञान खूण । बाणली पैं पुर्ण मत्स्येंद्रनाथीं ॥१॥

मत्स्येंद्र वोळला गोरक्ष बोधिला । ब्रह्माज्ञान त्याला कथियेलें ॥२॥

गोरक्ष संपुर्ण निवेदिलें गहिनी । तेणें निवृत्तिलागुनी उपदेशिलें ॥३॥

निवृत्तिनाथें ज्ञानदेवासी दिधलें । परंपरा आले ऐशा परी ॥४॥

एका जनार्दनीं तयाचा मी दास । उच्छिष्ट कवळास भक्षीतसे ॥५॥

१८९८

जो निर्गुण निराभास । जेथुन उद्भव शबल ब्रह्मास । आदिनारायण म्हणती ज्यास । तो सर्वांस आदिगुरु ॥१॥

तयाचा ब्रह्मा अनुग्रहीत । ब्रह्मा अत्रीस उपदेशीत । अत्रीपाद प्रसादीत । श्रीअवधुत दत्तात्रय ॥२॥

दत्तात्रय परंपरा । सहस्त्रार्जुन यदु दुसरा । जनार्दन शिष्य तिसरा । केला खरा कलियुगीं ॥३॥

जनार्दन कृपेस्तव जाण । समुळ निरसलें भवबंधन । एका जनार्दनीं शरण । झाली संपुर्ण परंपरा ॥४॥

१८९९

करी जो सृष्टीचे रचन । तया न कळे बह्माज्ञान । तो श्रीनारायण । शरण रिघे ॥१॥

न कळे न कळे ब्रह्माज्ञान । म्हणोनिक धरितसे चरण । नारायण परिपूर्ण । उपदेशी ब्रह्मा ॥२॥

ब्रह्मा अत्रीतें सांगत । ब्रह्माज्ञान हृदयीं भरित । अत्री पूर्ण कृपेस्थित । दत्तात्रय सांगतसे ॥३॥

दत्तात्रय कृपें पुर्ण । जनार्दनीं पूर्णज्ञान । जगचि संपूर्ण । एक रुप तयासी ॥४॥

एका जनार्दनीं पूर्ण । ब्रह्माज्ञानाची खुण । बोधोनियां संपूर्ण । मेळविलें आपणीया ॥५॥

१९००

जनार्दनाचा गुरु । स्वामी दत्तात्रय दातारु ॥१॥

त्यांनीं उपकार केला । स्वानंदाचा बोध दिला ॥२॥

सच्चित्सुखाचा अनुभव । दाखविला स्वयमेव ॥३॥

एका जनार्दनीं दत्त । वसो माझ्या हृदयांत ॥४॥

. . .