देवांच्या भूपाळ्या
स्तोत्रे Updated: 15 April 2021 07:30 IST

देवांच्या भूपाळ्या : भूपाळी श्रीविष्णूची

सगुण उपासनेंत देवाला मनुष्यासारखे सोपस्कार करतात. देव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. त्याचप्रमाणें स्वतःच्या अंतःकरणांत असलेल्या देवत्त्वालाही जागृत करण्याचा हेतु भूपाळ्या म्हणण्यांत डोळ्यासमोर ठेवलेला आहे.

भूपाळी श्रीविष्णूची   भूपाळी आत्मारामाची

[काशीराजकृत.]
उठि उठि वा पुरुषोत्तमा ॥ भक्तकाजकल्पद्रुमा ॥ आत्मारामा निजसुखधामा ॥ मेघ:शामा श्रीकृष्णा ॥१॥
भक्तमंडळी महाद्वारीं ॥ उभी तिष्ठती श्रीहरी ॥ जोडोनियां उभय करीं ॥ तुज श्रीहरी पहावया ॥२॥
सुरवर सनकादिक नारद ॥ विदुर उद्धव ध्रुव प्रर्‍हाद ॥ शुक भीष्म रुक्मांगद ॥ हनुमंत बळिराय ॥३॥
रिक्त पाणि न पश्यंती ॥ घेउनि आलें स्वसंत्ती ॥ आज्ञां सांप्रत सांगिजेती ॥ नाचत गर्जत हरिनामें ॥४॥
झाला प्रात:काळ परिपूर्ण ॥ करी पंचागश्रवण ॥ महा मुद्नलभट ब्राह्मण ॥ आशिर्वाद घे त्याचा ॥५॥
तुझा नमदेव शिंपी ॥ घेउनि आला आंगडें टोपी ॥ आतां नको जाऊं झोंपीं ॥ दर्शन देईं निज भक्तां ॥६॥
घेउनि नाना अलंकार ॥ आला नरहरी सोनार ॥ आला रोहिदास चांभार ॥ जोडा घेउनी तुजलागीं ॥७॥
निराबाई तुजसाठीं ॥ दुग्धें तुपें भरोवि वाटी ॥ तुझ्या लावावया ओठीं ॥ लक्ष लावुनी बैसली ॥८॥
कान्होपात्रा नृत्य करी ॥ टाळ मृदंग साक्षात्कारी ॥ सेना न्हावी दर्पण करीं ॥ घेउनि उभा राहिला ॥९॥
गुळ खोबरें भरोनि गोणी ॥ घेऊन आला तुका वाणी ॥ त्याच्या वह्या कोरडया पाणी ॥ लागो दिलें नाहीं त्वां ॥१०॥
गरुडापारीं हरिरंगणी ॥ टाळमृदंगाची ध्वनी ॥ रागोद्धार हरिकीर्तनीं ॥ करी कान्हया हरिदास ॥११॥
हरिभजनाविण वायां गेलें ॥ ते नरदेहीं बैल झाले ॥ गोर्‍या कुंभारें आणिले ॥ खेळावया तुजलागीं ॥१२॥
निजानंदें रंग पूर्ण ॥ सर्वहि कर्में कृष्णार्पण ॥ श्रीरंगानुजतनुज शरण ॥ चरण संवाहन करीतसे ॥१३॥

. . .