महात्मा गौतम बुद्ध
पांडुरंग सदाशिव साने Updated: 15 April 2021 07:30 IST

महात्मा गौतम बुद्ध : महात्मा गौतम बुद्ध : || चार || 7

साने गुरुजींनी लिहिलेलं गौतम बुद्धांचे चरित्र

महात्मा गौतम बुद्ध : || चार || 6   महात्मा गौतम बुद्ध : || चार || 8

ते जे निरपेक्ष तत्त्व त्याचे शेकडो मार्गांनी आपण आकलन करुन घेत असतो. प्रत्येक धर्म त्या अंतिम सत्याच्या कोणत्यातरी एखाद्या विशिष्ट स्वरुपावर जोर देत असतो. त्या विशिष्ट स्वरुपाला मध्यवर्ती करुन इतर रुपे त्याच्या भोवती उभी करण्यात येतात. त्या मध्यवर्ती स्वरुपाच्या संदर्भात इतर रुपाकडे पाहण्यांत येते. बुद्धांनी नैतिक अंगावर भर दिला. नीतीचे स्वरुप त्यांनी मध्यवर्ती केले. आकाशातील ज्योतिर्मय गोलांच्या गतीपासून तो जीवनातील लहानशा हालचालीपर्यंत सर्वत्र हे नीतीचे दर्शन बुद्धांना होते. कधी कधी हे विश्व अव्यवस्थित आहे, या विश्वात काही विचारपूर्वक चालले आहे असे जरी न वाटले, तरी प्रत्यक्ष व्यवहारात ती दृष्टी आपण कधीही घेत नाही. हे जगत् म्हणजे ऋताचे अविष्करण आहे, अशी आशा मनात धरुन आपण कार्यप्रवृत्त होत असतो आणि अनुभवाने ही आशा अधिकाधिक सफळ होक आहे. या आशेचे समर्थन होत आहे. परंतु हा जो ऋताचा कायदा तो नैतिक स्वरुपाचा आहे. जेव्हा कधी आपले मन त्रस्त व संतप्त झालेले असते, आपले मन अस्ताव्यस्त झालेले असते, तेव्हा हे विश्व म्हणजे सारा ब्रह्मघोटाळा आहे, सारी बजबजपुरी आहे असे क्षणभर आपण मानतो. परंतु वागताना या विश्वात न्याय आहे, निरपेक्ष, पक्षातीत न्याय आहे, अशा दृढ श्रद्धेने व विश्वासानेच आपण वागतो. नैतिक ध्येये म्हणजे व्यक्तीच्या कल्पनेचे खेळ नाहीत. नैतिक ध्येय म्हणजे उत्क्रांतीतत्त्वानुसार उत्क्रांत होत आलेल्या वस्तू नाहीत. नैतिक ध्येय या विश्वाचा आधार आहेत. विश्वाच्या मुळाशी खोल ती रुतलेली आहेत. धर्म, न्यायता म्हणजे विश्वाचे प्रेरकतत्त्व असे बुद्ध मानतात. आपणही त्या न्यायाला जीवनात आणावे अशी आपणापासून अपेक्षा केली जात असते. प्रत्येक नैतिक ध्येयाची दोन स्वरुपे असतात. एक स्वरुप म्हणजे मनुष्य ते ध्येय प्राप्त करु शकतो हे होय. आणि दुसरे म्हणजे या विश्वात त्या ध्येयाला आधार आहे. नैतिक ध्येय कृतीत आणणे जर आपल्या शक्तीच्या बाहेरच असेल, तर त्यासाठी धडपड करा असे सांगण्यात काय अर्थ? अप्राप्य ध्येयांचे चिंतन करण्यात एक प्रकारची गोडी असेल; परंतु त्यांना नैतिक नाही म्हणता येणार. प्रत्यक्षात न येणा-या ध्येयांना आपण आपली निष्ठा देऊ शकणार नाही. कोणी म्हणतील, की ‘नैतिक मूल्ये जीवनात आणण्यासाठी जरी आपण पराकाष्ठा केसी, तरी हे विश्व आपल्या आशांचा चक्काचूर करील आणि आपले सर्वोत्कृष्ट प्रयत्नही विफल केले जातील. जे काही आहे त्याला अधिक चांगले करण्याची आशा करता येणे शक्य नाही.’ आपणास असे निश्चित आश्वासन मिळाले पाहिजे, की सर्वव्यापी असे तत्त्व आहे व ते नैतिक पूर्णतेकडे जात आहे; आणि त्या आदर्शाकडे जग जावे म्हणून आपण मर्त्य जीवही आपापल्या क्षेत्रात आपापल्या शक्तीप्रमाणे तो आदर्श सफळ व्हावा म्हणून धडपडत आहे. बुद्धांनी असे आश्वासन दिले आहे. बुद्ध सांगतात, की ज्यावर आपण नि:शंकपणे विश्वास ठेवावा अशी एकच गोष्ट आहे व ती म्हणजे धर्म. ती गोष्ट म्हणजे निरपेक्ष न्यायता.

. . .