देवांच्या भूपाळ्या
स्तोत्रे Updated: 15 April 2021 07:30 IST

देवांच्या भूपाळ्या : भूपाळी श्रीदत्तप्रभूची

सगुण उपासनेंत देवाला मनुष्यासारखे सोपस्कार करतात. देव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. त्याचप्रमाणें स्वतःच्या अंतःकरणांत असलेल्या देवत्त्वालाही जागृत करण्याचा हेतु भूपाळ्या म्हणण्यांत डोळ्यासमोर ठेवलेला आहे.

भूपाळी श्रीदत्तप्रभूची  

ऐका भोळे भाविकजन । नित्य करा गुरुचिंतन ।

महादोष होती दहन । स्मरणमात्रें करुनिया ॥ध्रु०॥

गुरुसेवा घडेल ज्यासी । काळ दंडीना तयासी ।

अंतीं जाय मोक्षपदासी । गुरुस्मरण केलिया ॥१॥

गुरु भक्‍तीचा दाता । गुरु देहासी चालविता ।

हरे पातकाची व्यथा । गुरुस्मरण केलिया ॥२॥

गुरु ज्ञानाचा सागरु । गुरु धैर्याचा आगरु ।

गुरु नेईल पैल पारु । नामस्मरण केलिया ॥३॥

गुरु मायेचें निरसन । गुरु मायेचें अंजन ।

गुरुचें अगाध महिमान । मुखें कित्येक वदावें ॥४॥

गुरु संतांचें निजगुज । गुरु मंत्रांचें निजबीज ।

गुरुचें घ्यावें चरणांबुज । अनेक तीर्थें त्या ठायीं ॥५॥

जयजय गुरु मायबापा । चुकवी चौर्‍यांशीच्या खेपा ।

भक्तराज ध्यातो गुरुबापा । ब्रह्मीं लय लावुनिया ॥६॥

. . .