श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र
संकलित Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र : त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.

"महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे."   "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ."

१८६६
"त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे,
बोलण्यांत तो मोठा चतुर आहे आणि तो अखंड रामनाम घेतो."
इंदूरला येऊन श्रींना सहा महिने होत आले होते. येथे आता जास्त राहण्याचे कारण नाही असे पाहून श्रींनी काहीतरी निमित्त काढून जीजीबाई, ताई यांचा प्रेमाने निरोप घेऊन इंदूर सोडले. वाटेतील मोठी तीर्थे पहात श्री गोंदवल्यास आले, बरोबर चार बैरागी शिष्य होते. नदीकाठच्या मारुतीच्या मंदिरात त्यांनी मुक्काम ठेवला. तेजःपुंज मजबूत शरीर, डोक्यावर एखाद्या ऋषीप्रमाणे शोभणार्‍या जटा, छान वाढलेली दाढी, प्रसन्न मुद्रा, पाणीदार डोळे, एका हातात कुबडी व दुसर्‍या हातात रुद्राक्षाची माळ, कमरेला कौपीन, पायांत खडावा, सर्वांगाला भरम अशी श्रींची तरुण मूर्ती पाहिल्यावर कोणाच्याही मनात त्यांच्याबद्दल पूज्य भाव उत्पन्न होत असे. बरोबरच्या शिष्यांनी मंदिराच्या ओटयावर धुनी पेटवली आणि मुख्य गोसावीबुवा म्हणजे आमचे श्री, सिद्धासन घालून ध्यानाला बसले. मारुतीमंदिरात कोणी मोठा महात्मा आला आहे ही वार्ता गावामध्ये पसरण्यास वेळ लागला नाही. गावचे सर्व लोक दर्शनास येऊ लागले. संध्याकाळी गीताबाई व रावजी हेही तेथे आले. त्यांना पाहताच श्रींनी मनोमन नमस्कार केला. दोघांनी श्रींना बिलकुल ओळखले नाही. गीताबाई श्रींना म्हणाल्या, "गोसावीबुवा, आजाआठ वर्षें झाली, माझा मुलगा बाराव्या वर्षी घरातून निघून गेला, तो तुम्हाला कोठे आढळला का ?" त्यावर गोसावीबुवांनी विचारले, "माय, मुलगा कसा आहे ?" त्यावर गीताबाई म्हणाल्या, "त्याच्या तीन खुणा आहेत, तो दिसायला मोठा सुंदर आहे, बोलण्यात तो मोठा चतुर आहे आणि तो अखंड रामनाम घेतो " त्यावर गोसावीबुवा म्हणाले, "होय, असा मुलगा मी पाहिला आहे, तो सध्या तीर्थयात्रा करीत फिरत आहे, तो सुखरूप आहे, तुम्ही नामस्मरण करीत रहा म्हणजे एका वर्षाने तो तुम्हाला नक्की भेटेल." गीताबाईंच्या मनाला फार समाधान झाले आणि त्या आनंदाने घरी गेल्या. रात्री गावातील दाजी पाटील आणि आण्णा बारसवडेकर बैरागीबुवांजवळ हिरवा तंबाखू ( गांजा ) फुकट ओढायला मिळेल म्हणून मारुतीमंदिरात आले. "या बसा " झाल्यावर तुम्ही कुठले काय वगैरे चौकशी केल्यावर व त्यांच्या बोलण्या-चालण्यावरून व तुटक्या कानावरून हा गोसावी दुसरा कोणी नसून आपला गणूबुवाच असावा असा तर्क दोघांनी बांधला व दुसर्‍या दिवशी रावजींना जाऊन सांगावे असे ठरवून दोघे आपल्या घरी निघून गेले. ही गोष्ट श्रींच्या लक्षात येण्यास वेळ लागला नाही, म्हणून दुसर्‍या दिवशी पहाटेच गावातले कोणी उठण्याच्या आधीच श्री तेथून निघून गेले. गोंदवल्याहून श्री खातवळला आपल्या सासुरवाडीस गेले. तेथेही अनेक लोक श्रींच्या दर्शनाला येऊन गेले. ते कोणी त्रिकालज्ञ महंत आहेत असे जाणून श्रींच्या सासुबाईही आपल्या मुलीला घेऊन गोसावीबुवांच्या दर्शनाला गेल्या. श्रींना पाहिल्याबरोबर दोघींच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आपलेपणा वाटू लागला. गर्दी कमी झाल्यावर गोसावीबुवांना सासुबाई म्हणाल्या, "ही माझी मुलगी. ९/१० बर्षांपूर्वी हिचे लग्न झाले, पण हिचे घरधनी नाहीसे झाले. ते परतून केव्हा येतील हे कृपा करून सांगा." त्यावर गोसावीबुवा म्हणाले, "ते सुखरूप आहेत, तिने काळजी करू नये, फक्त अखंड नामस्मरण करावे. तो लवकर परत येईल, तिचा संसार चांगला होईल " हे बोलणे ऐकून दोघींच्या मनाचे समाधान झाले व दोघी आनंदाने घरी गेल्या.

. . .