श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र
संकलित Updated: 15 April 2021 07:30 IST

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र : "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त."

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.

"हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले."   जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला

१९०२
"ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त."
श्रींची बरीच मंडळी पुण्यात असल्यामुळे श्रींचे पुण्यात येणेजाणे असे. श्रींचा लो. टिळकांशी परिचय होता. श्री पुण्यात आले म्हणजे लोकमान्य एक रुपया व नारळ घेऊन श्रींना न चुकता भेटण्यास येत; त्यांचे बोलणे एकांतात होत असे. एकदा लोकमान्य श्रींना भेटून गेल्यावर श्री बरोबरच्या मंडळींना म्हणाले, " हा पुरुष जबर शक्तीचा आहे. अत्यंत नीतिमान, निर्भय, नि:स्वार्थी व भगवंतावर अत्यंत निष्ठा या गुणांमुळे मला ते फार प्रिय आहेत." लोकमान्य श्रींना एकदा म्हणाले, "आपण राजकारणात का पडत नाही  ? आपल्यासारख्यांचा हातून फार मोठे काम होईल." त्यावर श्री म्हणाले, " प्रारब्धाचा सिध्दांत जरी क्षणभर बाजूला ठेवला तरी अधात्म राजकारणापेक्षा अधिक नाही तरी तितक्याच योग्यतेचे आहे हे तुम्हीच कबूल करता. माझे जीवन मी अध्यात्माला वाहिलेले आहे, म्हणून तुम्ही तुमचे करा, मी माझे काम करतो." प्रोफेसर जिनसीवाले हे अतिशय विद्बान व लोकमान्यांचे परमरस्नेही होते. एकदा दोघांचा "वेदांच्या अपौरुषेय’ संबंधी मोठा वाद झाला. जिनसीवाले वेद पौरुषेय आहेत असे मानीत तर टिळक वेद अपौरुषेय आहेत असे मानीत. अखेर श्रींच्या कडे या वादाचा निकाल देण्याचे काम दोघांच्या संमतीने आले. दोघांनी आपापल्या परीने बाजू मांडली. दोघांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर श्री म्हणाले, "सामान्य माणूस ज्यावेळी भाषा बोलतो त्यावेळी तो मनात अर्थ योजून शब्दरचना करीत असतो. मनातला अर्थ ज्या शब्दाने बरोबर व्यक्त होईल तोच शब्द आपण वापरतो. परंतु भगवंताची उपासना करणारे जे ऋषी असतात त्यांचे मन अशा एका अवस्थेमध्ये राहते की, त्या ठिकाणी परमात्माच सर्व काही करतो अशी भावना स्पष्टपणे प्रकट होते. भगवंताशी एकरुप होऊन जगण्याची ही अवस्था आहे. ऋषींचा मीपणा नष्ट झालेला असल्याने मी करतो, मी बोलतो, मी काव्य करतो, ही भावना त्याना नसून परमात्मा बोलतो, परमात्मा मंत्र रचतो असा स्पष्ट व खरा अनुभव त्यांना येतो. या थोर अवस्थेत ऋषींच्या तोंडातून वेदमंत्र बाहेर पडले असल्याने ते मानवाची कृती नाही, वेद हे अपौरुषेय आहेत." एवढे बोलून श्री म्हणाले, "टिळकांचे बाकीचे सर्व मुद्दे तुम्हाला मान्य असल्यावर मग वेद हे अपौरुषेय आहेत असे म्हटले तर काय बिघडले  "" त्यामुळे सामान्य जनांचा बुद्धिभेद होण्याचा धोका टळेल आणि आपल्या धर्माची व परंपरेची श्रद्धा टिकायला मदत होईल." असे सांगून हा वाद श्रींनी समाधानकारक मिटविला.
पुढे, पुण्यातील एका नामांकित शास्त्रीबुवांचे व श्रींचे प्रश्नोत्तर रुपाने दोन तास संभाषण झाले. त्याचा सारांश असा
१) आपण स्वत:ला कोण समजता  ?
मी एक हीन, दीन व अज्ञानी असा रामाचा दास आहे.
२) आपण व्यवसाय काय करता  ?
मी रामाचे नाव अखंड घेतो.
३) आपण लोकांना काय उपदेश करता  ?
मी लोकांना उपदेश करीत नाहे, लोकांना आपण होऊन कधी बोलावित नाही, तरी जे लोक माझ्याकडे येतात, त्यांनी मला काहीही विचारले तरी मी त्यांना रामाचे नाव घ्या असेच सांगतो.
४) आपण देव पाहिला आहे का  ?
होय, देव मी पाहिला आहे.
५) तो आम्हाला दाखवाल काय  ?
अर्थात. पण ज्या डोळ्यांनी देव पाहायचा असतो ते डोळे हे नव्हेत, ते म्हणजे आपल्याला देव दिसेल.
६)ज्ञानचक्षू कसे प्राप्त होतील  ?
भगवंताचे नाम घेत गेल्याने.
७) नामस्मरण हे भक्तिमार्गाचे साधन आहे, आपण कोणते श्रेष्ठ मानता ज्ञात की भक्ती  ?
ज्ञात श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही, भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त. ज्ञानामध्ये भगवंतापाशी एकरुपत्व असते म्हणून भक्तीमधून ज्ञान उत्पन्न होते आणि ते भक्तिवरच जगते. खरा भक्त ज्ञानीच असतो.
८) नाम कोणते, कसे घ्यावे?
आपल्या आवडीचे किंवा संतापासून घेतलेले नाम घ्यावे. आपण आपल्या मुलाला जितक्या आपलेपणाने हाक मारतो तितक्या आपलेपणाने देवाचे नाव घ्यावे. शास्त्रीबुवांचे पूर्ण समाधान झाले.

. . .