महात्मा गौतम बुद्ध
पांडुरंग सदाशिव साने Updated: 15 April 2021 07:30 IST

महात्मा गौतम बुद्ध : महात्मा गौतम बुद्ध : || दोन || 6

साने गुरुजींनी लिहिलेलं गौतम बुद्धांचे चरित्र

महात्मा गौतम बुद्ध : || दोन || 5   महात्मा गौतम बुद्ध : || दोन || 7

आपण निरनिराळी मते अंगीकारतो, निरनिराळे विचार स्वीकारतो; याच्या मुळाशी केवळ शुद्ध नि:स्वार्थ हेतूच असतो असे नाही. जीवनात अपयश आलेले असते; मनोरथ निफल झालेले असते; एक प्रकारचा संताप व वैताग आलेला असतो; आणि ह्यामुळे आपण मते बदलतो. आपले विचार बदलतात. आपला अहंकार दुखावला गेला, तर आपण सूडबुद्धीने प्रेरित होता; आपण जुलमी होतो. आपल्या प्रेमाला प्रतिप्रेम मिळालेले नसते म्हणून किंवा खाली मान घालावयास लावणारे एखादे शारीरिक व्यंग अतले तर आपण सूड घेण्यास उभे राहतो, जगावर संतापतो. मानवप्राण्यासंबंधी विशेष लक्षात येणारी गोष्ट म्हणजे तो वारंवार स्वत:चीही वंचना करीत असतो. आपणांपैकी बहुतेक काळाच्या हातातील बाहुली असतात. आपण परिस्थितीचे जणू दास असतो. आपले विचार, आपल्या भावना एका रूढ ठरीव साच्याप्रमाणे असतात. आत्मपरीक्षणानेच ही चाकोरी सोडून आपण बाहेर पडू शकतो. ज्या रूढ सवयींच्या आधारावर आजपर्यंत मन अवलंबून होते, ते आधार काढून घेऊन, ते नष्ट करून मनाला स्वावलंबन शिकवण्यात येते. आपण आत्मसंशोधन करू लागतो. आत्मरूप पाहण्याचे आपण प्रयत्न करू लागतो. आध्यात्मिक विकासाच्या मार्गात असत् वासनांचा जितका अडथळा, तितकाच आलस्य व कर्मशून्यता यांचाही होतो. सम्यक अवधानता म्हणजे वृत्ती स्थिर होतील अशा रीतीने शरीराकडे व मनाकडे पाहणे. एक प्रकारची अविचल अशी वृत्ती राहील असे करणे. सदैव दक्षता ठेवणे, जागृत असणे, खिन्न न होणे, आदळआपट न करणे. सारखे या गोष्टीमागे, त्या गोष्टीमागे, असे धावपळ करीतन हिंडणे. एक प्रकारचा स्वत:वर ताबा; स्वत:चे स्वरुप समजून घेऊन स्वत:ला ताब्यात घेणे. आणि असे केले म्हणजे मग कोणतीही क्रिया केवळ यांत्रिक होत नाही. अनावधानतेने कोणतेही कर्म होत नाही. सारे व्यवहार डोळस होतात, बुद्धीपूर्वक होतात. जणू शाश्वततेच्या प्रकाशात वस्तूंचे स्वरूप पाहून आपण वागतो. आणि सम्यक चिंतन हे चतुर्विध आहे. अशी एक विचित्र समजूत झालेली आहे, की बुद्धांनी सम्यक जीवन जगण्यासाठी जो उपाय सुचविला तो म्हणजे कर्मशून्यता, वासनांचा त्याग, कमीत कमी खर्च करणे. परंतु असे वास्तविक नाही. बुद्धांचा उपाय म्हणजे कर्मशून्यता नसून उलट प्रयत्नांची पराकाष्ठा आहे. ते तारक असे परमसत्य मिळविण्याचा दृढ निश्चय, तत्प्राप्यर्थ अखंड प्रयत्नांची आवश्यकता, सदगुणांच्या अभ्यासांत अनेक जन्म दडवणे, पदोपदी परमोच्च ध्येयापासून खाली घसरणा-या मनास तसे होऊ न देणे, तीच तीव्र उत्कटता व प्रखरता टिकवणे, इत्यादि ज्या गोष्टी बुद्ध सांगतात त्यांचा अर्थ काय? या सर्वांचा अर्थ एवढाच, की मानवी इच्छाशक्ती दिव्य पराक्रम व परम पुरुषार्थ संपादण्यास समर्थ आहे. ध्यान म्हणजे सावधान असण्याची स्थिती; ध्यान म्हणजे इच्छाशक्तीचा प्रयत्न; म्हणजे समाधी नव्हे, ध्यान म्हणजे पराकोटीस गेलेला प्रयत्न, पराकाष्ठेची धडपड. ध्यान म्हणजे मनाची अशी एकाग्रता, की जीत इच्छाशक्ती व विचार एकरुप होतात. बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे जो-तो स्वत:चा तारक आहे, स्वत:चा उद्धारक आहे. ज्याने-त्याने स्वत:चा मोक्ष मिळवून घ्यावा.

. . .